बुधवार, मार्च २४, २०१०

नारिंगी आकाश


मागच्या शनिवारी बिजिंगमधल्या प्रत्येक डोळस नागरिकाला एक अभूतपूर्व दृष्य बघायला मिळाले. सकाळी सर्व आभाळ नारिंगी किंवा ऑरेंज रंगाचे दिसत होते. त्यानंतर आजूबाजूच्या इमारती, रस्ते, झाडे, रस्त्यावरच्या मोटारी व माणसेही, धुके पसरल्यावर जशी अंधूक अंधूक दिसू लागतात तशी हळू हळू दिसू लागली. परंतु तेंव्हा धुके वगैरे काही पडले नव्हते. ही परिस्थिती निर्माण झाली होती पिवळ्या धुळीच्या वादळामुळे.


बिजिंग शहराच्या पश्चिमेला व अग्नेय दिशेला सुमारे 800 किलोमीटर अंतरावर गोबीचे सुप्रसिद्ध वाळवंट आहे. या वाळवंटाभोवतालचा परिसर व उत्तरेला असलेला मंगोलिया देशाचा भाग येथे गेले काही महिने पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. त्याशिवाय कोणत्याही कुरणावर गुरे चारणे, बेबंद लाकूडतोड व नागरी वस्तीत झालेली वाढ यामुळे चीनमधला अंदाजे एक तृतियांश भूभाग आता वाळवंटच बनला आहे. या सर्व भागात हिवाळा आता संपला असल्यामुळे सकाळी सूर्य उगवल्यावर जे गरम वारे वाहू लागतात त्याबरोबर वाळवंटातील धूळ वर उचलली जाते. हवामानातील परिस्थितीमुळे या धुळीची जोरदार वादळे होतात. असेच एक धुळीचे वादळ बिजिंगवर शनिवारी कोसळले होते. या वादळाने एवढी धूळ बिजिंगमधे आणली की दुसरे दिवशी सकाळी सर्व जमीन पिवळ्या रंगाची झाल्याचे दिसत होते. असा अंदाज आहे की या वादळाने निदान 3 लाख टन धूळ तरी बिजिंगवर टाकली असावी
 

या वादळाचा फटका शिंजियांग, इनर मंगोलिया, शान्शी व हेबेई प्रांतानासुद्धा बसला. यानंतर हे वादळाने दक्षिण कोरियाकडे कूच केले. ही वादळे येण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे या सर्व भूभागात असलेली झाडे झुडपे एकोणिसशे पन्नासच्या दशकात शेती वाढवण्यासाठी उपटून टाकली गेली हे आहे. या भागात शेती जगू शकली नाही व भूभाग फक्त वाळवंटी बनला. आता या भागात हजारो एकर प्रदेशात झाडे लावण्याची मोहीम सरकारने हातात घेतली आहे परंतु त्याचा परिणाम दिसण्यासाठी अजून काही दशके तरी वाट पहावी लागेल
 

चीनच्या उत्तर भागात यावर्षी अतिशय कडक हिवाळा होता. सर्व जमीन बर्फाने झाकली गेली होती व असंख्य हिमवादळे झाली होती. जमीनीवरील बर्फ वितळून गेल्याबरोबर जमीनीवरील धूळ हवेत उडू लागली आहे
 

मागच्या वर्षभरात चीनच्या नैऋत्य भागात असलेल्या युनान, सिचुआन व गुईझाऊ या प्रांतांच्यात पर्जन्य वृष्टी सरासरीच्या निम्मीच झाली आहे. यामुळे या सर्वच भागात पाण्याचे अतिशय दुर्भिक्ष्य जाणवते आहे. चिनी सरकारला पाणी पुरवठा करण्याकरता 4000 सैनिकांना तैनात करावे लागले आहे.
24 मार्च 2010

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: