शिनजिआंग हा चीनचा सर्वात पश्चिमेकडचा प्रांत. या प्रांताची राजधानी आहे उरमुची. उरमुची रेल्वे स्टेशनवरून पूर्वेकडे, शिआन, शांघाय, बिजिंग किंवा चेंगडू या सारख्या कोणत्याही शहराला जाणार्या प्रत्येक ट्रेनला, शिनजिआंग प्रांत एकदा ओलांडला की पहिल्यांदा जे स्टेशन लागते ते म्हणजे लिउयुवान. त्यामुळेच उरमुचीवरून येणारी प्रत्येक ट्रेन ही तेथून 400 कि.मी. अंतरावर असलेल्या लिऊयुवान स्टेशनवर थांबतेच. चीनच्या गान्सू प्रांतामधले हे लिउयुवान शहर भणाणणार्या वार्याचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. चीनमधल्या आंतर्राष्ट्रीय प्रवाशांना हे शहर चांगलेच माहिती असते कारण डुनहुआंगच्या प्रसिद्ध 'हजार बुद्धांच्या गुहा' बघायला येणारे प्रवासी प्रथम येथेच उतरतात. हे शहर प्राचीन सिल्क रूटवरच आहे.
या लिऊयुवान शहरातल्या रेल्वे स्टेशनवर अलीकडे एक नवीनच दृष्य़ बघायला मिळते आहे. उरमुचीवरूनची कोणतीही ट्रेन येथे थांबली की काही लोकांचा एक जथ्था या स्टेशनवर उतरतो या जथ्थ्यातले बहुतांशी लोक तरूण असतात व त्यांच्या पाठीवर बॅकपॅक दिसतो. या लोकांचे लक्ष असते लिउयुवान रेल्वे स्टेशन प्लाझाच्या समोरच असलेले एक पार्लर ज्यावर मोठी पांढर्या रंगातली पाटी आहे. या पाटीवर लिहिलेले आहे ' ईझी कनेक्शन इंटरनेट कॅफे'. ही मंडळी आहेत शिनजियांगचे इंटरनेट निर्वासित आणि त्यांच्या पाठीवरच्या बॅकपॅकमधे असतो त्यांचा लॅपटॉप संगणक. या इंटरनेट कॅफेमधे जाण्यासाठी ही मंडळी तब्बल 13 तासाचा रेल्वे प्रवास करून लिउयुवानला येतात.
मागच्या वर्षी शिनजियांग प्रांतातील मुस्लिम धर्माचे व उघिर वंशाचे लोक व चीनच्या इतर भागातून आलेले हान वंशाचे चिनी यात वांशिक दंगली उसळल्या होत्या व200 तरी लोक मृत्युमुखी पडले होते. त्या नंतर चिनी अधिकार्यांनी सबंध शिनजियांग प्रांताचे इंटरनेट गेटवे बंदच करून टाकले त्याचबरोबर मोबाईल फोनवरचे SMS आणि आंतर्राष्ट्रीय फोनकॉल यावरही संपूर्ण बंदी घालण्यात आली. स्वायत्त असलेला शिनजिआंग प्रांत हा काही लहान सहान भू प्रदेश नव्हे. 1,646,900 वर्ग कि,मी एवढा याचा विस्तार आहे. एकोणिस कोटीच्या जवळपास लोक या प्रांतात रहातात. खनिज पदार्थांच्या खाणी, लोखंड व पोलाद उद्योग या सारखे अवजड उद्योग या भागात आहेत. येथून काही प्रमाणात शेती उत्पन्नही चीनमधे पाठवले जाते. भारत, अफगाणिस्तान, ताजिकीस्तान, किरगिझस्तान, कझाखस्तान, रशिया आणि मंगोलिया या देशांच्या सीमा या प्रांताला भिडलेल्या आहेत. येथे असलेल्या अनेकांचे उद्योगधंदे इंटरनेटवर अवलंबून आहेत. या अशा लोकांना लिऊयुवान शहराकडे पळ काढण्याशिवाय दुसरा मार्गच उरलेला नाही.
हे इंटरनेट निर्वासित येण्यापूर्वी कॅफेमधली आपली जागा आरक्षित करूनच येतात. त्यानंतर 10/12 तास तरी ते ही खुर्ची सोडायला तयार नसतात. लिउयुवान शहरात रहाण्याची सोय असलेली हॉटेल्स अगदी कमी आहेत. त्यामुळे या निर्वासितांचे तसे हालच होतात. बहुतेक निर्वासित त्यामुळे रात्रीची गाडी पकडून परत उरमुचीला परत जातात. दर तीन चार दिवसांनी ही फेरी करावी लागत असल्याने बरेच व्यावसायिक अगदी कंटाळून गेले आहेत व ते स्वाभाविकच आहे. काही लोकांना आपण परत 1970च्या कालात गेलो आहोत असे वाटते आहे तर काही मंडळींनी आपल्या धंद्याचा प्रतिनिधी शिनजियांगच्या बाहेर ठेवला आहे.शिनजिआंगमधली परकीय गुंतवणूक व प्रवाशांपासून मिळणारे उत्पन्न यात प्रचंड घट झाली आहे तर आयात निर्यात उद्योगाची उलाढाल 40 % कमी झाली आहे.
एक माणूस मात्र या परिस्थितीवर अतिशय खुष आहे. तो म्हणजे 'ईझी कनेक्शन इंटरनेट कॅफे' चा मालक. त्याचा धंदा कधी नव्हे एवढा छान चालला आहे.
22 जानेवारी 2010
1 टिप्पणी:
अहाहा...!!...चीन(राजकारण, समाजकारण, उद्योग, ई)...माझा आवडता विषय.
तुमचा ब्लॉग आज पहिल्यांदा बघितला आणि आवडला!
टिप्पणी पोस्ट करा