या वर्षी म्हणजे 2010 मधे, चीनमधल्या शांघाय या शहरात जागतिक एक्स्पो हे मोठे प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक परदेशी पाहुणे शांघायला भेट देत आहेत. या एक्स्पोच्या निमित्ताने, शांघायमधल्या व पर्यायाने चीनमधल्या आंतर्राष्ट्रीय व्यापारउद्योगात प्रचंड वाढ झाली आहे. शांघायमधल्या हुआंगपू नदीच्या काठाने असलेल्या पॉश हॉटेल्स व बार मधून एखादी सहज चक्कर जरी टाकली तरी अनेक परदेशी पाहुणे व त्यांचे चिनी यजमान नुकत्याच सह्या केलेल्या बिझिनेस कॉंन्ट्रॅक्ट्स बद्दल मद्याचे पेले उंचावून आनंद व्यक्त करताना कधीही दिसतील.
मुहम्मद रेझा मौझिन हा 63 वर्षाचा, मूळ जन्माने इराणी पण आता जर्मन नागरिकत्व पत्करलेला , एक व्यावसायिक आहे. बांधकामासाठी लागणार्या मशिनरीच्या खरेदी विक्रीचा तो व्यवसाय करतो. M.C.M. या नावाची त्याची व्यापारी पेढी जर्मनीमधल्या मानहाईम या शहरात आहे. स्वत: मौझिन, त्याचा मुलगा व तीन कर्मचारी मिळून हा व्यवसाय बघतात. गेली 30 वर्षे मौझिन हा व्यवसाय करतो आहे. पोलंड व रशिया मधे अशा प्रकारची मशिनरी विकत घ्यायची व इराणमधल्या ग्राहकांना ती विकायची असा मुख्यत्वे त्याचा व्यवसाय आहे. मौझिन हा काही नवशिका धंदेवाईक नाही. या धद्यात त्याचे केस पांढरे झाले आहेत.
चीनबद्दल आता इतके ऐकू येते आहे तेंव्हा आपण आपल्या व्यापाराचे क्षेत्र चीनपर्यंत वाढवावे असे मौझिन याच्या मनाने घेतले. मौझिनने इंटरनेटवर शोध घेतल्यावर त्याच्या असे लक्षात आले की तो खरेदी करत असलेल्या मशिनरी सारखी बरीच मशिनरी, चीनमधे सहज रित्या उपलब्ध आहे व अशा मशिनरीच्या विक्रीसाठी उपलब्धतेच्या जाहिराती इंटरनेटवर सतत दिसत आहेत.
मौझिनला इराण मधल्या एका ग्राहकाकडून त्या वेळेस एका क्रेनबद्दल विचारणा होती. त्या ग्राहकाला हवी तशी व Kato या जपानी कंपनीने बनवलेली क्रेन, मौझिनला एका चिनी संकेत स्थळावर सापडली. मौझिनने त्यांच्याशी ई-मेल द्वारे बोलणी चालू केली व शेवटी किंमत व इतर अटी मान्य झाल्या व डील फायनल करावयाचे ठरले.
मौझिन व त्याचा मुलगा यासाठी शांघायला गेले. त्यांनी क्रेनची तपासणी केली व त्यांना ती पसंत पडल्यावर ती खरेदी करण्यासाठी त्यांनी 1,22000 अमेरिकन डॉलर्सची किंमत फायनल केली. त्याच्या चिनी पुरवठादारांनी त्याच्या आदरार्थ एक मेजवानीही आयोजित केली. हे चिनी पुरवठादार त्याच्याशी अगदी नम्रपणे वागल्याने व त्याला वडिलधार्यांसारखे त्यांनी वागवल्याने मौझिन अगदी खुष झाला. या चिनी पुरवठादाराने त्याला सांगितले की आम्ही चिनी या धंद्यात नवीन आहोत व आम्ही तुमच्याकडून हा धंदा शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. या धंद्यात बरीच वर्षे असल्याने व त्याला या धंद्यातील खाचाखोचींची चांगलीच माहिती असल्याने मौझिनने प्रत्यक्ष स्वत: समोर उभे राहून ही क्रेन कंटेनर मधे ठेवून घेतली. ती ठेवली जात असताना त्याने कंटेनर नंबर व क्रेनची डिटेल्स स्पष्ट दिसतील असे फोटो काढले.
ऑर्डर केलेला क्रेन
हा कंटेनर नंतर एका शिपिंग एजंट कंपनीच्या ट्रकवर ठेवून त्या शिपिंग एजंट कंपनीकडे पाठवण्यात आला. त्याचाही फोटो मौझिनने काढला. मौझिन आणि त्याचा मुलगा हे रात्री 1 वाजेपर्यंत त्या ट्रक बरोबर राहले व जेंव्हा तो ट्रक कस्टम ऑफिस व शांघाय बंदराकडे जाणार्या ट्रक्सच्या रांगेत उभा राहिला तेंव्हाच ते हॉटेलवर परत आले.
शांघाय डॉक्स
आपला पहिलाच डील इतका छान झाल्यामुळे मौझिनने आणखी एक क्रेन खरेदी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने 60000 यूरो ऍडव्हान्स दिला व क्रेनची मशागत व त्यावर वातानुकूलन यंत्र बसवण्यासाठी त्याने आणखी पैसे दिले.या दुसर्या क्रेनचे काम चायना हेवी मशिनरी लिमिटेड या कंपनीकडे सुपुर्त करण्यात आले. एकंदरीतच सर्व गोष्टी मनासारख्या पार पडल्याने मौझिन जर्मनीला मोठ्या आनंदात परतला.
जर्मनीला परतल्यावर थोड्याच दिवसात मौझिनच्या ऑफिसला चायना हेवी कंपनीकडून ई मेल्सची रीघ सुरू झाली. या दुसर्या क्रेनचे मूळ वायरिंग, वातानुकूलन यंत्र बसवताना जळून गेल्याचे त्यांनी सांगितले व नवीन वायरिंग बसवण्यासाठी 40000 यूरोची मागणी केली. शेवटी चायना हेवी कंपनीने त्याला एक मेल पाठवून तो जर पुढच्या 8 तासात त्यांना वैयक्तिक रित्या भेटू शकला नाही तर या कामाशी आपला संबंध राहणार नाही असे सांगून हात झटकून टाकले. चीनचा विमान प्रवासच 11 तासाचा असल्याने 8 तासात तिथे पोचणे अशक्यच होते.
मध्यंतरीच्या काळात इराणला पाठवण्यात आलेली क्रेन तिथे पोचली. ती पोचल्यावर Kato कंपनीच्या क्रेनऐवजी Mistubishi कंपनीच्या एका पुरातन क्रेनचे भंगार कंटेनरमधे आहे असे आढळून आले.
प्रत्यक्षात पुरवठा झालेला क्रेन
मौझिनला हे कसे काय घडले असेल हेच कळेना शेवटी तो या निर्णयाप्रत आला की कस्टमकडे जाणार्या ट्रक्सच्या रांगेत त्याचा ट्रक उभा असताना त्यातील क्रेन बदलण्यात आली असावी. याचा अर्थ स्पष्ट होता. त्याच्या पुरवठादार कंपनीबरोबरच शांघाय बंदर व कस्टम्स यांचीही लोक या गुन्ह्यात सामील होते.
अतिशय डेस्परेट अवस्थेत मौझिन व त्याचा मुलगा परत शांघायला गेले. प्रथम त्यांनी पोलिसांमधे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सर्व गोष्टी ऐकून घेतल्या फोटो बघितले व गुन्हा घडला असल्याचे मान्य केले. परंतु जास्त चोकशी करून या सर्व गॅन्गची पाळे मुळे खणून काढली पाहिजेत असे म्हणून त्यांनी कोणासही अटक करण्यास नकार दिला.
मौझिन आणि चायना हेवी यांच्यातील बैठकीचा असाच बोजवारा उडाला. त्यांच्या मते त्यांच्या कडे आलेली क्रेन निराळ्याच कंपनीची होती. मौझिनने जपानी ब्रॅन्डची क्रेन घेण्याचे ठरवले होते परंतु चीन मधे या क्रेनचे नाव दुसरेच होते. मौझिन 8 तासात त्यांना न भेटल्याचे कारण देऊन त्यांनी आता हात पूर्णपणे झटकूनच टाकले. चायना हेवी बद्दलची कोणतीही तक्रार सुद्धा दाखल करून घेण्यास पोलिसांनी पूर्ण नकार दिला.
आपण पूर्णपणे फसवलो गेल्याचे मौझिनच्या आता लक्षात आले. इंटरनेटवर बघत असताना त्याच्या लक्षात आले की त्याने प्रथम खरेदी केलेली क्रेन आता परत विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे. त्याने पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तक्रारही दाखल करून घेतली नाही.
मौझिनने दिलेला सर्व ऍडव्हान्स तर पाण्यातच गेला आहे आणि त्याच्या इराणी ग्राहकाला त्याला चुकीचा पुरवठा केल्याबद्दल 30% पेनल्टीही द्यावी लागणार आहे. मौझिनचा उत्तम स्थितीतील धंदा आता पूर्ण डबघाईला आला आहे. हा धंदा वाचणार कसा असा प्रश्न त्याच्या पुढे निर्माण झाला आहे.
एकोणिसाव्या शतकात शांघाय हे अफूच्या विक्रीचे मुख्य केंद्र होते. त्या वेळी पुष्कळदा अफूच्या गिर्हाईकाला संपूर्णपणे लुटण्यात येत असे. त्याला 'शान्घाइड' (Shanghaied) असा शब्द प्रयोग रूढ झाला होता. आज एकविसाव्या शतकात मौझिन आणि त्याचा मुलगा यांना आपण शांघायच्या आधुनिक भामट्यांकडून परत एकदा 'शांघाइड' झालो आहोत हे लक्षात आले आहे. पण सध्या तरी हात चोळत बसण्याशिवाय त्यांच्या हातात काही नाही.
9 जून 2010