मंगळवार, फेब्रुवारी ०९, २०१०

शांघायचे पायजमा सूट्स

दुपारचा एक किंवा दोन वाजले आहेत. तुम्ही एका चिक्कार रहदारी असलेल्या रस्त्यावर आहात. रस्त्याने अनेक लोक जा- ये करताना दिसत आहेत. अशा वेळी तुम्हाला मोठ्या वयाचे पुरुष, भडक व चिवट्या बावट्याचे डिझाईन असलेला पायजमा व टॉप अशा रात्रीच्या कपड्यात इकडे तिकडे फिरताना दिसले तर तुम्ही काय समजाल? हे लोक कोणत्या तरी फॅन्सी ड्रेस स्पर्धेला चालले आहेत म्हणून! का एखाद्या पायजमा पार्टीला चालले आहेत म्हणून? पण या वेळी तुम्ही जर शांघाय या शहरात असलात तर हा अंदाज पूर्ण चूकीचा ठरेल हे समजा. असे पायजमा सूट घालणे ही शांघाय मधली एकदम इन फ़ॅशन आहे. पायजमा सूट जेवढ्या भडक रंगाचा आणि त्यावरचे डिझाईन जेवढे बटबटीत तेवढा तुमचा ड्रेस एकदम फॅशनेबल असे समजले जाते
 
शांघायमधे हे पायजमा सूट एवढे लोकप्रिय कधीपासून झाले असा प्रश्न तुमच्या आमच्या मनात साहजिकच येईल. असे मानले जाते की शांघायमधे 1930 च्या सुमारास कोणाकडेही फॅशनेबल झोपण्याचा वेष असणे हे मोठे प्रतिष्ठेचे व मानाचे लक्षण मानले जात असे. त्यामुळे ज्यांच्याकडे असे वेष असत ते आपले हे वेष सर्वांच्या नजरेला पडावे म्हणून त्या वेषातच दिवसभर रहात. तेंव्हापासून ही प्रथा शांघायमधे सुरू झाली. आता स्थानिकांच्याबरोबर अगदी परदेशी पाहुणेही याच वेषभूषेत सर्रास दिसतात. शांघायमधे चक्रम व छांदिष्ट असे लोक खूप आहेत असे म्हणतात. दिवसा पायजमा सूट घालणारे त्यांच्यापैकीच आहेत असे अनेकांना वाटत असले तरी हे लोक शांघायचे एक वैशिष्ट्य आहेत हे मात्र खास
अजून तीन महिन्यांनी शांघायमधे 'World Expo' हे एक जागतिक दर्जाचे प्रदर्शन सुरू होणार आहे. त्याच्या निमित्ताने शहरात अनेक देशांचे व प्रतिष्ठित पाहुणे येतील अशी अपेक्षा आहे. या पाहुण्यांच्या समोर शांघायच्या नागरिकांनी हे गबाळे व अशिष्ट कपडे परिधान करू नये असे शांघायच्या स्थानिक सरकारी अधिकार्‍यांना वाटते. लोकांनी ही गचाळ सवय सोडून द्यावी म्हणून मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यापासूनच एक अभियान या अधिकार्‍यांनी चालू केले आहे. अनेक विभागात मोहल्ला समित्या स्थापन करून त्यांच्यामार्फत लोक जागृती करण्यात येत आहे. या अधिकार्‍यांनी भ्रष्टाचार करणे सारख्या अनिष्ट प्रथांच्या रांगेतच हे पायजमा सूट परिधान करणे ही प्रथा घालून टाकली आहे.
झांग जिहाय (Zhang Jiehai) या समाजशास्त्रज्ञाला या प्रथेचे कारण शांघायमधली अत्यंत छोटी व दाटीदाटीची घरे हे वाटते. ही घरे आपल्याकडच्या झोपडपट्टीसारखीच असल्याने खाजगी आयुष्य़ व सार्वजनिक आयुष्य यातली सीमारेषा फार पुसट असते. त्यामुळे या पायजमा सूट्सना एक सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्यामुळेच उन्हाळ्याच्या गरमीत, कोणालाही भेटण्यास जाणे, गल्लीबोळांच्यातून फिरणे, सुपरमार्केट्समधे खरेदी करणे या सगळ्यासाठी पायजमा सूट हा वेष सर्वात उत्तम असल्याचे सर्वमान्य आहे.
शांघायच्या दाट लोकवस्तीच्या भागात अजूनही पायजमा सूट्स घालणारे निष्ठावान लोक आहेत. त्यांच्यावर सरकारी प्रचाराचा काही फारसा प्रभाव पडला आहे असे वाटत नाही. काहीही असले तरी या लोकांना भ्रष्टाचारी लोकांच्या रांगेत बसवण्याची कल्पना काही फारशी योग्य आहे असे वाटत नाही.
9 फेब्रुवारी 2010

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: