मंगळवार, डिसेंबर २९, २००९

चिनी जादू




हे छायाचित्र मी माझ्या संगणकात फिरवलेले नाही.. चित्रात पुढे दिसणारी इमारत खरोखरच आडवी आहे. ही इमारत शांघायमधल्या ‘लोटस रिव्हरसाइड’ (Lotus Riverside) या अजून बांधकाम सुरू असलेल्या सदनिकांच्या संकुलात 27 जून 2009 पर्यंत उभी होती.

2008 सालच्या ऑक्टोबर महिन्यात, ‘मॅकिनसे’ (McKinsey) या प्रसिद्ध अमेरिकन सल्लागार कंपनीच्या शांघायस्थित संचालकांनी आपल्या अहवालात असे नमूद केले होते की बिजिंगमधल्या नवीन बांधकामांचा दर्जा इतका नित्कृष्ट आहे की ‘चाओयांग’ (Chaoyang) या मध्यवर्ती व्यापारी पेठेतील, कचेर्‍या असलेले एखादे तरी इमारतींचे संकुल जमीनदोस्त होण्याची शक्यता वाटते. त्यांची ही भविष्यवाणी बिजिंगच्या बाबतीत जरी खरी ठरली नसली तरी शांघायमधील, उच्चमध्यमवर्गीयांसाठी बांधण्यात येणार्‍या या संकुलाच्या बाबतीत तरी खरी ठरली आहे.

एक वर्षापूर्वी चीनमधल्या ‘सिचुआन’ (Sichuan) या प्रांतात झालेल्या एका भयानक धरणीकंपात अनेक शाळांच्या इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या व हजारो निरागस बालकांचे बळी गेले होते. त्यावेळी असे आरोप करण्यात आले होते की बांधकामाचा नित्कृष्ट दर्जा, पोलादाऐवजी लोखंडी कांबींचा वापर या सारख्या कारणांनी या इमारती टिकाव धरू शकल्या नव्हत्या. सिचुआन शासनाने नंतर एक गर्वपूर्ण जाहिरनामा काढून आमच्या प्रांतात धरणीकंपाच्या आधी बांधलेल्या कोणत्याच इमारती नित्कृष्ट दर्जाच्या नव्हत्या असे प्रतिपादन करून नोकरशाही किती बेजबाबदारपणे वागू शकते याचा प्रत्ययच् आणून दिला होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व इमारती या धरणीकंपाच्या हादर्‍यानेच पडल्या होत्या आणि त्यांचा दर्जा उत्तमच होता. 27 जूनच्या शांघायमधील घटनेची जबाबदारी टाकायला, बांधकामाचा रद्दी आणि नित्कृष्ट दर्जा, या कारणाशिवाय दुसरी कोणतीही सबब कोणालाही देणे आता शक्यच नाही. ही घटना चीनमधल्या लोकांना तिथल्या एकूण बांधकामाविषयी सतर्क करणारीच आहे यात शंकाच नाही.
याच प्रकारच्या इतर मोठ्या बांधकाम प्रकल्पांच्या बाबतीतही अशा अनेक घटना अलीकडेच निदर्शनाला आल्या आहेत. 1990 मध्ये बांधलेल्या ‘चायना स्पोर्टस म्युझियम’च्या इमारतीला मोठमोठे तडे गेल्याचे आढळून आले आहे. पश्चिम युनान प्रांतातल्या ‘फेंगहुआंग’ (Fenghuang) येथे बांधलेला राजरस्त्यावरील पूल, 2007 साली, उदघाटन होण्याच्या आधीच पडला. ‘चॉंगकिंग’ (Chongqing) शहरात बांधलेले एक निवासी संकुल त्याल 6 महिने पूर्ण होण्याच्या आधीच बांधकामाच्या नित्कृष्ट दर्जामुळे पाडून टाकावे लागले.

या घटना का घडत आहेत? चीनमधे बांधकाम उद्योगावर अंकूश रहावा म्हणून केलेले नियम जगात सर्वोत्कृष्ट आहेत असे मानतात. तरीही या घटना सातत्याने घडताना दिसतात. एका चिनी बांधकामविषयक तज्ञाचे असे मत आहे की चीनमधली या व्यवसायातील सर्व प्रणाली (System) इतकी भ्रष्ट झालेली आहे की कोणत्याही नियमाला सहज बगल दिली जाते. चीनमधील नियमांनुसार, उंच इमारतींसाठी प्रत्येक वर्गमीटर बांधकामासाठी 80 ते 90 किलो पोलाद वापरणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात 30 किलो पोलादच सर्वसाधारणपणे वापरले जाते. दुसरे उदाहरण, पायासाठी ज्या ‘पाईल्स’ (Piles) घेतल्या जातात त्यांचे देता येते. नियमापेक्षा कितीतरी कमी ‘पाईल्स’वर सध्या इमारती उभ्या केल्या जातात.
बांधकाम व्यावसाईक, आर्किटेक्ट्स व प्रमोटर्स हे प्रचंड हाव सुटल्यासारखे वागत असल्याने, काहीही करून खर्च कमी करण्याच्या मागे असतात, हे या नित्कृष्ट दर्जाचे खरे कारण आहे. नियंत्रक अधिकार्‍यांचे हात ओले करून पाहिजे ती मनमानी ते करू शकतात. कायदेकानू पुस्तकातच रहातात ही खरी परिस्थिती आहे.

या चिनी अनुभवातून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे असे मला वाटते. पुढच्या काही वर्षात भारत सरकार अब्जावधी रुपये मूलभूत उद्योगांवर खर्च करणार आहे अशी बातमी मी कालच वाचली. या सर्व प्रकल्पांमधले आर्किटेक्ट्स, बिल्डर्स आणि ठेकेदार, हे कायद्याच्या व नियमांच्या अंतर्गतच काम करतील अशी कार्यपद्धती सरकारने अंगिकारणे अतिशय आवश्यक आहे, नाहीतर चीनच्याच मार्गाने जाण्यास आपल्याला वेळ लागणार नाही.

5 जून 2009

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: