भारत आज जगातील दुसर्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात चहाचे उत्पादनच नव्हते. सर्व चहा चीनमधून आयात केला जात असे. इ.स. 1835 मध्ये डॉ.आर्थर कॅम्पबेल या ब्रिटिश अधिकार्याने सिक्किमच्या चोग्यालांच्या मदतीने आपल्या बंगल्याच्या आवारात प्रथम चिनी चहाच्या बिया पेरल्या. त्यांची उतम वाढ झाली आणि त्या शतकाच्या अखेरीपर्यंत ब्रिटिशांच्या मालकीच्याच अनेक चहाच्या बागा आसाम व बंगालमधे चहाचे उत्पादन करू लागल्या.
या आधी हजारो मैलांवरून तिबेटमधून चहा आयात केला जात असे. हा चहा अतिशय काळा आणि कडक होता व तो दोन ते तीन किलो वजनाच्या विटांच्या स्वरूपात आयात केला जात असे. लहान कोकरांच्या कातड्यात ह्या विटा ठेवून ती कातडी शिवण्यात येत असत व अशी चहा भरलेली कातडी तिबेटहून येत असत. हा चहा बनविताना एका मोठ्या लोखंडी भांड्यात या चहाच्या विटा पाण्यात उकळत ठेवून त्यात मीठ, लोणी व बार्ली टाकून चहा तयार करण्यात येत असे. चहाचे शौकिन स्वत:जवळचा लाकडी कप या रसायनाने भरून घेत व त्यांची तल्लफ भागवत.हा चहा ‘थिबेटची वीट’ या नावानी जरी ओळखला जात असला तरी तो तिबेटमधे उत्पादन केलेलाच नसे. चीनच्या अगदी दक्षिणेला, ब्रम्हदेश व लाओस देशांच्या सरहद्दीजवळ असलेल्या ‘युनान’ या प्रांतात या चहाचे उत्पादन होत असे व तेथून तो ल्हासामार्गे भारतात येत असे. युनान आणि भारत यांच्यामधे ज्या वाटेने या चहाचा व्यापार होत असे ती वाट अत्यंत डोंगराळ व कठिण अशा प्रदेशामधून जात होती व त्यामुळेच ही वाट, ‘चहाच्या कारवानांची (किंवा काफल्यांची) घाटनाळ’ (Tea caravan Trail) या नावाने ओळखली जात होती. चीन व मध्य एशिया यांच्यातला ‘रेशीम मार्ग’ (Silk Route) खूप जणांना माहिती आहे. पण ही चहाच्या कारवानांची घाटनाळ फारशी कोणाला माहिती असेल असे वाटत तरी नाही.
आणखी एका कारणाने ही घाटनाळ पाश्चिमात्य देशांमध्ये प्रसिद्धिच्या झोतात आली. 1933 मधे जेम्स हिल्टन या प्रसिद्ध इंग्लिश कादंबरीकाराने, (Paradise Lost) किंवा हरपलेला स्वर्ग, ही प्रसिद्ध कादंबरी लिहिली. कथा नायकाचे विमान हिमालयात अपघातग्रस्त झाल्याने त्याला एका अतिशय सुंदर अशा प्रदेशातून प्रवास करावा लागला व नंतर तो एका अत्यंत स्वर्गीय अशा (Shangri-la) या जागेत पोचला असे काहीसे या कादंबरीचे सूत्र आहे. हा प्रदेश व ही जागा कोणती असावी याबद्दल गेली साठ सत्तर वर्षे चर्चाचर्विरण चालू आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे या लेखकाने हिमालयात कधीच प्रवास केलेला नव्हता व त्याने हे सर्व वर्णन दुसर्या कोणत्या तरी प्रवाश्यांकडून मिळविले होते.
2003 मध्ये, या घाटनाळीवर असलेले व तिबेट-युनानच्या हदीजवळ असलेले झोंगडियान (Zhongdian) हे गांव हिल्टनचे शांग्रि-ला असावे असे अधिकृतरित्या चिनी सरकारने ठरविले. त्यामुळे आता ही घाटनाळ पाश्चिमात्य बॅकपॅकर्समधे अतिशय लोकप्रिय झाली आहे.
चहाच्या काफल्यांची ही घाटनाळ सुरू होते दक्षिणपूर्व युनान प्रांतातील शिसुआंग-बाना (Xishuangbanna) या गावापासून. या गावाजवळ असलेल्या,मेकॉंग नदीच्या परिसरातील डोंगराळ भागात, येथील अतिशय प्रसिद्ध अशा ‘पुएर’ (Pu’er) चहाची लागवड केली जाते.
हा सगळाच भाग अतिशय निसर्गरम्य आहे. बर्फाच्छादित हिम शिखरे, मोठी तळी, देवदार,सुरू आणि फर वृक्षांची जंगले व प्रदुषण विरहित हवा हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. येथून पुढे डाली, लिजिआंग या मार्गाने ही घाटनाळ, वाघ दरी (Tiger-leaping Gorge) जवळ यांगझी नदी ओलांडते. झोंगडियान वरून पुढे जाऊन डेकिन या चीन-तिबेटच्या हदीजवळ असलेल्या गावाजवळ ही वाट येते. नंतर अत्यंत दुर्गम अशा प्रदेशातून ही वाट ल्हासा ला पोचते व ल्हासाहून नाथु-ला खिंडीतून ही वाट सिक्कीमला पोचते.
विसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत या घाटनाळीने येणारा सर्व चहा हमाल स्वत:च्या पाठीवरून आणत असत. प्रत्येक हमाल जवळ जवळ 150 किलो सामान या दुर्गम प्रदेशातून ने आण करत असत. या हमालांच्या कष्टांची व हालांची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.
1962मधल्या भारत चीन युद्धानंतर नाथु-ला ची खिंड बंद झाली व या घाटनाळीवरची वाहतुक पूर्णपणे बंद पडली. जुलै 6, 2006 ला दोन्ही देशात झालेल्या समझौत्याप्रमाणे ही घाटनाळ परत वाहुतुकीसाठी खुली झाली आहे. सध्या तरी या मार्गाने स्थानिक मालाचीच आयात निर्यात होते आहे. परंतु 2012 मध्ये हा भाग आंतर्राष्ट्रीय पर्यटन वा माल वाहुतुकीसाठी खुला होईल. तो पर्यंत या घाटनाळीचे नक्कीच एका मोठ्या घाटात रुपांतर झालेले असेल यात शंका नाही.
या मार्गाने परत चहा कोणी आयात करील असे मात्र वाटत नाही.
16 जून 2009
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा