जपान हा देश, उत्तर-दक्षिण या दिशांना 3000 किलोमीटर लांब असा पसरलेला असला तरी त्याची पूर्व-पश्चिम रुंदी मात्र अगदीच कमी आहे. त्यामुळेच जपानमधे जागेचे दुर्भिक्ष नेहमीच जाणवते. जपानी लोकसंख्या मुख्यत्वे शहरांच्यात एकवटलेली असल्याने, शहरांची लोकसंख्या व उपलब्ध जागा यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त राहिलेले आहे. त्यामुळे खूप लोक शहरांच्या बाहेरच राहतात. अशा लोकांना त्यांचे शहरातले काम न संपल्यास परत जायला उशीर होतो व एवढ्या उशीरा परत शहराच्या बाहेर जायचा प्रवास करून दुसर्या दिवशी सकाळी परत लवकर कामावर यायचे हे मोठे कठिण काम बनते. यावर उपाय म्हणून कॅपसूल हॉटेलची कल्पना प्रथम जपानमधे निघाली व ती अतिशय लोकप्रिय झाली आहे. ही कॅपसूल हॉटेल्स शहरांना भेट देणार्या व्यावसायिक प्रवाशांमधेही अतिशय लोकप्रिय आहेत.
या हॉटेल्समधे तुम्हाला एका रात्रीसाठी 3फूट रूंद, 3 फूट उंच व 6 फूट लांब अशी एक पेटी शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात, 3200 येन ( सुमारे 30 अमेरिकन डॉलर्स) भाड्याने मिळते. या पेटीत, झोपण्यासाठी एक बेड, टीव्ही/रेडियो व दिवाबत्ती यांची सोय असते. प्रातर्विधी उरकण्याची सोय बाजूला असलेल्या हॉटेलच्याच पण सार्वजनिक स्वच्छतागृहात केलेली असते. हॉटेल्स याच किंमतीत तुम्हाला टूथब्रश, एक नवा शर्ट व अंर्तवस्त्रे देतात. म्हणजे सकाळी उठल्यावर कपडे बदलायचे व कामावर हजर व्हायचे. नेहमीच्या हॉटेल्सच्या दरांच्या मानाने या कॅपसूल हॉटेल्सचे दर अतिशय कमी असल्याने ती खूपच लोकप्रिय झाली आहेत.
हा जपानी प्रकार, आता बिजिंगचे 78 वर्षाचे एक रहिवासी हुआंग रिशिन (Huang Rixin) यांनी, बिजिंगमधल्या हायडिआन डिस्ट्रिक्ट मधल्या लिऊलांगझुआंग या भागात सुरू केला आहे. त्यांनी कॅपसूल अपार्टमेंटची 8 युनिट्स तयार केली आहेत. या कॅपसूल्समधे एका व्यक्तीला 2 मीटर वर्ग एवढी जागा मिळते. प्रत्येक कॅपसूलमधे इंटरनेट कनेक्शन, टीव्ही साठी विजेचे व केबलचे कनेक्शन आणि एक बॅग ठेवता येईल एवढी जागा आहे. श्री. हुआंग यांच्या आराखड्याप्रमाणे या कॅपसूल्समधे उभे सुद्धा राहणे शक्य आहे. तसेच एक छोटे कॉम्प्युटर टेबलही ठेवता येईल. या कॅपसूल्सचे महिन्याचे भाडे फक्त 250 युआन किंवा 30 अमेरिकन डॉलर्स आहे. त्यामुळे ही बिजिंगमधली सर्वात स्वस्त अशी निवासी जागा आहे. श्री. हुआंग यांच्या मताप्रमाणे या कॅपसूल अपार्टमेंटला चांगली मागणी आहे. बिजिंगमधे नोकरी व्यवसाय शोधण्यासाठी येणारे खूप लोक असतात. त्यांच्यासाठी ही कॅपसूल्स आदर्श आहेत. ते येथे जास्तीत जास्त 3 महिने राहू शकतात. तेवढ्यात जर त्यांना नोकरी धंदा मिळाला नाही तर त्यांनी गावाकडे परत जावे हे उत्तम.
मात्र या कॅपसूल्सना पहिली भाडेकरू मिळाली झांग चि ही 25 वर्षाची तरूणी. ती बिजिंगमधे 5 वर्षे राहते आहे व तिला 3000 युआन पगार आहे. ती आपल्या आई-वडीलांसाठी पैसे साठवण्यासाठी या कॅपसूल्समधे राहणार आहे. तिच्या मताने,. एक स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची अडचण सोडली, तर येथे राहण्याला कोणतीच अडचण नाही.
परंतु बिजिंग मधल्या अनेकाना श्री हुआंग यांचा हा नवा उद्योग पसंत नाही. ही कॅपसूल्स आरोग्य व आग या दोन गोष्टीसाठी सुरक्षित नाहीत असे अनेकाना वाटते आहे. सरकारी अधिकार्यांनी हुआंगच्या कॅपसूल्सची पाहणी केली व कमीत कमी 7.5 मीटर वर्ग एवढी जागा आवश्यक असल्याचे ठरवल्याने हुआंग यांना ही पहिली कॅपसूल्स बंद करावी लागली आहेत. परंतु निराश न होता आवाज व आग निरोधक असा नवीन आराखडा बनवण्याच्या मागे हुआंग आहेत. त्यांनी पेटंटसाठी सुद्धा अर्ज केला आहे.
बिजिंगच्या वर्तमानपत्रांच्यात हुआंग यांच्या कॅपसूल्सना प्रसिद्धी दिल्यावर आलेले काही प्रतिसाद वाचनीय आहेत.
" एवढ्या मोठ्या देशात कोणाला या अशा ठिकाणी रहाण्यास लागणे हे देशाचे खरे दुर्दैव आहे व समाजाचे दुख: आहे."
"हे फारच निराशाजनक आहे. दहा वर्षे शिक्षण घेतल्यावर अशा ठिकाणी राहण्यास लागावे. मेल्यावर शवपेटीही एवढीच असते."
" पोलिसांच्या गाड्या म्हणून BMW Cars वापरण्यापेक्षा हे जास्त देशाच्या परिस्थितीनुरूप आहे."
" 96 लाख वर्ग किलोमीटर देश आणि निवास फक्त 2 वर्ग मीटर जास्त दु:खी कोण हे कळत नाही!"
"मृत देह जाळणे बंद करून शवपेट्यांना प्रोत्साहन द्या. प्रत्येकाला एक शवपेटी द्या. त्यात ते राहू शकतात, झाडाला टांगून ठेवू शकतात किंवा पुरून ठेवू शकतात!"
लोकांचे प्रतिसाद काहीही असले तरी श्री हुआंग मात्र आपल्या या उद्योगाबद्दल अतिशय आशाजनक आहेत. ते म्हणतात की "मी पैसे मिळवण्यासाठी हे काम हातात घेतलेले नाही. स्थलांतरित व शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या निवासाची सोय स्वस्तात व्हावी म्हणून हा माझा प्रयत्न आहे. "
25 जून 2010
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा