शनिवार, ऑगस्ट २८, २०१०

वाहतुक मुरंबा -चिनी पद्धतीचा


पंधरा वीस वर्षांपूर्वी म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे नव्हता त्या वेळेला, पुणे-मुंबई प्रवास हा मोठा बेभरवशाचा मामला असे. प्रवासाला किती वेळ लागेल? हे सांगणे कोणालाच शक्य नसे. याचे प्रमुख कारण म्हणजे खोपोली जवळच्या बोर घाटात दररोज होणारा वाहतुक मुरंबा. कधीही बघितले तरी शे पाचशे ट्रकची धुडे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी किंवा मुंगीच्या पावलांनी पुढे सरकताना दिसत. एक दोन वेळा तर पाच सहा तास या घाट रस्त्यावर अडकून पडल्याचेही मला चांगलेच स्मरते आहे

चीनची राजधानी बिजिंग मधून 110 नंबरचा एक्सप्रेस वे, वायव्येला असणार्‍या हेबेई प्रांतातल्या झांगजियाकाऊ (Zhangjiakou in Hebei Province) शहरापर्यंत जातो. बिजिंग शहराच्या अगदी उत्तरेला असलेला या रस्त्याचा भाग चांगपिंग या बिजिंग म्युन्सिपालिटीच्या एका प्रभागात मोडतो. हाच रस्ता नंतर पश्चिमेला वळतो व त्यानंतर या रस्त्याला बिजिंग-तिबेट हायवे असे नाव दिलेले आहे. बिजिंग जवळ असलेल्या रस्त्याच्या या भागावर नेहमीच काहीतरी बांधकाम चालू असते. त्यामुळे या भागामधे फक्त 4 टनापर्यंत वजन वाहून नेणार्‍या ट्रक्सना खरेतर परवानगी आहे

प्रत्यक्षात मात्र 8 टनापर्यंत वजन नेणारे ट्रक्स या मार्गावरून बिनधास्तपणे जा ये करताना नेहमीच दिसतात. वाहतुकीचा मुरंबा ही गोष्ट या कारणामुळेच या रस्त्यावर काही नवीन नाही. परंतु मागच्या 14 ऑगस्टपासून सुरू झालेला या रस्त्यावरचा वाहतुक मुरंबा व त्यामुळे झालेला खोळंबा यांना अभूतपर्व म्हणावे लागेल

चीन ही जगातील दोन नंबरची आर्थिक महासत्ता झाल्याची ग्वाही मागच्या आठवड्यात वृत्त माध्यमांनी दिली होती. 14 ऑगस्टचा वाहतुक मुरंबा या नव्या स्थानाला साजेसा आहे यात शंकाच नाही. बिजिंग आणि हेबेई प्रांतातल्या हुआईआन व इनर मंगोलिया प्रांतातल्या जिनिंग पर्यंत 100 किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा 19 ऑगस्टपर्यंत तयार झाल्या होत्या. एवढा मोठा मुरंबा झाल्याने अनेक वाहने साहजिकच बंद पडली व छोटे छोटे अपघात रस्त्यावर होऊ लागले. यामुळे या मुरंब्यात भरच पडली आहे. 110 क्रमांकाच्या हायवेवर जे बांधकाम चालू आहे त्यामुळे या रस्त्याची वाहनक्षमता खूपच मर्यादित झाली आहे असे एका वाहतुक अधिकार्‍याचे म्हणणे असल्याचे ग्लोबल टाईम्स ही चिनी वृत्तसंस्था म्हणते


या वर्षी कोळसा व फळे यांची वाहतुक करणार्‍या ट्रक्सच्या संख्येत खूपच वाढ झाली आहे. या वाढत्या रहदारीला तोंड देण्यासाठी ट्रक्सनी दुसर्‍या बाह्य रस्त्यांचा उपयोग केला पाहिजे असे त्यांना सरकारकडून सांगण्यात येते. परंतु हे ऐकण्याच्या मनस्थितीत फारसे ट्रक ड्रायव्हर दिसत नाहीत. होहहोत(Hohhot) पासून टिआनजिन( Tianjin) ला कोळसा घेऊन जाणारा वॅन्ग़ या ड्रायव्हरकडे यासंबंधी एका वृत्त वार्ताहराने चौकशी केली असता मी लांबच्या रस्त्याचा वापर करून माझे जास्त इंधन का खर्च करू? व जास्त टोल का म्हणून भरू? असेच त्या वार्ताहराला सांगितले. हुआईआन जवळ रस्त्यावर ट्रक उभा करून शांतपणे बसलेला हुआंग हा एक ड्रायव्हर म्हणतो की खोळंब्यापेक्षा आम्हाला इथे रस्त्यावर जे अन्नपदार्थ विकले जातात त्यांच्या विक्रेत्यांचाच त्रास व राग जास्ती येतो आहे. हे विक्रेते इन्स्टन्ट नूडल्स नेहमीच्या पेक्षा चौपट किंमतीला आम्हाला विकत आहेत. या रस्त्यावर मागचे 3 दिवस व 2 रात्री हा ड्रायव्हर अडकून पडला आहे. तो इतर ड्रायव्हर्सबरोबर पत्ते किंवा जुगार(Mohong) खेळण्यात किंवा नुसते वाट बघत बसून वेळ घालवतो आहे


सरकारने 400 च्यावर जादा पोलिस अधिकार्‍यांना 24 तास या रस्त्यावर बंदोबस्तासाठी पाठवले आहे. याशिवाय सरकार फारसे काही करू शकेल असे दिसत नाही. परंतु हा वाहतुक मुरंबा कमी हो ऊन वाहतुक परत सुरळित सुरू होण्यासाठी किमान महिना तरी लागेल असे तज्ञ म्हणतात. Institute for Urban and Environmental Studies at the Chinese Academy of Social Sciences. या संस्थेचे संचालक निऊ फेन्ग्रुई हे म्हणतात की चीनमधे रस्त्यावर वाहतुक मुरंबा नाही ही खरे म्हणजे एक बातमी होऊ शकते, इतकी परिस्थिती वाईट आहे. रस्त्यांचे नियोजन व कामाचा दर्जा अतिशय नित्कृष्ट आहे. नवी बांधकामे पूर्ण करण्याचा वेगही अतिशय मंद आहे

रस्त्यावरचा वाहतुक मुरंबा साफ करण्यासाठी एक महिना लागणार हे वाचून सुद्धा मला गरगरल्यासारखे झाले. भारतातल्या रस्त्यांवरची परिस्थिती यापेक्षा काही फार जास्त चांगली आहे असे म्हणता येणार नाही. रस्त्याचे नियोजन आणि भविष्यकालात काय घडू शकेल याचा अयोग्य अंदाज हे या परिस्थितीला प्रमुखतेने कारणीभूत आहेत असे वाटते. आपल्याकडच्या नियोजकांनी योग्य योजना बनवून ती कार्यवाहीत आणणे किती महत्वपूर्ण आहे हे या चीनमधल्या उदाहरणाने स्पष्ट केले आहे.
28 ऑगस्ट 2010
(या घटनेची बातमी मला माझे एक वाचक श्री स्मित गाडे यांनी ई-मेलद्वारे पाठवली होती त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. )

































५ टिप्पण्या:

mannab म्हणाले...

आपले हे चीनविषयक लिखाण मला आवडते. त्यात मला इतिहास म्हणून रस आहे . आज चीनबाबत एक खळबळजनक बातमी आली आहे. पाकने परस्पर आंदण म्हणून दिलेल्या पाकव्याप्त काश्मीर मध्ये चीन बोगदे आणि काही काही बांधकाम करत आहे. याला राजनैतिकदृष्ट्या खूप महत्व आहे. आपण याबाबत अधिक माहिती लिहावी अशी विनंती आहे.
मंगेश नाबर

Akshardhool म्हणाले...

माझ्या ब्लॉगमधले लेख वाचायला आपल्याला आवडतात हे वाचून अर्थातच आनंद झाला. धन्यवाद.

आपण म्हणता त्या प्रमाणे पाकव्याप्त कश्मिर मधे 12000 चिनी सैनिक बांधकाम करण्यासाठी आल्याची बातमी मी वाचलेली आहे. पाकव्याप्त कश्मिरच्या अगदी उत्तरेला असलेल्या हुंजा नदीचा प्रवाह दरडी कोसळल्यामुळे थांबलेला आहे. या प्रवाहामुळे एक विशाल कृत्रिम जलाशय निर्माण झालेला असून या जलाशयाखाली चीनने पाकिस्तानी भूमीवर बांधलेल्या काराकोरम हायवे चा 25 किलोमीटर भाग बुडून या रस्त्याने होणारे दळणवळण पूर्ण थांबले आहे. या परिस्थितीमुळे पाकिस्तान सरकार चीनला पूर्ण शरण गेले असून त्यावर उपाय करण्याची विनंती त्यांनी चीनला केलेली आहे. माझ्या मताने हे चिनी सैनिक या कामासाठी या भागात आले असावेत. या महिन्याभरात जर ते काही करू शकले तर ते उपयोगी ठरेल. या बाबतीतला माझा एक लेख
http://chandrashekhara.wordpress.com/2010/08/07/%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80/
या दुव्यावर आहे. तो आपण जरूर वाचावा.

अनामित म्हणाले...

नमस्कार

मी संदीप आपल्या ब्लॉग चा एक वाचक . आपला ब्लॉग खरंच सर्व ब्लॉग्स पेक्षा खूप वेगळा आहे. चीन ह्या दुरवरच्या देशा बद्दल आपण जी माहिती देतात ती खूप मनोरंजक असते. मला ही चीन बद्दल खूप कुतूहल आहे. तिथला भूप्रदेश , माणसं , लोकजिवन खूप वेगळ आहे. तिथली संस्कृती फार वेगळी आहे. माझ्यामते चीन मधे बर्‍याच रहस्यमय गोष्टी आहेत . त्या जगासमोर यायला हव्यात. आपण हे काम करतात ह्या बद्द्ल आपले आभार मानतो.

पण भारताच्या दृष्टीने चीन ही मोठी डोकेदुखी आहे. हा देश कधी ना कधी आपल्याला फार त्रासदायक ठरणार आहे. किंबहूना चीन आपल्याला त्रास देण्याची संधी पाहत आहे. आज नाही तर उद्या त्यांव्याशी दोन हात करावे लागणार आहे. चीन सर्व बाबतीत भारतास भारी आहे. यदाकदाचित युध्द झाले तर तो आपणास फार जड पडेल ह्यात शंका नाही . आणि तसे झाले तर आपला देशच युध्दभुमी ठरेल. चीन शी दोन हात करायला माझ्यामते लष्करी ताकदीपेक्षा आपले राजकिय नेतृत्व सक्षम हवे . हल्लीचे सरकार फार कुचकामी आहे. ह्यांच्याच पुर्वजांनी आपला फार मोठा भुभाग गमवला.

असो ..... आपले सर्व लेख फार छान आहेत . माझ्या वडीलांना संगणक हाताळता येत नाही . नाही तर त्यांना आपले लेख खूप आवडले असते. त्यांचे नुकतेच डोळ्यांचे ऑपरेशन झाले असल्याने वाचू पण शकत नाहीत.

आपल्या लेखनास माझ्या हार्दिक शुभेच्छा !

आपला वाचक

संदीप (sandydeokar@gmail.com)

sandeep म्हणाले...

नमस्कार

मी संदीप आपल्या ब्लॉग चा एक वाचक . आपला ब्लॉग खरंच सर्व ब्लॉग्स पेक्षा खूप वेगळा आहे. चीन ह्या दुरवरच्या देशा बद्दल आपण जी माहिती देतात ती खूप मनोरंजक असते. मला ही चीन बद्दल खूप कुतूहल आहे. तिथला भूप्रदेश , माणसं , लोकजिवन खूप वेगळ आहे. तिथली संस्कृती फार वेगळी आहे. माझ्यामते चीन मधे बर्‍याच रहस्यमय गोष्टी आहेत . त्या जगासमोर यायला हव्यात. आपण हे काम करतात ह्या बद्द्ल आपले आभार मानतो.

पण भारताच्या दृष्टीने चीन ही मोठी डोकेदुखी आहे. हा देश कधी ना कधी आपल्याला फार त्रासदायक ठरणार आहे. किंबहूना चीन आपल्याला त्रास देण्याची संधी पाहत आहे. आज नाही तर उद्या त्यांव्याशी दोन हात करावे लागणार आहे. चीन सर्व बाबतीत भारतास भारी आहे. यदाकदाचित युध्द झाले तर तो आपणास फार जड पडेल ह्यात शंका नाही . आणि तसे झाले तर आपला देशच युध्दभुमी ठरेल. चीन शी दोन हात करायला माझ्यामते लष्करी ताकदीपेक्षा आपले राजकिय नेतृत्व सक्षम हवे . हल्लीचे सरकार फार कुचकामी आहे. ह्यांच्याच पुर्वजांनी आपला फार मोठा भुभाग गमवला.

असो ..... आपले सर्व लेख फार छान आहेत . माझ्या वडीलांना संगणक हाताळता येत नाही . नाही तर त्यांना आपले लेख खूप आवडले असते. त्यांचे नुकतेच डोळ्यांचे ऑपरेशन झाले असल्याने वाचू पण शकत नाहीत.

आपल्या लेखनास माझ्या हार्दिक शुभेच्छा !

आपला वाचक

संदीप

Akshardhool म्हणाले...

संदीप

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्या वडिलांना या ब्लॉगवरचे लेख संगणकाच्या पडद्यावरून वाचता येत नसले तर आपण त्याचा प्रिन्ट आऊट काढून वडिलांना वाचायला देऊ शकता. माझे काही वाचक असे करत आहेत.