बुधवार, सप्टेंबर २९, २०१०

श्रेष्ठतेचा हव्यास की भ्रष्टाचार?


काही दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनीच ही बातमी वाचली असेल की चीन हा देश आता जगातील द्वितीय क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनला आहे. आपला देश सर्वात भव्य व श्रेष्ठ असावा, आपल्या देशातल्या इमारती, सुविधा, वाहतुक व्यवस्था, कारखाने अगदी आधुनिक असावेत आणि आपला देश प्रथम दर्जाचा असावा अशी इच्छा कोणत्याही देशाची असणार त्याचप्रमाणे चिनी लोकांचीही असते. परंतु चीन बद्दलची एखादीच अशी बातमी वाचनात येते की सर्व गोष्टींचे आधुनिकीकरण करण्याचा एखादा गंड तर या देशाला झालेला नाही ना अशी मनात शंका येऊ लागते.
जगामधले सर्वात जास्त बांधकाम चीन मधे होते आहे. दर वर्षाला या देशात 200 कोटी वर्ग मीटर एवढे नवीन बांधकाम होते. या बांधकामासाठी हा देश जगाच्या एकूण सिमेंट व पोलाद उत्पादनापैकी 40 % वापरत असतो. मात्र नवीन आणि आधुनिक इमारती बांधण्याच्या या हव्यासासाठी योग्य भूखंड सारखे कोठून मिळणार? त्यामुळे 10/15 वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती सुद्धा आता पाडल्या जाऊ लागल्या आहेत. या इमारती खरे तर अतिशय उत्तम अवस्थेत असल्या तरी त्या सुरुंग लावून पाडल्या जातात. एकीकडे पर्यावरण व पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पदार्थ किंवा खनिज स्त्रोतांचा न्यूनतम वापर केला पाहिजे असे पर्यावरण तज्ञ सांगत असताना हे उपलब्ध स्त्रोत अनावश्यक रित्या वापरण्याच्या या अट्टाहासाला गंडच म्हटले पाहिजे.
अशा नुकत्याच पाडलेल्या काही इमारतींची उदाहरणे.
 1. Vienna Wood Community in Hefei City; ही 20000 वर्ग मीटर एरिया असलेली वसाहत पूर्ण होण्याच्या आधीच 2005 साली पाडण्यात आली. या वसाहतीची मुख्य इमारत 58.5 मीटर उंच होती. या इमारतीच्या 16 व्या मजल्याचे काम चालू असतानाच ही इमारत पाडण्यात आली व अनेक कोटी युआन अक्षरश: मातीत गेले. इमारत पाडण्याचे कारण- स्थानिक प्रशासनाला असे वाटले की या शहरातल्या हुआनशान रस्त्यावरून जवळचा डाशूशान पर्वत, ही इमारत मधे आल्यामुळे नीट दिसू शकत नाही व त्यामुळे शहराचे सौंदर्य कमी होते आहे
 2. The Bund Community in Wuhan यांगत्झी नदीचा व्ह्यू कोणत्याही अपार्टमेंट मधून दिसेल अशी जाहिरात केलेली ही वसाहत, 2002 मधे पाडण्यात आली. ही वसाहत पाडण्याच्या आधी सर्व वैधानिक परवानग्या घेण्यात आलेल्या होत्या. परंतु पूर्ण झाल्यावर, या वसाहतीमुळे यांगत्झी नदीच्या पूर नियंत्रण कायद्यांचा भंग होतो आहे असा शोध लागला. मूळचा 2 कोटी युआन खर्च तर धुळीत गेलाच पण या जागेचे सुशोभीकरण करण्यासाठी आणखी बराच खर्च आला
 3. Yuxi Exhibition Center चोन्गचिन्ग महानगरपालिकेच्या यांगचुआन या भागात ही वैशिष्ट्यपूर्ण इमारत होती. ती बांधण्यास 4 कोटी युआन खर्च आला होता. येथे प्रदर्शने आयोजित होत असत. ही इमारत एका खाण उद्योजकाने विकत घेतली व फक्त 5 वर्षे जुनी असतानाच 2005 मधे पाडून टाकली. पाडण्यासाठी 250 Kg. डायनामाईट वापरावे लागले होते. या ठिकाणी आता एक पंचतारांकित हॉटेल बांधले गेले आहे
 4. Zhongyin Building in Wenzhou City ही 93 मीटर उंच इमारत 1997 मधे बांधली होती. बांधल्यानंतर लगेचच, हे बांधकाम शहरातला सर्वात मोठा आर्थिक गुन्हा म्हणून गणले जाऊ लागले. 43 व्यक्तींच्यावर 3 कोटी युआनचा भ्रष्टाचार केल्याबाबत गुन्हे दाखल केले गेले. त्यामुळे या इमारतीला भ्रष्टाचार सदन असे म्हणत असत. या बांधकामात सुरक्षा नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले असल्याने ही 2004 मधे पाडून टाकण्यात आली
 5. Shouyi Sports Centerही 10 वर्षे जुनी असलेली इमारत 2009 मधे पाडली गेली. हुबेई प्रांतामधले अनेक खेळाडू या ठिकाणीच सराव करून पुढे विश्वविजेते झाले होते. 1911 सालच्या क्रांतीची शताब्दी साजरी करण्यासाठी एक संग्रहालय या जागेवर बांधण्याचे ठरल्यावर ही पाडून टाकण्यात आली
 6. Five Lake Hotel in Nancang City, 13 वर्षे जुने हॉटेल 2010 पाडले. हे हॉटेल नानकान्ग शहरातली उल्लेखनीय जागा म्हणून गणली जात असे. हॉन्गकॉन्गच्या एका कंपनीने हे हॉटेल विकत घेतले व त्याचे पंचतारांकित हॉटेल बनवण्यासाठी जुनी इमारत पाडून टाकली. 40000 टन राडा रोडा निर्माण झाला आहे. त्याची विल्हेवाट लावण्यास मोठे प्रयत्न चालू आहेत
7. Shenyang Summer Palace, शहरात असलेले नागरिकांच्या करमणूकीचे हे एक मोठे केंद्र होते. पहिल्या 5 वर्षात या ठिकाणाला 4 कोटी पर्यटकांनी भेट दिली होती. 15 वर्षे जुनी ही इमारत 2009 मधे सदनिका बांधण्यासाठी पाडली
 8. Zhejiang University’s No. 3 building in lakeside campus, 67 मीटर उंच 20 मजले असलेली इमारत विद्यापीठाच्या या कॅम्पसवरची सर्वात मोठी इमारत होती. विद्यापीठाने ही इमारत या जागी व्यापारी संकुल बांधण्यासाठी 24.6 कोटी युआनला विकली. ही पाडली तेंव्हा विद्यापीठाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी तो दिवस एक दुख:द दिवस म्हणून मानला होता
9. Tsingtao Railway Building, 16 वर्षे जुनी असलेली या शहरातली उल्लेखनीय वास्तू, 2008 च्या ऑलिंपिक खेळांच्या वेळच्या बांधकाम कार्यक्रमात पाडली
10. Shenyang Wulihe Stadium, चीनच्या फुटबॉलची मक्का समजत असत. 25 कोटी युआन खर्च करून बांधलेले हे स्टेडियम 2007 मधे 18 वर्षांनंतर पाडले गेले. 16 कोटी युआनला या जागेचा लिलाव करण्यात आला.
 11. “Asian First Arc” in Shanghai, शांघाई मधल्या सुप्रसिद्ध बंडचा देखावा अतिशय सुंदर दिसतो म्हणून हा रस्ता प्रसिद्ध होता. बांधल्यानंतर 10 वर्षांनीच बंड भागाचे रिमॉडेलिंग करण्याचा निर्णय झाला व हा रस्ता 2008 मधे पाडला गेला.
5/10 वर्षे जुन्या झालेल्या इमारती पाडण्याच्या खुळामागे काय मानसशास्त्र आहे हे सांगणे खरोखरच फार कठिण आहे. चीनमधे सर्व निर्णय अधिकारी पातळीवर घेतले जातात. त्यामुळे कोणती जागा विकसित करायची किंवा कोणती इमारत पाडून नवी बांधायची याचे निर्णय अधिकारीच घेतात. नागरिकांना तो निर्णय मान्य नसला तरी असहाय्यपणे बघत रहाण्याशिवाय दुसरे काही करता येत नाही. अधिकारी हा निर्णय घेताना बर्‍याच वेळा वैयक्तिक स्वार्थासाठी तो घेत असले पाहिजेत हे वेनझाऊ शहराच्या उदाहरणावरून स्पष्टच दिसते आहे. ही बांधकामे पाडणे म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचा केवढा दुरुपयोग आहे हे बहुदा शासनाच्या लक्षातच येत नसावे. आपल्याकडे प्रत्येक प्रकल्पाला होणारी दिरंगाई व फाटे बघितले की पुष्कळ वेळा नको ती लोकशाही असे वाटते परंतु लोकशाही मधे असलेल्या अधिकार्‍यांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर असलेला लोकप्रतिनिधींचा अंकुश ही किती आवश्यक बाब आहे हे चीनमधल्या या इमारती पाडण्याच्या प्रकारांमुळे चांगलेच लक्षात येते.
29 सप्टेंबर 2010

1 टिप्पणी:

Narendra prabhu म्हणाले...

या इमारती पाडणे याला आपण म्हणता त्या प्रमाणे 'खुळ' या शिवाय दुसरा शब्द नाही. भ्रष्टाचार हेच त्या मागचे मुख्य कारण असावे. लेख खुप छान आणि माहितीपुर्ण आहे.