"चार
दिवस सासूचे"
अशी एक म्हण
आपल्याकडे आहे.
मात्र
सध्याच्या चिनी कुटुंबांत
घरातला बच्चा किंवा बच्ची
यांना जे VIP स्थान
प्राप्त झाले आहे त्यावरून
हीच म्हण या चिनी कुटुंबांसाठी
तरी "चार
दिवस छोट्यांचे"
अशीच बदलली
आहे असे म्हणावे लागते.
फेंग ची
(काल्पनिक
नाव)
हा
बिजिंगमधल्या एका सधन कुटुंबातला
तीन वर्षाचा एकुलता एक मुलगा
आहे. घरात
आई-वडील,
आजी आजोबा
आहेत व दुसरे आजी-आजोबा
जवळच रहात आहेत.
या सगळ्या
नातेवाईकांत हा एकटाच छोटा
मुलगा आहे. साहजिकच
फेंग ची चे कमालीचे लाड होत
असतात. गोळ्या,
चॉकलेट,
नवे कपडे
आणि खेळणी, काय
पाहिजे ते त्याला मिळते.
त्याने
नुसता शब्द टाकायचा अवकाश,
ती वस्तू
त्याच्यासमोर हजर होते.
बिजिंगमधल्या
Beijing Intelligence and
Capability Kindergarten या
नावाजलेल्या शाळेत तो जातो.
शाळेत जाताना
त्याचा थाटमाट और असतो.
त्याची आजी,
त्याला
शाळेत पोचवायला व आणायला,
शोफर चालवत
असलेल्या घरच्या गाडीने येते
जाते. साहजिकच
फेंग ची ला सगळे जग आपल्याभोवतीच
फिरते आहे असे वाटले तर त्यात
आश्चर्य वाटण्यासारखे काही
नाही. पण
फेंग ची हा काही कोणी विशेष
मुलगा नाहीये.
चीनमधे
त्याच्यासारखी लाखो इतर मुले
आहेत ज्यांचे असेच लाड होत
आहेत.
चीनमधल्या
एक कुटुंब एक मूल धोरणामुळे
1980 सालापासून
असे लक्षावधी फेंग ची घराघरातून
वाढत आहेत. चिनी
सरकार या धोरणामुळे देशातली
गरीबी कशी कमी झाली आहे व
राहणीमान कसे सुधारले आहे
याची टिमकी सतत वाजवत असते.
चिनी सरकारच्या
मताप्रमाणे या धोरणाचे फलित
म्हणून गेल्या 25
वर्षांत
20 कोटी
कमी बालके जन्माला आली आहेत.
सर्व देशाचा
विचार केला तर दर कुटुंबामागे
सरासरी दोन मुले आता असतात.
पण शहरांचा
विचार केला तर घरटी एकच मूल
असते. या
एक मूल धोरणाचा एक अतिशय
क्लेशदायक दुष्परिणाम आता
चिनी कुटुंबांच्यात दिसून
येऊ लागला आहे.
कोणतीही
भावंडे नसलेली ही नवीन चिनी
पिढी अत्यंत गर्विष्ठ व
आढ्यताखोर बनत चालली आहे.
चिनी
लोक या पिढीला 'चिआओ
हुआंग्डी' म्हणजे
छोटे बादशहा या नावाने ओळखतात.
चिनी वृत्त
माध्यमांतून या छोट्या
बादशहांच्यावर खूप टीका होते.
25 वर्षे
वयाखालील चिनी तरूणांमधले
निदान 20% म्हणजे
10 कोटी
चिनी तरूण तरी एकच मूल असलेल्या
घरात वाढलेले आहेत.
हे तरूण
अत्यंत स्वयंकेंद्री,
संकुचित
मनोवृत्तीचे आहेत व त्यांच्यावर
केलेली कोणतीही टीका त्यांना
चालत नाही असे एक पत्रकार
म्हणतात. ही
मुले अत्यंत लाडावलेली असतात.
त्यांना
समाजात वागावे कसे ते कळत
नाही. मागितलेली
प्रत्येक गोष्ट त्यांना लगेच
हवी असते व यांना जरा जरी काही
झाले तरी घरातील सर्वजण
आकाशपाताळ एक करतात अशीही
टीका त्यांच्यावर होत असते.
या तरूणांचा
आत्मविश्वास दांडगा असतो व
कॉस्मॉपॉलिटन असल्याने नवीन
गोष्टी त्यांना सतत हव्या
असतात. साहजिकच
हे तरूण, उपभोक्ता
उत्पादने बनवणार्या परदेशी
कंपन्यांच्याचे फार लाडके
आहेत कारण चीनमधे हीच मंडळी
त्यांचे खरे गिर्हाईक आहेत.
अमेरिकन
फास्ट फूड या मुलांचे अतिशय
आवडीचे असल्याने यांच्यापैकी
निदान 20% तरूण
तरी लठ्ठंभारती बनत चालले
आहेत.
या
तरूणांच्यावरची सर्वच टीका
योग्य आहे असे वाटत नाही यांच्या
डोक्यावर मागच्या दोन पिढ्यातील
नातलगांच्या अपेक्षांचे एवढे
मोठे असते की वयाच्या पाचव्या
किंवा सहाव्या वर्षापासून
त्यांना शालेय अभ्यासक्रमात
उत्कृष्ट गुण मिळवावेच लागतात.
या शिवाय
पियानो शिकणे,
इंग्रजी
संभाषण, ज्यूडो,
कराटे आणि
गॉल्फ या सारख्या गोष्टी शिकणे
त्यांना क्रमपात्रच असते.
या
मुलांसाठी असलेल्या बालशाळा
सुद्धा आता खास रित्या या
मुलांना शिक्षण देतात.
दीड वर्षाचे
मूल झाले की ते या शाळेत जाऊ
लागते. या
शाळेची फी सर्वसाधारण कुटुंबांच्या
उत्पन्नाच्या दुप्पट तरी
असते. या
मुलांना गणित,
शास्त्र,
कला,
चिनी भाषा
आणि संगीत यांचे शिक्षण दिले
जाते. या
शिवाय या शाळा टेनिस,
गॉल्फ,
हे ही शिकवतात.
शिस्त,
स्पर्धांना
तोंड कसे द्यायचे आणि वागायचे
कसे? याचे
खास शिक्षण मुलांना दिले जाते.
मुले 3
वर्षाची
होईपर्यंत बरीच शिस्तशीर
बनतात असे दिसते.
याच वयाला
या मुलांना 1 ते
100 पर्यंत
अंक म्हणता यावे लागतात.
चीनमधे
इंटरनेट वापरावर खूपच बंधने
आहेत पण हे सगळे छोटे बादशहा
आता कॉम्प्युटर,
इंटरनेट
यांचा वापर अतिशय सहजपणे
करतात. चीनची
ही तरूण पिढी एका बाजूने चिनी
सरकारच्या सततच्या ब्रेन
वॉशिंगमुळे कट्टर वामपंथी
बनली आहे. त्याचवेळी
अमेरिकन उपभोक्ता संस्कृती,
संगीत,
पुस्तके
याचीही ही पिढी चाहती आहे.
त्यांना
पाश्चात्य संगीत आवडते.
अमेरिकन
फास्ट फूड आवडते.
अमेरिकन
लेखकांची पुस्तके आवडतात.
अमेरिकन
फॅशनचे कपडे आवडतात.
या दोन
विचारसरणींच्या ओढाताणीत
हे छोटे बादशहा कसा टिकाव
धरतात व या विरोधाभासाला कसे
तोंड देतात हे पाहण्यासारखे
आहे.
14 जानेवारी
2010
1 टिप्पणी:
मागे एकदा ऑफिसच्या कुठल्यातरी प्रेझेंटेशन मध्ये हा उल्लेख ऐकला होता. एका चीनी मुलाची काळजी घ्यायला ६ जण असतात. आई,वडील, २ आज्या आणि २ आजोबा असा काहीतरी तक्ता काढून दाखवला होता त्यांनी. त्याची आठवण झाली.. छान लेख.
टिप्पणी पोस्ट करा