शनिवार, जानेवारी ०२, २०१०

धूम्रपानाचा स्पीड ब्रेकर


चार पाच दिवसांपूर्वी चीनमधे एका नवीन सुपर फास्ट किंवा बुलेट आगगाडीच्या सेवेचे उदघाटन करण्यात आले. ही ट्रेन जगातील सर्वात वेगाने जाणारी आगगाडी आहे. या ट्रेनमुळे वुहान व ग्वांगझू (Wuhan and Guangzhu) या दोन शहरांच्यामधला प्रवास 10 तासांच्यावरून 3 तासांच्यावर आला आहे. या दोन शहरांच्यामधले अंतर 1000 किलोमीटरच्या आसपास आहे. मात्र या गाडीचा वेगच तासाला 350 किलोमीटर एवढा असल्याने हे अंतर 3 तासात ही गाडी लीलया पार करू शकते.
मागच्या मंगळवारी ग्वांगझू स्टेशनवरून वूहानला जाणारी G1048 नंबरची गाडी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी सुटणार होती. या जलद गतीने जाणार्‍या गाडीचे दर साध्या गाड्यांच्यापेक्षा बरेच जास्त ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्यांना आपल्या इच्छित स्थळी लवकर पोचायचे होते असेच उतारू ही जास्त दराची तिकिटे खरेदी करून वेळेवर स्टेशनवर हजर झाले होते.

गाडी सुटण्याची वेल उलटून गेली तरी ही गाडी काही सुटेना. वैतागलेल्या प्रवाशांना ट्रेनमधल्या स्टाफकडून नीट काही उत्तरेही मिळत नव्हती कारण त्यांनाच गाडी न सुटण्याचे कारण समजत नव्हते. बराच शोध घेतल्यावर असे आढळून आले की एका प्रवाशाने दोन डब्यांना जोडणार्‍या मधल्या जागेत (Vestibule) उभे राहून धूम्रपान केले होते. या धूम्रपानामुळे निर्माण झालेला धूर या गाडीत बसवलेल्या अतिशय संवेदनाशील धूर शोधकाने (Detector) लगेच शोधला होता व आगीची धोक्याची सूचना देऊन गाडीचे ब्रेक लावून टाकले होते.

ही अती जलद गाडी संपूर्णपणे वातानुकुलित असल्याने, या गाडीतील स्वच्छतागृहे, डबे जोडण्याच्या जागा वगैरे ठिकाणी संवेदनाशील धूर शोधक लावण्यात आलेले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेचा विषय या अशा प्रकारच्या अती जलद गाड्यांच्यात खूप महत्वपूर्ण असतो. त्यामुळेच या धूर शोधक प्रणालीने आपले काम चोख बजावले होते व गाडी पुढे जाणे अशक्य करून टाकले होते.

चीनमधल्या इतर गाड्यांच्यात, अगदी वातानुकुलित गाड्यांच्यात सुद्धा, स्वच्छतागृहे व डबे जोडणार्‍या जागा येथे धूम्रपान करण्यास परवानगी असते. त्यामुळेच या गाडीने प्रवास करणार्‍यांना या नवीन बदलाची कल्पना नसल्यामुळे ही घटना घडली होती.

G1048 ही ट्रेन शेवटी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी म्हणजे तब्बल दोन तास पंचेचाळीस मिनिटे उशिराने ग्वांगझू स्टेशनवरून सुटली. या नंतरच्या दोन गाड्या G6004 आणि G1054 या अनुक्रमे दीड तास व वीस मिनिटे एवढ्या उशिराने सुटल्या. या गाड्यांनी प्रवास करणार्‍या लोकांना हे दिसत होते की बाकी सर्वसाधारण गाड्या वेळेवर सुटत होत्या परंतु त्यांनी बर्‍याच जास्त दराने ज्या गाड्यांची तिकिटे खरेदी केली होती त्या अती जलद गाड्या मात्र सुटत नव्हत्या.

धूम्रपान करणारे हवेत जो धूर सोडतात त्याचा सहप्रवाशांना होणारा त्रास ही प्रवासातील नेहमीचीच कटकट असते पण याच धुराने गाडीला स्पीड ब्रेक लागू शकतो याची मात्र कल्पना करणेही कठीण आहे.

31 डिसेंबर 2009

२ टिप्पण्या:

Naniwadekar म्हणाले...

हा ब्लॉग कशासाठी?
दक्षिण पूर्व एशिया मधल्या माझ्या वास्तव्यानंतर, चीन या देशाचे जागतिक महत्व माझ्या लक्षात आले.
---------

श्री आठवले : आपण प्रत्यक्ष चीनमधे वास्तव्य केले आहे का? चीनी लोक कसचाही सुगावा लागू देत नाहीत, अत्यंत स्वार्थी असतात, कशाशीही ज़ुळवून घेतात कारण त्यांच्या श्रद्‌धा अशा कशावरच नसतात. असा माझा अमेरिकेतल्या चीनी लोकांशी झालेल्या गप्पांमधून निष्कर्ष आहे. भारतीयांच्या आपल्या सकस परंपरांवर श्रद्‌धा असतात, असा माझा दावा नाही. पण भारतीय लोक भारताबद्‌दल 'the greatest / the only / the oldest civilization' पासून ते 'it's a zoo' पर्यंत शेरेबाजी करतात. चिनी लोक त्यांच्या देशाबद्‌दल चांगलंही बोलत नाहीत आणि वाइटही बोलत नाहीत असा माझा अनुभव आहे. त्यांना बोलतं करायचा प्रयत्न केला तरी हाती काही लागत नाही. हे सगळं ते हिशेब करून करत नसणारच, पण त्यांची घडणच मत नसण्याची, किंवा असल्यास ते मनातच ठेवण्याची, असावी. त्यामुळे बाहेरच्या संस्कृतींना चीनमधे फितुर पेरण्यात कितपत यश आलं असेल, याची मला एक उत्सुकता वाटते. मुळात असंतुष्ट चिनी लोकांनी अमेरिकेची मदत घेणं वेगळं. तसे असंतुष्ट नसलेले किती लोक बाहेरच्या प्रभावानी असंतुष्ट बनले, हा एक मुद्‌दा आहे. त्यांना 'inscrutable' म्हणतात ते त्यांचे डोळे पत्ता लागू देत नाहीत म्हणून नसावं; त्यांची वाणी पण कसचाच पत्ता लागू देत नाही.

कुठे आत्मघातकी हल्ला झाल्यावर जशी आपल्याला इस्लामी अतिरेक्यांची शंका येते, तशी अमेरिकेतल्या महत्त्वाच्या सुरक्षाविषयक माहितीची चोरी झाल्यास मला स्वत:च्या स्वार्थाविषयी अत्यंत जागरूक आणि कार्यक्षमही राहू शकणारे इझरेलचे हेर किंवा चिनी लोकच डोळ्यासमोर येतात.

Akshardhool म्हणाले...

श्री. नानिवडेकर

मी चीन मधे वास्तव्य केलेले नाही. परंतु दक्षिण पूर्व एशियामधल्या एका देशात केलेले आहे जिथल्या लोकसंख्येत चिनी वंशाचे लोक बहुसंख्य आहे. माझा अनुभव बराच निराळा आहे.सुरवातीस they keep their difference. पण एकदा ओळख झाली की ते अत्यंत मदत करणारे व friendly असतात. चिनी लोक किंवा त्यांचा देश यांचे भारताबद्दल काहीही मत असले तरी पुढची अनेक दशके तो देश जगातील प्रथम दर्जाचा देश रहाणार आहेहे नक्की. त्यामुळेच आपण त्या देशाची जितकी माहिती करून घेता यावी तितकी घेतली पाहिजे असे मला वाटते. त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांनी फ्रेंच किंवा जर्मन भाषा न शिकता चिनी शिकले पाहिजे. मला चीन बद्दलच्या बातम्य वाचताना human interest stories सापडल्या तर त्या या ब्लॉगमधे देण्याचा माझा प्रयत्न राहील. चीन जर आपला प्रतिस्पर्धी रहाणार असला तर त्याच्याबद्दल जास्तीतजास्त माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.