बिजिंग
महानगराच्या उत्तर परिमितीवर,
टॅन्जिआलिंग(Tangjialing)
या नावाचे
एक खेडेगाव आहे.आज
या खेडेगावाचे स्वरूप मुंबईमधल्या
धारावी सारखी एक झोपडपट्टी
असेच झालेले आहे.
मूळ 3000लोकांच्या
या वस्तीत आता दाटी वाटीने
50000 लोक
रहात आहेत. या
पैकी बहुसंख्य तरूण सुशिक्षित
आहेत. बरेचसे
लोक इंजिनीअरिंगचे पदवीधर
सुद्धा आहेत. हे
सर्व लोक मोडक्या तोडक्या
इमारतींमधे छोट्या छोट्या
खोल्यांच्यात रहातात.
आजुबाजूच्या
रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात
घाण व केरकचरा पडलेला असतो.
असे असूनही
या खोल्यांची भाडी काही कमी
नाहीत. बिजिंगच्या
थंडीला तोंड देण्यासाठी,
घर गरम
करण्याच्या काहीच सुविधा या
खोल्यात नसतात.
त्यामुळे
या थंडीला तोंड देतच या मुलांना
आयुष्य कंठावे लागते.
टॅन्जिआलिंग
पासून डाऊनटाऊन बिजिंगला
जाण्यासाठी फक्त सहा बस मार्ग
आहेत. त्यामुळे
बस प्रवास अत्यंत कंटाळवाणा
व क्लेशदायक आहे.
असे सगळे
जरी असले तरी दहा बाय दहाच्या
टॅन्जिआलिंग मधल्या खोलीला
550 युआन
एवढे तरी भाडे द्यावेच लागते.
या ठिकाणी
रहाणार्या मुलांचे सरासरी
मासिक उत्पन्न 2000
युआनच्या
आसपास असते.
म्हणजेच
पगाराचा एक पंचमाश भाग तरी
या भाड्यापोटी जातो.
या
मुलांना चीनमधे मुंग्याची
टोळी या नावाने आता ओळखले जाऊ
लागले आहे. ही
मुले हुशार,
कष्टाळू
व दुर्लक्षिलेली असल्याने
इतर मुलांबरोबर ग्रूप्स करून
रहाणाशिवाय त्यांना गत्यंतरच
नसते. बिजिंगच्या
या मुंग्या बहुतांशी चीनमधील
खेडेगावातून आलेल्या असतात.
22 ते 29
या वयोगटीतली
ही मुले बहुतांशी कुठल्यातरी
फारशा माहित नसलेल्या व चीनच्या
आडाकोपर्यात असलेल्या
विद्यापीठांचे पदवीधर असतात
व सध्या हॉटेलमधले वेटर,
इन्शुरन्स
विक्रेते किंवा संगणक मेकॅनिक
या सारखी कामे करत असतात.
उदाहरण
द्यायचे झाले तर 'डेंग
कुन' हा
एक बायोमेडिकल इंजिनीयरिग
शाखेचा पदवीधर आहे.
तो कॉलेजात
असताना त्याची इच्छा आधुनिक
हॉस्पिटल सामुग्रीचे डिझाईन
करण्याची होती.परंतु
त्याला नोकरीच मिळालेली नाही.
तो या
झोपडपट्टीत मित्राबरोबर
राहून व्हिडियो गेम्स खेळण्यात
वेळ घालवतो आहे.
तो म्हणतो
की बिजिंगमधे नोकरी मिळवणे
अतिशय अवघड गोष्ट आहे.
टॅन्जिआलिंग
मधे रहाणार्या या मुलांकडे
इतर भागातील लोक खालच्या
नजरेने बघतात.
त्यामुळे
या ठिकाणाहून बाहेर पडण्याची
सर्वांची धडपड चालू असते.
1999 साली
चीनमधे शिक्षणाचे फार मोठ्या
प्रमाणात विस्तारीकरण झाले.
नवीन नवीन
कॉलेजे सुरू झाली.
यामुळे 2003
मधे पहिल्यांदा
उच्चांकी संख्येने पदवीधर
बाहेर पडले.
गेल्या
वर्षी 60 लाख
पदवीधर बाहेर पडले त्यापैकी
20 लाख
अजूनही बेकारच आहेत.
2000 साली फक्त
10 लाख
पदवीधर बाहेर पडले होते.
एवढ्या
लोकांना त्यांच्या शिक्षणास
साजेशी नोकरी देणे चीनमधल्या
अर्थव्यवस्थेला,
अत्यंत
वेगाने वाढ होत असूनही शक्य
नाही. या
मुलांच्या पैकी अनेक मुले
आवड नसताना दुसरा मार्ग नाही
म्हणून सैन्यात नोकरी करू
लागली आहेत.
बिजिंगच्या
या मुंग्या आता शांघाय,
ग्वांगझू,
वुहान,
शियान(Shanghai,
Guangzhou, Wuhan and Xi'an.) सारख्या
इतर शहरातही पसरू लागल्या
आहेत.
'लियान
सि' या
post-doctoral fellow at the Center
for Chinese and Global Affairs of Peking University संशोधकाने
नुकतेच 'मुंग्यांच्या
टोळ्या' (Ant Tribe)या
नावाचे व या मुलांच्या बद्दलचे
एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे.
त्याच्या
मते चीनमधे आता 30
लाखाहून
आधिक मुले तरी या स्वरूपाचे
जीवन निरनिराळ्या शहरांच्या
मधे जगत असावीत.
मुंग्यांप्रमाणेच
ही मुले हुशार व कष्टाळू आहेत.
आपल्या
शिक्षणाला साजेसे काम त्यांना
मिळत नसल्याने ती मुले जास्त
जास्त फ्रस्ट्रेट होत आहेत.
'लियान सि'
म्हणतो की
पुढच्या काही वर्षात या मुलांचा
प्रश्न हा चीन मधला सर्वात
महत्वाचा प्रश्न बनणार आहे.
एका चिनी
म्हणीप्रमाणे दहा हजार मैलाचे
धरण सुद्धा मुंग्यांच्या
झुंडीने नष्ट होऊ शकते.
म्हणूनच
या मानवी मुंग्या चीनमधला एक
ज्वलंत प्रश्न बनत चालला आहे.
14 फेब्रुवारी
2010
1 टिप्पणी:
aapla blog pharach chan aahe. Asech uttam uttam mahiti mhala det ja.
shubhechha!
टिप्पणी पोस्ट करा