गुरुवार, डिसेंबर ३१, २००९

जबरदस्त किंमत

चीन हा देश, जगातील एक महासत्ता म्हणून आज मानला जातो. औद्योगिक प्रगतीबरोबरच सैन्यदले व हत्यारे यांच्याबाबतीत सुद्धा चीन अतिशय प्रबळ असे राष्ट्र आहे. ही महासत्ता बनण्याच्या दृष्टीने चीनने 1964 सालच्या 16 ऑक्टोबरलाच पहिला अणुस्फोट घडवून आणून पहिले पाऊल टाकले होते. तेंव्हापासून 1996 सालापर्यंत, जवळ जवळ चाळीस अणुस्फोट, चीनने आपल्या शिंजियांग प्रांतातल्या लोप नुर वाळवंटात घडवून आणले होते. यापैकी बहुतेक (हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटासह) जमिनीच्या पृष्ठभागाच्यावर म्हणजे हवेत घडवले गेले होते.
चीनमधील कम्युनिस्ट सरकारने या स्फोटांमुळे शिंजियांग प्रांतात रहाणार्‍या उघिर लोकांवर काही दुष्परिणाम झाले असण्याची शक्यताच सतत नाकारली आहे व हे सगळे प्रकरण पूर्णपणे दडपण्यात आले आहे. 2008 साली प्रथम, चिनी सरकारने या स्फोटांच्या कार्यक्रमात, ज्या सैनिकांनी प्रत्यक्ष रित्या भाग घेतला होता त्यांना आर्थिक मदत देत असल्याचे मान्य केले व या अणुस्फोटामुळे सर्वसामान्य नागरिकांच्यावर दुष्परिणाम झाले असण्याच्या शक्यतेला एक प्रकारची अप्रत्यक्ष मान्यताच दिली. अर्थात कोणत्याच नागरिकाला कसलीच आर्थिक मदत कधीही मिळाली नाही.
डॉक्टर अन्वर तोहती हे शिंजियांग प्रांतातल्या उघिर लोकांपैकी एक वैद्यकीय डॉक्टर आहेत. 1973 साली ते प्राथमिक शाळेत होते. त्यांना चांगले आठवते की तेंव्हा तीन दिवस वार्‍याचा किंवा वादळाचा मागमूस सुद्धा नसताना सतत नुसती धूळ हवेतून जमिनीवर पडत होती. आकाशात चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हते. सूर्य, चंद्र हे ही दिसत नव्हते. आपल्या शिक्षिकेकडे त्यांनी जेंव्हा विचारणा केली होती तेंव्हा, शनी या ग्रहावरील वादळामुळे असे होते आहे हे उत्तर त्यांना मिळाले होते व अर्थातच त्यांचा त्या उत्तरावर विश्वास पण बसला होता. यानंतर कुमार वयात तोहती यांना आपल्या देशाने आपल्या प्रांताचा इतकी महत्वाची प्रगती करण्यासाठी उपयोग केला होता ही गोष्ट अतिशय अभिमानाची वाटली होती. आपल्या डोक्यावर पडलेली धूळ ही आपल्याच प्रांतात घडविलेल्या गेलेल्या अणुस्फोटामुळे उडालेली रेडियोऍक्टिव्ह धूळ आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येण्यास आणखी बरीच वर्षे जावी लागली होती.
अन्वर तोहती जेंव्हा मेडिकल डॉक्टर झाले तेंव्हा त्यांच्याकडे येणार्‍या रुग्णांमधे, गंडमाळा, फुफ्फुसांचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्स आणि व्यंगदोष घेउन जन्माला येणारी बालके यांचे प्रमाण इतके जास्त होते की या विषयावरची आपली मते त्यांना बदलावीच लागली. त्यांच्याबरोबरच्या बहुतेक डॉक्टरांनाही हे सर्व अणुस्फोटांमुळेच होत असावे असे वाटत होते परंतु या विषयावर काहीही संशोधन करण्यास पूर्ण बंदी घालण्यात आलेली होती.
डॉक्टर तोहती 1998मधे तुर्कस्तानला स्थायिक झाले व त्यानंतरच त्यांना या विषयावर आरोग्यविषयक संशोधन करण्यास मुभा मिळाली. प्रथम त्यांनी चीनमधे प्रवासी म्हणून गेलेल्या काही ब्रिटिश डॉक्युमेंटरी चित्रपट बनविणार्‍या लोकांची मदत घेऊन शिंजियांग प्रांतामधल्या आरोग्यविषयक नोंदीचे गुप्तपणे चित्रिकरण केले. यात अतिशय धक्काजनक माहिती उघडकीस आली. चीनच्या सरासरीपेक्षा शिंजियांग प्रांताची कर्करोग्यांची सरासरी, 30 ते 35 टक्के आधिक होती.
जपानमधल्या सोपोरो मेडिकल विद्यापीठात कार्य करणारे डॉ. जुन टाकाडा यांनी 1990 मधेच कझाकस्तानमधील सरकारच्या मदतीने सोव्हिएट अणुस्फोटांच्या वेळी जमा केलेल्या माहितीच्या आधारे, चिनी अणुस्फोटांमुळे काय परिणाम झाले असावेत याचे एक मॉडेल संगणकावर तयार केले होते. या मॉडेलप्रमाणे शिंजियांग प्रांताची लोकसंख्या व त्याचा विस्तार व व्याप्ती याचा विचार करून कमीत कमी 194000 माणसे मृत्युमुखी पडली असावी. तसेच 12 लाख लोकांना प्रमाणाच्या बाहेर असलेल्या रेडियोऍक्टिव्ह उत्सर्जनाला तोंड द्यावे लागल्याने कर्करोग, ल्युकेमिया व अर्भकांना आलेली जन्मजात व्यंगे यांचे शिकार व्हावे लागले असावे असा अंदाज केला होता. चिनी सरकार या बाबतीतली कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यास कधीच तयार नसल्याने प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे समजणे अशक्य आहे. डॉक्टर तोहतींच्या मते या लोकांना कसलीच मदत कधीच मिळालेली नाही. व ते सर्व येणार्‍या मृत्युची वाट बघण्याशिवाय दुसरे काहीही करू शकत नाहीत.
डॉक्टर तोहती आणि डॉक्टर टाकाड यांनी आता सोपोरो विद्यापीठात हे दुष्परिणाम तपासण्यासाठी लोप नुर प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचे यश त्यांना कितपत खरी माहिती मिळते यावरच अवलंबून आहे.
हुकुमशाही शासनात निरपराध नागरिकांचा कसा बळी जातो व ते कसे हतबल असतात याचे हे आणखी एक उदाहरण अतिशय बैचैन करणारे आहे.
11 जुलै 2009

मंगळवार, डिसेंबर २९, २००९

चिनी जादू




हे छायाचित्र मी माझ्या संगणकात फिरवलेले नाही.. चित्रात पुढे दिसणारी इमारत खरोखरच आडवी आहे. ही इमारत शांघायमधल्या ‘लोटस रिव्हरसाइड’ (Lotus Riverside) या अजून बांधकाम सुरू असलेल्या सदनिकांच्या संकुलात 27 जून 2009 पर्यंत उभी होती.

2008 सालच्या ऑक्टोबर महिन्यात, ‘मॅकिनसे’ (McKinsey) या प्रसिद्ध अमेरिकन सल्लागार कंपनीच्या शांघायस्थित संचालकांनी आपल्या अहवालात असे नमूद केले होते की बिजिंगमधल्या नवीन बांधकामांचा दर्जा इतका नित्कृष्ट आहे की ‘चाओयांग’ (Chaoyang) या मध्यवर्ती व्यापारी पेठेतील, कचेर्‍या असलेले एखादे तरी इमारतींचे संकुल जमीनदोस्त होण्याची शक्यता वाटते. त्यांची ही भविष्यवाणी बिजिंगच्या बाबतीत जरी खरी ठरली नसली तरी शांघायमधील, उच्चमध्यमवर्गीयांसाठी बांधण्यात येणार्‍या या संकुलाच्या बाबतीत तरी खरी ठरली आहे.

एक वर्षापूर्वी चीनमधल्या ‘सिचुआन’ (Sichuan) या प्रांतात झालेल्या एका भयानक धरणीकंपात अनेक शाळांच्या इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या व हजारो निरागस बालकांचे बळी गेले होते. त्यावेळी असे आरोप करण्यात आले होते की बांधकामाचा नित्कृष्ट दर्जा, पोलादाऐवजी लोखंडी कांबींचा वापर या सारख्या कारणांनी या इमारती टिकाव धरू शकल्या नव्हत्या. सिचुआन शासनाने नंतर एक गर्वपूर्ण जाहिरनामा काढून आमच्या प्रांतात धरणीकंपाच्या आधी बांधलेल्या कोणत्याच इमारती नित्कृष्ट दर्जाच्या नव्हत्या असे प्रतिपादन करून नोकरशाही किती बेजबाबदारपणे वागू शकते याचा प्रत्ययच् आणून दिला होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व इमारती या धरणीकंपाच्या हादर्‍यानेच पडल्या होत्या आणि त्यांचा दर्जा उत्तमच होता. 27 जूनच्या शांघायमधील घटनेची जबाबदारी टाकायला, बांधकामाचा रद्दी आणि नित्कृष्ट दर्जा, या कारणाशिवाय दुसरी कोणतीही सबब कोणालाही देणे आता शक्यच नाही. ही घटना चीनमधल्या लोकांना तिथल्या एकूण बांधकामाविषयी सतर्क करणारीच आहे यात शंकाच नाही.
याच प्रकारच्या इतर मोठ्या बांधकाम प्रकल्पांच्या बाबतीतही अशा अनेक घटना अलीकडेच निदर्शनाला आल्या आहेत. 1990 मध्ये बांधलेल्या ‘चायना स्पोर्टस म्युझियम’च्या इमारतीला मोठमोठे तडे गेल्याचे आढळून आले आहे. पश्चिम युनान प्रांतातल्या ‘फेंगहुआंग’ (Fenghuang) येथे बांधलेला राजरस्त्यावरील पूल, 2007 साली, उदघाटन होण्याच्या आधीच पडला. ‘चॉंगकिंग’ (Chongqing) शहरात बांधलेले एक निवासी संकुल त्याल 6 महिने पूर्ण होण्याच्या आधीच बांधकामाच्या नित्कृष्ट दर्जामुळे पाडून टाकावे लागले.

या घटना का घडत आहेत? चीनमधे बांधकाम उद्योगावर अंकूश रहावा म्हणून केलेले नियम जगात सर्वोत्कृष्ट आहेत असे मानतात. तरीही या घटना सातत्याने घडताना दिसतात. एका चिनी बांधकामविषयक तज्ञाचे असे मत आहे की चीनमधली या व्यवसायातील सर्व प्रणाली (System) इतकी भ्रष्ट झालेली आहे की कोणत्याही नियमाला सहज बगल दिली जाते. चीनमधील नियमांनुसार, उंच इमारतींसाठी प्रत्येक वर्गमीटर बांधकामासाठी 80 ते 90 किलो पोलाद वापरणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात 30 किलो पोलादच सर्वसाधारणपणे वापरले जाते. दुसरे उदाहरण, पायासाठी ज्या ‘पाईल्स’ (Piles) घेतल्या जातात त्यांचे देता येते. नियमापेक्षा कितीतरी कमी ‘पाईल्स’वर सध्या इमारती उभ्या केल्या जातात.
बांधकाम व्यावसाईक, आर्किटेक्ट्स व प्रमोटर्स हे प्रचंड हाव सुटल्यासारखे वागत असल्याने, काहीही करून खर्च कमी करण्याच्या मागे असतात, हे या नित्कृष्ट दर्जाचे खरे कारण आहे. नियंत्रक अधिकार्‍यांचे हात ओले करून पाहिजे ती मनमानी ते करू शकतात. कायदेकानू पुस्तकातच रहातात ही खरी परिस्थिती आहे.

या चिनी अनुभवातून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे असे मला वाटते. पुढच्या काही वर्षात भारत सरकार अब्जावधी रुपये मूलभूत उद्योगांवर खर्च करणार आहे अशी बातमी मी कालच वाचली. या सर्व प्रकल्पांमधले आर्किटेक्ट्स, बिल्डर्स आणि ठेकेदार, हे कायद्याच्या व नियमांच्या अंतर्गतच काम करतील अशी कार्यपद्धती सरकारने अंगिकारणे अतिशय आवश्यक आहे, नाहीतर चीनच्याच मार्गाने जाण्यास आपल्याला वेळ लागणार नाही.

5 जून 2009

रविवार, डिसेंबर २७, २००९

चहाच्या कारवानांची घाटनाळ (Tea Caravan Trail)

भारत आज जगातील दुसर्‍या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात चहाचे उत्पादनच नव्हते. सर्व चहा चीनमधून आयात केला जात असे. इ.स. 1835 मध्ये डॉ.आर्थर कॅम्पबेल या ब्रिटिश अधिकार्‍याने सिक्किमच्या चोग्यालांच्या मदतीने आपल्या बंगल्याच्या आवारात प्रथम चिनी चहाच्या बिया पेरल्या. त्यांची उतम वाढ झाली आणि त्या शतकाच्या अखेरीपर्यंत ब्रिटिशांच्या मालकीच्याच अनेक चहाच्या बागा आसाम व बंगालमधे चहाचे उत्पादन करू लागल्या.


या आधी हजारो मैलांवरून तिबेटमधून चहा आयात केला जात असे. हा चहा अतिशय काळा आणि कडक होता व तो दोन ते तीन किलो वजनाच्या विटांच्या स्वरूपात आयात केला जात असे. लहान कोकरांच्या कातड्यात ह्या विटा ठेवून ती कातडी शिवण्यात येत असत व अशी चहा भरलेली कातडी तिबेटहून येत असत. हा चहा बनविताना एका मोठ्या लोखंडी भांड्यात या चहाच्या विटा पाण्यात उकळत ठेवून त्यात मीठ, लोणी व बार्ली टाकून चहा तयार करण्यात येत असे. चहाचे शौकिन स्वत:जवळचा लाकडी कप या रसायनाने भरून घेत व त्यांची तल्लफ भागवत.हा चहा ‘थिबेटची वीट’ या नावानी जरी ओळखला जात असला तरी तो तिबेटमधे उत्पादन केलेलाच नसे. चीनच्या अगदी दक्षिणेला, ब्रम्हदेश व लाओस देशांच्या सरहद्दीजवळ असलेल्या ‘युनान’ या प्रांतात या चहाचे उत्पादन होत असे व तेथून तो ल्हासामार्गे भारतात येत असे. युनान आणि भारत यांच्यामधे ज्या वाटेने या चहाचा व्यापार होत असे ती वाट अत्यंत डोंगराळ व कठिण अशा प्रदेशामधून जात होती व त्यामुळेच ही वाट, ‘चहाच्या कारवानांची (किंवा काफल्यांची) घाटनाळ’ (Tea caravan Trail) या नावाने ओळखली जात होती. चीन व मध्य एशिया यांच्यातला ‘रेशीम मार्ग’ (Silk Route) खूप जणांना माहिती आहे. पण ही चहाच्या कारवानांची घाटनाळ फारशी कोणाला माहिती असेल असे वाटत तरी नाही.



आणखी एका कारणाने ही घाटनाळ पाश्चिमात्य देशांमध्ये प्रसिद्धिच्या झोतात आली. 1933 मधे जेम्स हिल्टन या प्रसिद्ध इंग्लिश कादंबरीकाराने, (Paradise Lost) किंवा हरपलेला स्वर्ग, ही प्रसिद्ध कादंबरी लिहिली. कथा नायकाचे विमान हिमालयात अपघातग्रस्त झाल्याने त्याला एका अतिशय सुंदर अशा प्रदेशातून प्रवास करावा लागला व नंतर तो एका अत्यंत स्वर्गीय अशा (Shangri-la) या जागेत पोचला असे काहीसे या कादंबरीचे सूत्र आहे. हा प्रदेश व ही जागा कोणती असावी याबद्दल गेली साठ सत्तर वर्षे चर्चाचर्विरण चालू आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे या लेखकाने हिमालयात कधीच प्रवास केलेला नव्हता व त्याने हे सर्व वर्णन दुसर्‍या कोणत्या तरी प्रवाश्यांकडून मिळविले होते.


2003 मध्ये, या घाटनाळीवर असलेले व तिबेट-युनानच्या हदीजवळ असलेले झोंगडियान (Zhongdian) हे गांव हिल्टनचे शांग्रि-ला असावे असे अधिकृतरित्या चिनी सरकारने ठरविले. त्यामुळे आता ही घाटनाळ पाश्चिमात्य बॅकपॅकर्समधे अतिशय लोकप्रिय झाली आहे.


चहाच्या काफल्यांची ही घाटनाळ सुरू होते दक्षिणपूर्व युनान प्रांतातील शिसुआंग-बाना (Xishuangbanna) या गावापासून. या गावाजवळ असलेल्या,मेकॉंग नदीच्या परिसरातील डोंगराळ भागात, येथील अतिशय प्रसिद्ध अशा ‘पुएर’ (Pu’er) चहाची लागवड केली जाते.
हा सगळाच भाग अतिशय निसर्गरम्य आहे. बर्फाच्छादित हिम शिखरे, मोठी तळी, देवदार,सुरू आणि फर वृक्षांची जंगले व प्रदुषण विरहित हवा हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. येथून पुढे डाली, लिजिआंग या मार्गाने ही घाटनाळ, वाघ दरी (Tiger-leaping Gorge) जवळ यांगझी नदी ओलांडते. झोंगडियान वरून पुढे जाऊन डेकिन या चीन-तिबेटच्या हदीजवळ असलेल्या गावाजवळ ही वाट येते. नंतर अत्यंत दुर्गम अशा प्रदेशातून ही वाट ल्हासा ला पोचते व ल्हासाहून नाथु-ला खिंडीतून ही वाट सिक्कीमला पोचते.



विसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत या घाटनाळीने येणारा सर्व चहा हमाल स्वत:च्या पाठीवरून आणत असत. प्रत्येक हमाल जवळ जवळ 150 किलो सामान या दुर्गम प्रदेशातून ने आण करत असत. या हमालांच्या कष्टांची व हालांची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.



1962मधल्या भारत चीन युद्धानंतर नाथु-ला ची खिंड बंद झाली व या घाटनाळीवरची वाहतुक पूर्णपणे बंद पडली. जुलै 6, 2006 ला दोन्ही देशात झालेल्या समझौत्याप्रमाणे ही घाटनाळ परत वाहुतुकीसाठी खुली झाली आहे. सध्या तरी या मार्गाने स्थानिक मालाचीच आयात निर्यात होते आहे. परंतु 2012 मध्ये हा भाग आंतर्राष्ट्रीय पर्यटन वा माल वाहुतुकीसाठी खुला होईल. तो पर्यंत या घाटनाळीचे नक्कीच एका मोठ्या घाटात रुपांतर झालेले असेल यात शंका नाही.

या मार्गाने परत चहा कोणी आयात करील असे मात्र वाटत नाही.

16 जून 2009