मंगळवार, जानेवारी १२, २०१०

हम दो हमारा (री) एक




1978 साली चीनच्या राज्यघटनेत एक कुटुंब एक मूल हे राष्ट्राचे अधिकृत धोरण असल्याचे प्रथम नमूद करण्यात आले. तेंव्हापासून या धोरणाच्या चांगल्या व वाईट दोन्ही परिणामांबद्दल बरेच लिहिले गेले आहे. काही दिवसांपूर्वी रॉब गिफर्ड या लेखकाने लिहिलेले China Road: A Journey Into the Future of a Rising Power हे पुस्तक माझ्या वाचनात आले. या लेखकाने चीन मधल्या रूट 312 या शांघायमधून निघून पश्चिमेकडे जाणार्‍या रस्त्यावर, हिचहायकिंग करून केलेल्या आपल्या प्रवासाचे मोठे वाचनीय वर्णन केले आहे. या त्याच्या प्रवासात एका ठिकाणी बसमधे एक स्त्री डॉक्टर व तिच्या दोन सहाय्यिका या सहप्रवासी म्हणून भेटतात. त्या डॉक्टरीण बाईंशी बोलल्यावर त्याच्या हे लक्षात येते की या डॉक्टरीणबाईंच्याकडे सरकारी एक मूल धोरण राबवण्याचे काम आहे. या बाई व त्यांच्या सहाय्यिका गावोगावी फिरून कोणी बाई दुसर्‍यांदा गरोदर आहे का याचा शोध घेतात. जर कोणी अशी बाई सापडली तर अत्यंत निर्दयपणे भ्रूणहत्या करण्यात येते. जर गर्भवाढ बरीच झालेली असली तर त्या गर्भाला विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकण्यात येते. थोडक्यात म्हणजे ही डॉक्टरीणबाई देवदूत नसून एक यमदूत होती




हे वर्णन वाचल्यावर मला चिनी लोकांच्या सोशिकतेबद्दल खरोखर कमाल वाटली. आपल्याकडची आणीबाणीच्या कालातील संजय गांधींची नसबंदी मोहिम आठवली व त्याची परिणिती सरकार कोसळण्यात कशी झाली होती हे ही स्मरले. या उलट चीनमधले गरीब खेडूत व शेतकरी या प्रकारची सरकारी निर्दयता कसे सहन करत असतील याचे आश्चर्यही वाटले.




याच प्रकारच्या अत्यंत निष्ठूर आणि क्रूर वर्तनाची प्रकरणे आता जिथे दारिद्र्य किंवा गरिबी व्यापक प्रमाणात आहे अशा ठिकाणांहून बाहेर येत आहेत. ग्वांग्क्शी( Guangxi) प्रांतामधे 61 गरोदर महिलांना हॉस्पिटलमधे पकडून नेण्यात आले व विषारी इंजेक्शन देऊन गर्भहत्या केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीला आले.चीनच्या मध्यवर्ती सरकारने आता या प्रकारच्या गर्भहत्या करण्यास जरी बंदी घातली असली तरी सरकारी लक्षे पूर्ण करण्यासाठी जास्त उत्साही अधिकारी अजूनही या प्रकारची कृत्ये करतच आहेत. चीनमधे कोणत्याही तरूण किंवा तरूणीला लग्न करण्यासाठी सरकारी परवाना घ्यावा लागतो. असा परवाना नसलेली कोणतीही तरूणी जर गरोदर राहिली तर नियमाप्रमाणे ताबडतोब भ्रूणहत्या करण्यात येते. स्थानिक अधिकार्‍यांच्या बढत्या, भ्रूणहत्यांचे हे लक्ष पूर्ण करण्यावर अवलंबून असल्यामुळे, ते जरा जास्तच उत्साही असतात.



1978 मध्ये हे धोरण राबवण्यास सुरवात झाली त्यानंतर चीनमधली दरडोई जन्म संख्या कथा कादंबर्‍यात शोभेल अशा रितीने खाली आली हे सत्य आहे. परंतु आता हे सरकारच्या लक्षात येऊ लागले आहे की हे धोरण अजिबातच लोकमान्य झालेले नाही व त्याला लोकांचा प्रचंड विरोध आहे. आता हे धोरण राबवण्यास सुरवात केल्याला सुद्धा तीस वर्षे उलटून गेली आहेत चीनमधला फर्टिलिटी रेट(Fertility Rate) आता भारतीय किंवा अमेरिकन फर्टिलिटी रेटपेक्षा बराच कमी झाला आहे. त्यामुळे हे धोरण बदलावे असे अनेक तज्ञ सरकारला सुचवत आहेत.


कोणत्याही देशातला हा फर्टिलिटी रेट जर दोनच्या खाली गेला तर त्या देशातल्या लोकांचे सरासरी वय वाढू लागते. तरुणांच्या मानाने म्हातारे व काम न करू शकणारे हात वाढू लागतात. अनेक प्रगत देशात ही स्थिती आहे व हे देश यावर काय तोडगा काढावा या विचारात आहेत. तज्ञांच्या मताने चीनमधे ही परिस्थिती पुढच्या वीस वर्षांमधे येणार आहे.


भारतप्रमाणेच चीन मधेही सर्व कुटुंबाना एक तरी मुलगा हवा असतो. परंतु या एक मूल धोरणाप्रमाणे, फक्त एक मुलगी असलेली कुटुंबेही आता खूप आहेत. अशा कुटुंबाना आणखी एक मुलगा होऊ देण्यासाठीची परवानगी आता शांघायसारख्या काही शहरांच्यात देण्यात येते आहे.
चीनमधे मानवी अधिकार, मूलभूत स्वातंत्र्य यांना फारशी काहीच किंमत नाही. श्रीमंत लोक या नियमांमधून पळवाटा काढतातच. पण खेडेगावात राहणारे गोरगरीब मात्र भरडून निघतात हे सत्य नाकारता येत नाही.


12 जानेवारी 2010

५ टिप्पण्या:

विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

अतिशय धक्कादायक प्रकार आहेत हे
परंतु ३० वर्षापूर्वीची परिस्थिती पाहता त्या सरकारला ते पाऊल उचलावे लागले होते आणि तसे नसते केले तर आज चीनचे दृश्य वेगळे असते

अनामित म्हणाले...

चीनमधे सरकार दडपशाही करू शकतं, याचा मला बरेचदा हेवा वाटतो. लोकसंख्या वाढली की खाणारी तोंडे वाढतात, पण त्याच्या दुपटीनी काम करणारे हातही वाढतात, वगैरे सर्वांगीण विचार करता (big picture) किती खरं आहे आणि त्यात काव्यात्मक भाग किती हा एक उत्तर नसलेला प्रश्न ठरेल. इतके लोक पृथ्वीवर नान्दू शकत नाहीत म्हणणारे लोकही आहेत, आणि याच्या चौपट नान्दू शकतील म्हणणारेही आहेत. अगदी चाळीस वर्षं आधी मुंबई-पुण्यात इतके लोक मावू शकतील हे पटलं नसतं. खरंखोटं परमेश्वरच ज़ाणे. पण पाण्याचं दुर्भिक्ष, जंगलं नष्ट झाल्यामुळे माकडांचा, सापांचा शहरात वाढता वावर या गोष्टींमुळे मात्र लोकसंख्या फार वाढली आहे, असं वाटतं.

लोकसंख्या कमी करू पाहणार्‍या देशात वृद्‌धांची संख्या फार वाढते, आणि अशी टक्केवारी यापूर्वी जगात कधीच नव्हती, असा लेख लंडन टाइम्समधे ४-५ वर्षांपूर्वी त्या पत्राचे १९६७-१९८० संपादक राहिलेले विल्यम रीस-मॉग यांनी लिहिला होता. त्यामुले पैसा कमवणारे कमी आणि त्यावर अवलंबून राहणारे जास्त, असा असमतोल निर्माण होता. पण पुढल्या १००-२०० वर्षांच्या हितासाठी ही परिस्थिती २०-२५ वर्षं सहन करणं श्रेयस्कर ठरेल का, हा प्रश्न आहे. त्याबद्दलही दोन्ही बाज़ूंनी बोलणारे तज्ज्ञांचे दोन गट आहेत.

रात्री दारू पिऊन वेश्येकडे किंवा बायकोकडे ज़ाणारा रिक्षेवाला या प्रश्नांचा विचार अर्थातच करत नाही, आणि त्याच्या निरक्षर, मुलांना देवाची इच्छा वा प्रसाद मानणार्‍या बायकोनीही र धों कर्वे हे नावही ऐकलं नसतं. 'लोकसंख्या कमी करणे' हा आवश्यक उपाय मानला तर मोठ्या प्रमाणावर चीनसारखे लोकांवर संततिप्रतिबंधन किंवा गर्भपात लादणे आवश्यकच ठरेल. त्याला विरोध होणारच, त्यामागचं अमानुषतेचं अंगही अमान्य करता येणार नाही; पण या गोष्टींना इलाज़ नसतो. यात गरीब किंवा निरक्षर जास्त भरडले ज़ाणार, पण ते लोक तसेही ज़ास्त भरडले ज़ातातच. तो जगाचा नियमच आहे.

लोकसंख्येत दर १००० पुरुषांमागे ९७० ते १०३० स्त्रिया असल्या तर तो असमतोल मानत नाहीत, असं कुठेशी वाचलं आहे. पण अपत्य एकच होणार असेल तर मुलगाच हवा म्हणून स्त्रीगर्भाची जी हत्या केले ज़ाते, त्यामुळे हा असमतोल फार वाढेल आणि २०२० साली २ कोटी लग्नाळू चिनी पुरुषांना बाईच मिळणार नाही, अशी आज़च बातमी वाचली. पहा : http://english.people.com.cn/90001/90776/90882/6864561.html

एके काळी युद्‌धात खूप पुरुष मरत असतील म्हणून किंवा अन्य कारणांनी बहुपत्नित्वाची रूढी होती, त्याप्रमाणे चीनमधे कदाचित एका स्त्रीला अनेक पती करण्याची परवानगी मिळेल. तशीच वेळ येवो म्हणून आज़च्या चिनी तरुणी बीजिंग, शांघाय सारख्या शहरांतल्या द्रौपदी-मंदिरांत नवसही बोलत असतील.

- डी एन

हेरंब म्हणाले...

फारच भयंकर आणि अमानुष आहे हे. काटा आला अंगावर !!!

Akshardhool म्हणाले...

लेखाला आलेले प्रतिसाद वाचून एक दोन मुद्दे परत वाचकांच्या लक्षात आणून द्यावेसे लागतात. भारतात किंवा अमेरिकेत, जेथे वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित आहे, बसून चीन मधल्या सरकारी अधिकार्‍यांचे वर्तन देशाच्या लांब पल्ल्याच्या हिताच्या दृष्टीने कसे हितावह आहे हे सांगणे सोपे आहे. परंतु ज्या गरीब खेडुतांना या क्रूरतेला सामोरे जावे लागते आहे त्यांचा विचार केला अशा मध्ययुगीन पद्धतींचा निषेधच केला पाहिजे.

चीन मधील लोकसंख्या अभ्यासक आता असे म्हणू लागले आहेत की या धोरणामुळे चीनचे प्रचंड नुकसानच झाले आहे. पुढच्या पंधरा वीस वर्षात या धोरणाने साधले काय व गमावले काय हे स्पष्ट व्हावे.

Naniwadekar म्हणाले...

> भारतात किंवा अमेरिकेत बसून ... हे सांगणे सोपे आहे.
>---

कबूल आहे.


> परंतु ज्या गरीब खेडुतांना या क्रूरतेला सामोरे जावे लागते आहे त्यांचा विचार केला अशा मध्ययुगीन पद्धतींचा निषेधच केला पाहिजे.
>----

असे शहारे आणणारे उपायही आवश्यक ठरू शकतात असं माझं मत असलं तरी पद्‌धत मध्ययुगीन आणि अमानुष आहे, हेदेखील मला मान्य आहे. श्रीमंत लोक या नियमांतून पळवाट काढत असतील, हे पण नक्की आहे.

- डी एन