रविवार, ऑगस्ट ०८, २०१०

रोख भरणा


चीनच्या हुनान प्रांतातल्या चांगशा या शहरात घडलेली ही कथा आहे. मूळ कथेतली चिनी नावे काढून तिथे भारतीय नावे घातली तर ही भारतातल्या कोणत्याही शहरात घडलेली गोष्ट म्हणून सहज खपेल.
आता मूळ कथेकडे वळूया. या चांगशा शहरात बांधकामाचा व्यवसाय करणारे मिस्टर. पेंग हे बांधकाम व्यावसायिकांच्या एका बॅन्केमधे पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी दुपारचे 3 वाजले होते व बॅन्क बंद होण्याची वेळ जवळ आल्याने बॅन्केत बरीच गर्दी होती. मिस्टर पेंग निमुटपणे रांगेत उभे राहून आपली पाळी येण्याची वाट पाहू लागले.
बर्‍याच काळाने मिस्टर पेंग यांची पाळी आली व ते टेलरच्या खिडकीसमोर उभे राहले. त्यांनी टेलरला आपला खाते क्रमांक सांगितला. तो टेलरने संगणकात टंकित केला व पुढे काही तो विचारणार एवढ्यात त्याचा मोबाईल फोन वाजला. तो टेलर कोणाशी तरी दोन शब्द बोलला व एकदम उठून पलीकडच्या बाजूला गेला व एका व्यक्तीशी बोलू लागला. 5 मिनिटे गेली, 10 मिनिटे गेली तरी त्याचे बोलणे काही संपेना. मिस्टर पेंग अतिशय अस्वस्थ झाले कारण त्यांना अजून बरीच कामे करावयाची होती. तो टेलर येण्याचे काही लक्षण न दिसल्याने मिस्टर पेंग यांनी बाजूच्या टेलरला आपल्याला पैसे देण्याची विनंती केली. परंतु शेजारच्या टेलरने त्यांच्याकडे लक्षच दिले नाही व जेंव्हा मिस्टर पेंग यांनी त्याला दोन तीन वेळा विनंती केली तेंव्हा तो त्यांच्यावरच उखडला. " तुम्हाला दिसत नाही का मी कामात आहे ते?" जरा वेळ वाट बघा. मिस्टर पेंगना चरफडत वाट बघण्याशिवाय काही करता येत नसल्याने ते भयंकर भडकले.
आणखी काही वेळानंतर मिस्टर पेंग यांच्या खिडकीसमोरचा टेलर परत जागेवर येऊन बसला व त्याने मिस्टर पेंग यांना काय पाहिजे अशी पृच्छा केली. " मला 50000 युआंन काढायचे आहेत." पेंग यांनी मागणी केली. यावर या टेलरने, बॅन्केच्या नियमाप्रमाणे आगाऊ सूचना दिल्याशिवाय 50000 युआनपेक्षा जास्त रोख रक्कम देण्याबाबत आपली असमर्थता व्यक्त केली. आता मात्र मिस्टर पेंग चांगलेच तापले. " मी 50000 युआन मागतो आहे. ते 50000 पेक्षा जास्ती कुठे आहेत?" मिस्टर पेंग यांचे म्हणणे. "मिळणार नाहीत." इति. टेलर

मिस्टर पेंग आता मात्र भलतेच गरम झाले होते. त्यांना काय करावे ते सुचेना. शेवटी त्यांनी त्या टेलरलाच धडा शिकवायचे ठरवले. "ठीक आहे 49000 युआन द्या." टेलरने तेवढी रक्कम व पावती मिस्टर पेंग यांच्या हातात ठेवली. आता खिडकीसमोरून बाजूला होण्याऐवजी मिस्टर पेंग तेथेच उभे राहिले व त्यांनी 100 युआन ची एक नोट टेलरला दिली व ती आपल्या खात्यात भरायला सांगितली. चीन मधे रक्कम बॅन्केत भरताना स्लिप भरावी लागत नाही. टेलरच तुम्हाला बॅन्केची पावती देतो. टेलरने रक्कम जमा करून घेतली व पावती दिली. मिस्टर पेंग यांनी दुसरी 100 युआन ची नोट पुढे केली व रक्कम खात्यात भरायला सांगितली. हा प्रकार बराच वेळ चालला. पेंग यांच्या हातात आता 30 पावत्या दिसू लागल्या. एव्हाना बॅन्केच्या मॅनेजर पर्यंत या युद्धाची बातमी पोचली व तो केबिन मधून धावत बाहेर आला व त्याने हा प्रकार थांबवण्याची टेलरला विनंती केली. परंतु टेलरही आता हट्टाला पेटला होता व हे युद्ध चालू ठेवण्याची त्याची तयारी दिसत होती. शेवटी मॅनेजरने आपला अधिकार वापरून टेलरची आतमधे बदली केली व हे युद्ध थांबले.
आपल्या हातातल्या 30 पावत्या दाखवत टेलर यांनी मॅनेजरला सांगितले की उद्या मी माझ्या सर्व सहकार्‍यांना प्रत्येकी 10000 युआन देऊन बॅंकेत घेऊन येतो व दिवसभर आम्ही रोख रक्कम भरणा व पैसे काढणे हेच करत राहणार आहोत. बॅन्क मॅनेजरला आपले सर्व कौशल्य वापरून व चहापाणी करून मिस्टर पेंग यांची समजूत काढावी लागली. मिस्टर पेंग बॅन्केतून अखेरीस बाहेर पडले खरे. पण त्यांचा राग काही कमी झाल्यासारखा दिसत नव्हता.
8 ऑगस्ट 2010

1 टिप्पणी:

Nikhil म्हणाले...

My father and I had a such an irritating experience of the peoplein SBI. We wanted to withdraw money for some work. Amount was bit bigger than usual, so the clerk started asking" why do u want so much money?" as if we are asking for a loan or something!

I was enraged and had a pretty vociferous argument with him. The clerk was acting as if he owned the whole thing. My father mediated, otherwise...well , let that be.