शुक्रवार, जून २५, २०१०

जपानी कबुतरखाना आता चीनमधे


जपान हा देश, उत्तर-दक्षिण या दिशांना 3000 किलोमीटर लांब असा पसरलेला असला तरी त्याची पूर्व-पश्चिम रुंदी मात्र अगदीच कमी आहे. त्यामुळेच जपानमधे जागेचे दुर्भिक्ष नेहमीच जाणवते. जपानी लोकसंख्या मुख्यत्वे शहरांच्यात एकवटलेली असल्याने, शहरांची लोकसंख्या व उपलब्ध जागा यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त राहिलेले आहे. त्यामुळे खूप लोक शहरांच्या बाहेरच राहतात. अशा लोकांना त्यांचे शहरातले काम न संपल्यास परत जायला उशीर होतो व एवढ्या उशीरा परत शहराच्या बाहेर जायचा प्रवास करून दुसर्‍या दिवशी सकाळी परत लवकर कामावर यायचे हे मोठे कठिण काम बनते. यावर उपाय म्हणून कॅपसूल हॉटेलची कल्पना प्रथम जपानमधे निघाली व ती अतिशय लोकप्रिय झाली आहे. ही कॅपसूल हॉटेल्स शहरांना भेट देणार्‍या व्यावसायिक प्रवाशांमधेही अतिशय लोकप्रिय आहेत


या हॉटेल्समधे तुम्हाला एका रात्रीसाठी 3फूट रूंद, 3 फूट उंच व 6 फूट लांब अशी एक पेटी शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात, 3200 येन ( सुमारे 30 अमेरिकन डॉलर्स) भाड्याने मिळते. या पेटीत, झोपण्यासाठी एक बेड, टीव्ही/रेडियो व दिवाबत्ती यांची सोय असते. प्रातर्विधी उरकण्याची सोय बाजूला असलेल्या हॉटेलच्याच पण सार्वजनिक स्वच्छतागृहात केलेली असते. हॉटेल्स याच किंमतीत तुम्हाला टूथब्रश, एक नवा शर्ट व अंर्तवस्त्रे देतात. म्हणजे सकाळी उठल्यावर कपडे बदलायचे व कामावर हजर व्हायचे. नेहमीच्या हॉटेल्सच्या दरांच्या मानाने या कॅपसूल हॉटेल्सचे दर अतिशय कमी असल्याने ती खूपच लोकप्रिय झाली आहेत.
हा जपानी प्रकार, आता बिजिंगचे 78 वर्षाचे एक रहिवासी हुआंग रिशिन (Huang Rixin) यांनी, बिजिंगमधल्या हायडिआन डिस्ट्रिक्ट मधल्या लिऊलांगझुआंग या भागात सुरू केला आहे. त्यांनी कॅपसूल अपार्टमेंटची 8 युनिट्स तयार केली आहेत. या कॅपसूल्समधे एका व्यक्तीला 2 मीटर वर्ग एवढी जागा मिळते. प्रत्येक कॅपसूलमधे इंटरनेट कनेक्शन, टीव्ही साठी विजेचे व केबलचे कनेक्शन आणि एक बॅग ठेवता येईल एवढी जागा आहे. श्री. हुआंग यांच्या आराखड्याप्रमाणे या कॅपसूल्समधे उभे सुद्धा राहणे शक्य आहे. तसेच एक छोटे कॉम्प्युटर टेबलही ठेवता येईल. या कॅपसूल्सचे महिन्याचे भाडे फक्त 250 युआन किंवा 30 अमेरिकन डॉलर्स आहे. त्यामुळे ही बिजिंगमधली सर्वात स्वस्त अशी निवासी जागा आहे. श्री. हुआंग यांच्या मताप्रमाणे या कॅपसूल अपार्टमेंटला चांगली मागणी आहे. बिजिंगमधे नोकरी व्यवसाय शोधण्यासाठी येणारे खूप लोक असतात. त्यांच्यासाठी ही कॅपसूल्स आदर्श आहेत. ते येथे जास्तीत जास्त 3 महिने राहू शकतात. तेवढ्यात जर त्यांना नोकरी धंदा मिळाला नाही तर त्यांनी गावाकडे परत जावे हे उत्तम



मात्र या कॅपसूल्सना पहिली भाडेकरू मिळाली झांग चि ही 25 वर्षाची तरूणी. ती बिजिंगमधे 5 वर्षे राहते आहे व तिला 3000 युआन पगार आहे. ती आपल्या आई-वडीलांसाठी पैसे साठवण्यासाठी या कॅपसूल्समधे राहणार आहे. तिच्या मताने,. एक स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची अडचण सोडली, तर येथे राहण्याला कोणतीच अडचण नाही.
परंतु बिजिंग मधल्या अनेकाना श्री हुआंग यांचा हा नवा उद्योग पसंत नाही. ही कॅपसूल्स आरोग्य व आग या दोन गोष्टीसाठी सुरक्षित नाहीत असे अनेकाना वाटते आहे. सरकारी अधिकार्‍यांनी हुआंगच्या कॅपसूल्सची पाहणी केली व कमीत कमी 7.5 मीटर वर्ग एवढी जागा आवश्यक असल्याचे ठरवल्याने हुआंग यांना ही पहिली कॅपसूल्स बंद करावी लागली आहेत. परंतु निराश न होता आवाज व आग निरोधक असा नवीन आराखडा बनवण्याच्या मागे हुआंग आहेत. त्यांनी पेटंटसाठी सुद्धा अर्ज केला आहे.
बिजिंगच्या वर्तमानपत्रांच्यात हुआंग यांच्या कॅपसूल्सना प्रसिद्धी दिल्यावर आलेले काही प्रतिसाद वाचनीय आहेत.
" एवढ्या मोठ्या देशात कोणाला या अशा ठिकाणी रहाण्यास लागणे हे देशाचे खरे दुर्दैव आहे व समाजाचे दुख: आहे."
"हे फारच निराशाजनक आहे. दहा वर्षे शिक्षण घेतल्यावर अशा ठिकाणी राहण्यास लागावे. मेल्यावर शवपेटीही एवढीच असते."
" पोलिसांच्या गाड्या म्हणून BMW Cars वापरण्यापेक्षा हे जास्त देशाच्या परिस्थितीनुरूप आहे."
" 96 लाख वर्ग किलोमीटर देश आणि निवास फक्त 2 वर्ग मीटर जास्त दु:खी कोण हे कळत नाही!"
"मृत देह जाळणे बंद करून शवपेट्यांना प्रोत्साहन द्या. प्रत्येकाला एक शवपेटी द्या. त्यात ते राहू शकतात, झाडाला टांगून ठेवू शकतात किंवा पुरून ठेवू शकतात!"
लोकांचे प्रतिसाद काहीही असले तरी श्री हुआंग मात्र आपल्या या उद्योगाबद्दल अतिशय आशाजनक आहेत. ते म्हणतात की "मी पैसे मिळवण्यासाठी हे काम हातात घेतलेले नाही. स्थलांतरित व शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या निवासाची सोय स्वस्तात व्हावी म्हणून हा माझा प्रयत्न आहे. "
25 जून 2010

बुधवार, जून ०९, २०१०

शांघायचे आधुनिक भामटे


या वर्षी म्हणजे 2010 मधे, चीनमधल्या शांघाय या शहरात जागतिक एक्स्पो हे मोठे प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक परदेशी पाहुणे शांघायला भेट देत आहेत. या एक्स्पोच्या निमित्ताने, शांघायमधल्या व पर्यायाने चीनमधल्या आंतर्राष्ट्रीय व्यापारउद्योगात प्रचंड वाढ झाली आहे. शांघायमधल्या हुआंगपू नदीच्या काठाने असलेल्या पॉश हॉटेल्स व बार मधून एखादी सहज चक्कर जरी टाकली तरी अनेक परदेशी पाहुणे व त्यांचे चिनी यजमान नुकत्याच सह्या केलेल्या बिझिनेस कॉंन्ट्रॅक्ट्स बद्दल मद्याचे पेले उंचावून आनंद व्यक्त करताना कधीही दिसतील.
मुहम्मद रेझा मौझिन हा 63 वर्षाचा, मूळ जन्माने इराणी पण आता जर्मन नागरिकत्व पत्करलेला , एक व्यावसायिक आहे. बांधकामासाठी लागणार्‍या मशिनरीच्या खरेदी विक्रीचा तो व्यवसाय करतो. M.C.M. या नावाची त्याची व्यापारी पेढी जर्मनीमधल्या मानहाईम या शहरात आहे. स्वत: मौझिन, त्याचा मुलगा व तीन कर्मचारी मिळून हा व्यवसाय बघतात. गेली 30 वर्षे मौझिन हा व्यवसाय करतो आहे. पोलंड व रशिया मधे अशा प्रकारची मशिनरी विकत घ्यायची व इराणमधल्या ग्राहकांना ती विकायची असा मुख्यत्वे त्याचा व्यवसाय आहे. मौझिन हा काही नवशिका धंदेवाईक नाही. या धद्यात त्याचे केस पांढरे झाले आहेत.
चीनबद्दल आता इतके ऐकू येते आहे तेंव्हा आपण आपल्या व्यापाराचे क्षेत्र चीनपर्यंत वाढवावे असे मौझिन याच्या मनाने घेतले. मौझिनने इंटरनेटवर शोध घेतल्यावर त्याच्या असे लक्षात आले की तो खरेदी करत असलेल्या मशिनरी सारखी बरीच मशिनरी, चीनमधे सहज रित्या उपलब्ध आहे व अशा मशिनरीच्या विक्रीसाठी उपलब्धतेच्या जाहिराती इंटरनेटवर सतत दिसत आहेत.
मौझिनला इराण मधल्या एका ग्राहकाकडून त्या वेळेस एका क्रेनबद्दल विचारणा होती. त्या ग्राहकाला हवी तशी व Kato या जपानी कंपनीने बनवलेली क्रेन, मौझिनला एका चिनी संकेत स्थळावर सापडली. मौझिनने त्यांच्याशी ई-मेल द्वारे बोलणी चालू केली व शेवटी किंमत व इतर अटी मान्य झाल्या व डील फायनल करावयाचे ठरले.
मौझिन व त्याचा मुलगा यासाठी शांघायला गेले. त्यांनी क्रेनची तपासणी केली व त्यांना ती पसंत पडल्यावर ती खरेदी करण्यासाठी त्यांनी 1,22000 अमेरिकन डॉलर्सची किंमत फायनल केली. त्याच्या चिनी पुरवठादारांनी त्याच्या आदरार्थ एक मेजवानीही आयोजित केली. हे चिनी पुरवठादार त्याच्याशी अगदी नम्रपणे वागल्याने व त्याला वडिलधार्‍यांसारखे त्यांनी वागवल्याने मौझिन अगदी खुष झाला. या चिनी पुरवठादाराने त्याला सांगितले की आम्ही चिनी या धंद्यात नवीन आहोत व आम्ही तुमच्याकडून हा धंदा शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. या धंद्यात बरीच वर्षे असल्याने व त्याला या धंद्यातील खाचाखोचींची चांगलीच माहिती असल्याने मौझिनने प्रत्यक्ष स्वत: समोर उभे राहून ही क्रेन कंटेनर मधे ठेवून घेतली. ती ठेवली जात असताना त्याने कंटेनर नंबर व क्रेनची डिटेल्स स्पष्ट दिसतील असे फोटो काढले
 ऑर्डर केलेला क्रेन
 हा कंटेनर नंतर एका शिपिंग एजंट कंपनीच्या ट्रकवर ठेवून त्या शिपिंग एजंट कंपनीकडे पाठवण्यात आला. त्याचाही फोटो मौझिनने काढला. मौझिन आणि त्याचा मुलगा हे रात्री 1 वाजेपर्यंत त्या ट्रक बरोबर राहले व जेंव्हा तो ट्रक कस्टम ऑफिस व शांघाय बंदराकडे जाणार्‍या ट्रक्सच्या रांगेत उभा राहिला तेंव्हाच ते हॉटेलवर परत आले.
 शांघाय डॉक्स
आपला पहिलाच डील इतका छान झाल्यामुळे मौझिनने आणखी एक क्रेन खरेदी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने 60000 यूरो ऍडव्हान्स दिला व क्रेनची मशागत व त्यावर वातानुकूलन यंत्र बसवण्यासाठी त्याने आणखी पैसे दिले.या दुसर्‍या क्रेनचे काम चायना हेवी मशिनरी लिमिटेड या कंपनीकडे सुपुर्त करण्यात आले. एकंदरीतच सर्व गोष्टी मनासारख्या पार पडल्याने मौझिन जर्मनीला मोठ्या आनंदात परतला.
जर्मनीला परतल्यावर थोड्याच दिवसात मौझिनच्या ऑफिसला चायना हेवी कंपनीकडून ई मेल्सची रीघ सुरू झाली. या दुसर्‍या क्रेनचे मूळ वायरिंग, वातानुकूलन यंत्र बसवताना जळून गेल्याचे त्यांनी सांगितले व नवीन वायरिंग बसवण्यासाठी 40000 यूरोची मागणी केली. शेवटी चायना हेवी कंपनीने त्याला एक मेल पाठवून तो जर पुढच्या 8 तासात त्यांना वैयक्तिक रित्या भेटू शकला नाही तर या कामाशी आपला संबंध राहणार नाही असे सांगून हात झटकून टाकले. चीनचा विमान प्रवासच 11 तासाचा असल्याने 8 तासात तिथे पोचणे अशक्यच होते.
मध्यंतरीच्या काळात इराणला पाठवण्यात आलेली क्रेन तिथे पोचली. ती पोचल्यावर Kato कंपनीच्या क्रेनऐवजी Mistubishi कंपनीच्या एका पुरातन क्रेनचे भंगार कंटेनरमधे आहे असे आढळून आले.
 प्रत्यक्षात पुरवठा झालेला क्रेन
मौझिनला हे कसे काय घडले असेल हेच कळेना शेवटी तो या निर्णयाप्रत आला की कस्टमकडे जाणार्‍या ट्रक्सच्या रांगेत त्याचा ट्रक उभा असताना त्यातील क्रेन बदलण्यात आली असावी. याचा अर्थ स्पष्ट होता. त्याच्या पुरवठादार कंपनीबरोबरच शांघाय बंदर व कस्टम्स यांचीही लोक या गुन्ह्यात सामील होते.
अतिशय डेस्परेट अवस्थेत मौझिन व त्याचा मुलगा परत शांघायला गेले. प्रथम त्यांनी पोलिसांमधे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सर्व गोष्टी ऐकून घेतल्या फोटो बघितले व गुन्हा घडला असल्याचे मान्य केले. परंतु जास्त चोकशी करून या सर्व गॅन्गची पाळे मुळे खणून काढली पाहिजेत असे म्हणून त्यांनी कोणासही अटक करण्यास नकार दिला.
मौझिन आणि चायना हेवी यांच्यातील बैठकीचा असाच बोजवारा उडाला. त्यांच्या मते त्यांच्या कडे आलेली क्रेन निराळ्याच कंपनीची होती. मौझिनने जपानी ब्रॅन्डची क्रेन घेण्याचे ठरवले होते परंतु चीन मधे या क्रेनचे नाव दुसरेच होते. मौझिन 8 तासात त्यांना न भेटल्याचे कारण देऊन त्यांनी आता हात पूर्णपणे झटकूनच टाकले. चायना हेवी बद्दलची कोणतीही तक्रार सुद्धा दाखल करून घेण्यास पोलिसांनी पूर्ण नकार दिला.
आपण पूर्णपणे फसवलो गेल्याचे मौझिनच्या आता लक्षात आले. इंटरनेटवर बघत असताना त्याच्या लक्षात आले की त्याने प्रथम खरेदी केलेली क्रेन आता परत विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे. त्याने पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तक्रारही दाखल करून घेतली नाही.
मौझिनने दिलेला सर्व ऍडव्हान्स तर पाण्यातच गेला आहे आणि त्याच्या इराणी ग्राहकाला त्याला चुकीचा पुरवठा केल्याबद्दल 30% पेनल्टीही द्यावी लागणार आहे. मौझिनचा उत्तम स्थितीतील धंदा आता पूर्ण डबघाईला आला आहे. हा धंदा वाचणार कसा असा प्रश्न त्याच्या पुढे निर्माण झाला आहे.
एकोणिसाव्या शतकात शांघाय हे अफूच्या विक्रीचे मुख्य केंद्र होते. त्या वेळी पुष्कळदा अफूच्या गिर्‍हाईकाला संपूर्णपणे लुटण्यात येत असे. त्याला 'शान्घाइड' (Shanghaied) असा शब्द प्रयोग रूढ झाला होता. आज एकविसाव्या शतकात मौझिन आणि त्याचा मुलगा यांना आपण शांघायच्या आधुनिक भामट्यांकडून परत एकदा 'शांघाइड' झालो आहोत हे लक्षात आले आहे. पण सध्या तरी हात चोळत बसण्याशिवाय त्यांच्या हातात काही नाही.
9 जून 2010

शुक्रवार, जून ०४, २०१०

भुताटकीचे गाव



चारी बाजूंनी पसरलेल्या वाळवंटात प्रवास करताना तुमच्या नजरेसमोर जर एखादे आधुनिक गाव अचानक आले तर तुम्हाला काय वाटेल? चारी दिशांना जाणारे मोठे राजरस्ते, त्यांच्या बाजूला मोठमोठ्या आधुनिक इमारती हे सगळे पाहून आपण हे सगळे प्रत्यक्षात बघतो आहोत की स्वप्नात? असा विचार तुमच्या मनात नक्कीच डोकावून गेल्या शिवाय रहाणार नाही. पण या एवढ्या मोठ्या परिसरात वाहने जाताना दिसत नाहीत. लोकांची वर्दळ दिसत नाही हे बघून कोठेतरी काहीतरी विचित्र आहे अशी तुमची समजूत झाल्याशिवाय रहाणार नाही हे नक्की

हे दृष्य तुम्हाला दिसेल चीनमधल्या इनर मंगोलिया प्रांतातल्या चिंगशुईहे या काऊंटी मधल्या वॅंगुइयाओ गावाजवळ.(Wangguiyao town)  ही काऊंटी ज्या भागात आहे तो आहे एक वाळवंटी प्रदेश. अनेक टेकड्यांच्या रांगा व त्यातून भणाणता वारा असेच दृष्य या भूभागात बघायला मिळते. अशा या ओसाड व वैराण प्रदेशात हे निर्मनुष्य गाव उभे आहे. अनेक इमारती पूर्ण बांधलेल्या आहेत तर अनेक इमारती कामगार काम सोडून पळून गेल्याने नुसत्या पोकळ सांगाड्यांच्या स्वरूपात उभ्या आहेत. रस्त्यावर वाहने दिसत नाहीतच पण खूप वेळ उभे राहिले तर एखादा जवळपासच्या शेतामधला ट्रॅक्टर रस्त्याने जा ये करताना दिसतो


या काऊंटीच्या स्थानिक पुढार्‍यांनी हा प्रकल्प हातात घेतला खरा! पण त्यांच्याकडे तो पूर्ण करण्यासाठी पैसेच नसल्याने आता तो अर्धवट सोडून द्यावा लागला आहे. हा प्रकल्प जवळच्याच एका गावातल्या लोकांचे स्थलांतर करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी हातात घेतला गेला होता. पण या नवीन प्रकल्पात घरे, शाळा वगैरे मिळण्याऐवजी त्या लोकांना आपल्या जुन्या गावातच रहावे लागत आहे आणि स्थानिक प्रशासनाकडे पैसेच नसल्याने दुसर्‍या कोणत्याच कामावर किंवा प्रकल्पावर पैसे खर्च करता येत नाहीत. या प्रकल्पावर अनेक मिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च झाले आहेत. चिंगशुईहे चे लोक स्थानिक प्रशासनावर साहजिकच अतिशय संतापलेले आहेत


एका स्थानिक अधिकारी पॅन ली याच्या मते, हा प्रकल्प स्थानिक प्रशासनाने मंजूर करून मध्यवर्ती सरकारकडे पाठवला होता व त्याची मंजुरीही घेतली होती. परंतु मध्यवर्ती सरकारच्या संकेत स्थळावर मंजूर प्रकल्पांच्या यादीत या प्रकल्पाचे नाव आढळून येत नाही. या प्रांताची राजधानी होहहॉट जवळच हा प्रकल्प उभारण्यात येत होता. हा भाग चीनच्या अत्यंत दरिद्री भागापैकी एक समजला जातो. हा प्रकल्प झाल्यावर या भागातील गुंतवणूकीला प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिक व्यापार उदिम तेजीत येईल अशी कल्पना होती. पण प्रत्यक्षात स्थानिक प्रशासनाने स्वत:जवळचे सर्व पैसे या प्रकल्पावर खर्च करून टाकल्याने त्यांच्या जवळ कोणतीही विकासकार्ये करण्यासाठी पैसेच आता उरलेले नाहीत. या प्रकल्पावर एकूण खर्च किती होणार होता? व त्या पैकी प्रत्यक्षात किती खर्च झाला? याबाबत स्थानिक प्रशासन काहीच बोलत नाही परंतु चिनी वर्तमानपत्रांच्या मताने हा प्रकल्प 880 मिलियन अमेरिकन डॉलर्सचा होता. ही रक्कम स्थानिक प्रशासनाच्या वार्षिक अंदाजपत्राच्या(4.4 मिलियन अमेरिकन डॉलर्स) अनेक पट अधिक आहे



स्थानिक लोकांच्या मताने, या प्रकल्पामुळे या भागाचा विकास किमान 10 वर्षांनी तरी मागे पडला आहे. या नव्या प्रकल्पात बांधण्यात येणार्‍या एका हॉटेलच्या प्रकल्पावर जिंग वेन हा वॉचमन म्हणून राहतो आहे. तो म्हणतो की या प्रकल्पाचे काम 2005 मधे सुरू झाले व दोन वर्षांनी ते थांबले. त्यानंतर पुन्हा कधीच कोणतीही काम सुरू झालेले नाही. जिंग वेन व त्याची बायको हे दोनच रहिवासी या गावात सध्या राहतात. चिनी माध्यमांच्या मताने चिंगशुईहे प्रशासनाने, बिजिंगची मंजूरी मिळेलच असे धरून हा प्रकल्प सुरू केला पण बिजिंगची मंजूरी त्यांना मिळालीच नाही. त्यांनी काम तसेच चालू केले होते. चिंगशुईहे प्रशासनाकडचे पैसे संपले असे म्हणणे योग्य होणार नाही. त्यांच्याकडे मुळातच पैसे नव्हते. स्थानिक प्रशासनाचे अधिकारी या प्रकल्पाबद्दल काहीही बोलण्यास राजी होत नाहीत.

जुन्या गावातील रस्ता व एक मांस विक्रेता
हॉन्गकॉन्गच्या सिटी युनिव्हर्सिटी मधले एक प्रोफेसर जोसेफ चेंग म्हणतात की " चीनच्या ग्रामीण भागातले पुढारी वाटेल तशी मनमानी करताना दिसतात. याचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक जनतेला त्यांच्यावर नियंत्रण कोणत्याही पद्धतीने ठेवता येत नाही व लांब असलेले मध्यवर्ती शासन त्यांच्यावर कोणताही अंकुश ठेवू शकत नाही. कम्युनिस्ट पार्टीचा स्थानिक सेक्रेटरी हाच बहुतेक ठिकाणी सर्वै सर्वा असतो व लोकशाहीमधे निरनिराळ्या गटांच्या दबावामुळे शासनाच्या मनमानी करण्यावर जसे नियंत्रण ठेवले जाते तसे या ठिकाणी होत नाही व असे प्रकल्प हातात घेतले जातात व शेवटी लोकांचेच नुकसान होते.
4 जून 2010