बुधवार, एप्रिल २८, २०१०

सरकती कपाटे, गुप्त प्रवेशद्वारे व कळी दाबून उघडणारे दरवाजे


या लेखाचा मथळा वाचून मी आता एखादी रहस्यकथा वगैरे लिहायला तर सुरुवात केली नाही ना? अशी शंका तुमच्या मनात येणे साहजिकच आहे. परंतु मी रहस्यकथा वगैरे काही लिहित नाहीये. मी लिहितो आहे चीनमधल्या शांघाय शहरातल्या दुकानांबद्दल! आणि मुख्यत्वे करून सी.डी किंवा डी.व्ही.डी विकणार्‍या दुकानांबद्दल. शांघाय शहराला, बनावट (पायरेटेड) सी.डी व डी.व्ही.डी यांची जागतिक राजधानी म्हटले जाते. या बनावट सी.डी व डी.व्ही.डी.येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात की अमेरिकेतील Motion Picture Association of America या संस्थेच्या प्रतिनिधींनी सुद्धा येथे हात टेकले आहेत. मागच्या आठवड्यात चिनी सरकारने सुद्धा या बाबतीत आपण काही करू शकत नसल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. National Copyright Administration या सरकारी संस्थेने एक पत्रक काढून या बनावट सी.डी व डी.व्ही.डी उत्पादनात अनेक परवानाधारक ऑडियो व व्हिडियो कंपन्या, इतकेच नाही तर काही सरकारी मालकीच्या कंपन्यांचाही सहभाग असल्याचे मान्य केले आहे. परंतु या बनावट सी.डी उत्पादकांवर गंभीर रित्या काही कारवाई होऊ शकेल असे कोणालाच वाटत नाही

लॉव्हेल्स या विधी (लॉ) विषयक संस्थेतील, बौद्धिक हक्कांच्या बाबतीतले एक तज्ञ वकील,मिस्टर. डग्लस क्लार्क हे म्हणतात की शांघायमधल्या या धंद्याचे सॉफिस्टिकेशन व ज्या उघडपणे हा धंदा केला जातो तो बिनधास्तपणा अक्षरश: आश्चर्यजनक आहे. या बनावट सी.डी बनवणारे लोक, काही चोरून मारून हा धंदा करत नाहीत व त्याचा एकच अर्थ निघतो की या धंदेवाल्यांचे पोलिस व शासन यांच्याशी उत्तम लागे बांधे असले पाहिजेत व त्यांना पोलिस व शासनाकडून पूर्ण संरक्षण मिळत असले पाहिजे. सी.डी किंवा डी.व्ही.डी विकणारी ही दुकाने शांघायला भेट देणार्‍या परदेशी पर्यटकांनी नुसती गजबजलेली असतात. झगमगत्या दिव्यांच्या प्रकाशात कपाटांच्या लांब लांब ओळींमधे या बनावट सी.डी व डी.व्ही.डी अगदी उघडपणे मांडून ठेवलेल्या दिसतात. हॉलीवूडच्या अगदी नवीन व तुफान धंदा करणार्‍या Avatar,Tim Burton's Alice in Wonderland, सारख्या चित्रपटांपासून ते Lady Gaga's latest CD The Fame सारख्या ऑडियो सी.डी एखादा डॉलर एवढ्याच किंमतीला राजरोसपणे मिळतात.इथले विक्रेते आपल्याकडे असलेल्या सी.डी.चे कलेक्शन (अर्थातच बनावट) अमेरिकेतील 'ब्लॉकबस्टर' किंवा 'नेटफ्लिक्स' यांच्यापेक्षाही जास्त मोठे असल्याचे अभिमानाने सांगतात.

पुढच्या महिन्यात शांघायमधे वर्ल्ड एक्स्पो हे आंतर्राष्ट्रीय प्रदर्शन सुरू होणार आहे. 6 महिने चालू रहाणार्‍या या प्रदर्शनाला निदान 7 कोटी पर्यटक तरी भेट देतील अशी अपेक्षा आहे. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी येणार्‍या पाहुण्यांना, शांघाय हे एक आंतर्राष्ट्रीय दर्जाचे महानगर आहे असे दिसले व वाटले पाहिजे चिनी सरकारने ठरवले आहे. व त्यासाठी शांघाय चकाचक करण्याचे प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या बनावट सी.डी राजरोसपणे विकणार्‍या दुकानांविरुद्ध, एक मोहिम उघडण्यात आली आहे. चिनी सरकारचा प्रवक्ता म्हणतो की आम्ही अशी 3000 दुकाने बंद केली आहेत. व अनेक दुकानदारांना त्यांच्याकडे असलेल्या बनावट सी.डी नष्ट करण्यास भाग पाडले आहे.
आज जर एखादा पर्यटक या सी.डी. विकणार्‍या दुकानांना भेट द्यायला गेला तर या सर्व दुकानांचा आकार एकदम निम्माच झाला आहे हे त्याच्या लगेच लक्षात येईल. या सर्व दुकानांनी मध्यभागी एक पार्टीशन बांधले आहे. या पार्टीशनच्या पलीकडे जाण्यासाठी एक कपाट सरकवावे लागते व आतल्या अंधर्‍या जागेतून पुढे जाऊन एक कळ दाबून एक गुप्त दरवाजा उघडावा लागतो. या दरवाज्याच्या पलीकडे हजारो बनावट सी.डी व डी.व्ही.डी मांडून ठेवलेल्या आहेत. ऑस्कर्स क्लब, या प्रसिद्ध दुकानात एक पोस्टर लावले आहे. एक्सपो प्रदर्शनाचे मॅसकॉट या पोस्टरमधे बनावट सीडी नष्ट करताना दाखवले आहे व त्या खाली 'बनावटी सी.डी विरुद्ध युद्ध' अशी घोषणा लिहिली आहे. परंतु गंमतीची गोष्ट म्हणजे या दुकानातील विक्रेते, विचारल्यास लगेचच तुम्हाला गुप्त दरवाज्याने कसे जायचे हे तत्परतेने सांगतात. मूव्ही वर्ल्ड, इव्हन बेटर दॅन मूव्ही वर्ल्ड ही शांघायमधली आणखी काही प्रसिद्ध दुकाने आहेत. या मधली परिस्थिती काही फारशी वेगळी नाही
 Zhou Weimin, हे शहराच्या cultural market administrative enforcement team चे संचालक आहेत. ते म्हणतात की शांघायमधे बनावट सी.डी मिळणे आता केवळ अशक्य आहे. परंतु जर कोणी अशा गुप्त खोल्या बांधल्या असतील तर त्या आम्ही नष्ट करू. मिस्टर. झोऊ काहीही सांगत असले तरी तुम्हाला “Lost,” “CSI: New York” किंवा “Grey’s Anatomy" सारख्या नवीन टीव्ही सिरियल्सच्या सीडी हव्या असतील किंवा नवीन चित्रपटांच्या सीडी हव्या असतील तर शांघायमधला कोणताही दुकानदार तत्परतेने तुम्हाला गुप्त दरवाज्याने गुप्त खोलीत घेऊन जाईल.

शांघायमधला बनावट सीडी विकण्याचा हा धंदा आता फक्त एकाच गोष्टीमुळे बंद पडू शकतो. नवे संगीत किंवा चित्रपट जालावरून डाऊनलोड करता येतील अशी असंख्य संकेतस्थळे (वेब साईट्स) चिनी लोकांना उपलब्ध होत आहेत. या संकेत स्थळांवरून पूर्णपणे मोफत, तुम्हाला पाहिजे तो चित्रपट किंवा संगीत डाउनलोड करणे शक्य झाले आहे. ही पद्धत लोकप्रिय होत चालली आहे. काट्याने काटा काढावा तसा एक बेकायदेशीर धंदा दुसर्‍या बेकायदेशीर धंद्यानेच फक्त बंद पडेल असे वाटते.
28 एप्रिल 2010

बुधवार, एप्रिल ०७, २०१०

सरकारी गुंड सेना चेनगुआन (Chengguan)

मार्च महिन्याच्या 26 आणि 27 तारखेला, थायलंड, ब्रम्हदेश व लाओस या देशांच्या सीमांना लागून असलेल्या चीनमधल्या युनान प्रांताची राजधानी कुनमिंग येथे, रात्रीच्या वेळी मोठे दंगे उसळले. हे दंगे रस्त्यावरचे पथारीवाले, फेरीवाले आणि कायदा व सुव्यवस्था अधिकारी यांच्यामधे झाले होते. भारताप्रमाणेच चीनमध्येही या प्रकारचे दंगे बर्‍याच वेळा होतात व या बातमीला काही फार महत्वाची बातमी असे म्हणता आले नसते. परंतु हे दंगे पथारीवाले, फेरीवाले आणि पोलिस यांच्यात न होता चेनगुआन या दलाच्या जवानांबरोबर झाले होते हे कळल्यावर या बातमीला एक नवीनच महत्व प्राप्त झाले. कुनमिंग मधल्या फेरीवाल्यांमधे अशी अफवा पसरली होती की चेनगुआनच्या जवानांनी एका फेरीवाल्याला बेदम मारहाण केली व त्यातच त्या फेरीवाल्याचा मृत्यू झाला. हे समजताच फेरीवाले भडकले व त्यांनी दंगा करण्यास सुरुवात केली; दहा सरकारी वाहने जाळण्यात आली व अनेक लोक जखमी झाले.
चेनगुआन हे City Administration and Law Enforcement Bureau या दलाचे संक्षिप्त चिनी नाव आहे. हे दल चीनमधल्या बहुतेक प्रमुख शहरांच्यात कार्यरत असते. या दलाला पोलिस दलाचा लांबचा भाऊ म्हटले तरी चालेल. या दलाचे अधिकृत कार्य, शहरांच्यातील रस्त्यावर विक्री करणार्‍या व अनधिकृत असलेल्या फेरीवाल्यांची तिथून हकालपट्टी करणे व ज्या इमारती पाडण्याबद्दल सरकारी आदेश निघेल, त्या इमारती, भुईसपाट होत आहेत की नाही यावर देखरेख करणे, हे आहे. प्रत्यक्षात या दलाचे जवान सरकारी गुंड म्हणूनच ओळखले जातात. धाकटदपशा व गुंडगिरी याबद्दल हे जवान चीनमधे प्रसिद्ध आहेत.


कुनमिंगमधे कोणा फेरीवाल्याचा मृत्यू प्रत्यक्षात झालेला नव्हता हे जरी खरे असले तरी चेनगुआन दलाचे जवान अशा प्रकारच्या प्रकरणांबाबत प्रसिद्ध आहेत. 2008 च्या जानेवारी महिन्यात चीनच्या मध्यवर्ती भागातील हुबेई प्रांतातील काही खेडुतांनी त्यांच्या खेड्याजवळचा कचरा डेपो हलवावा म्हणून आंदोलन केले. या खेडुतांचे आंदोलन बंद पाडण्यासाठी, चेनगुआनचे जवान त्यांना मारहाण करत असल्याचे शूटिंग एका माणसाने केले. यामुळे चिडून चेनगुआनच्या जवानांनी या माणसाला इतकी मारहाण केली की तो मरणच पावला. जुलै महिन्यात शांघाय शहरातल्या एका फेरीवाल्याचा मेंदू मारहाणीमुळे निकामी झाला होता तर ऑक्टोबर महिन्यात बिजिंग मधल्या एका माणसाला तो त्याची मोटर सायकल अनधिकृतपणे टॅक्सी म्हणून वापरत असल्याच्या आरोपावरून चेनगुआनच्या जवानांनी बेदम मारहाण केली त त्यात त्याचा मृत्यू झाला.
नोव्हेंबर महिन्यात, सिचुआन प्रांतातल्या एका महिलेच्या घरात चेनगुआनचे गुंड घुसले व सरकारी आदेशाप्रमाणे हे घर पाडावयाचे असल्याने त्या महिलेला घराच्या बाहेर काढू लागले. त्या महिलेने स्वत:ला पेटवून घेतले व त्यातच तिचा मृत्यू झाला. मागच्या वर्षीच्या मे महिन्यात नानजिंग शहरातल्या शेकडो कॉलेज विद्यार्थ्यांनी आपल्या एका सहाध्यायीला मारहाण केली म्हणून चेनगुआन विरुद्ध निदर्शने केली होती तर जून महिन्यात ग्वांगडॉंग मधल्या दंगलखोरांनी चेनगुआनच्या जवानांना पकडून ठेवले होते. शेवटी पोलिसांना कारवाई करून त्यांना सोडवावे लागले.


मागच्या वर्षी कुनमिंग मधेच एका फेरीवाल्याचा मृत्यू झाल्यावर इतर फेरीवाल्यांनी त्याचे प्रेत एका हातगाडीवर घालून चेनगुआनच्या ऑफिसात नेले होते व तिथे दहनाचे प्रतीक म्हणून काही कागद जाळले होते. चेनगुआनने वर्णिल्याप्रमाणे या फेरीवाल्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांनीच म्हणे झाला होता. याच महिन्यात शांघाय मधल्या एका माणसाने त्याच्यावर चेनगुआनच्या अधिकार्‍यांनी खोटे गुन्हे दाखल करून घेतले म्हणून सार्वजनिक जागी स्वत:च्या हाताचे एक बोट तोडून घेतले.


चेनगुआनच्या गुंडगिरीची व दुष्कीर्तीची आता चीनमधल्या माध्यमांनीही दखल घ्यायला सुरुवात केली आहे. एका वृत्तपत्राच्या मताप्रमाणे जनमानसात, चेनगुआनच्या बद्दल असलेला असंतोष आता खदखदतो आहे व कोणत्याही क्षणी त्याचा स्फोट होण्याची शक्यता आहे. हा असंतोष जरी सध्या चेनगुआनच्या विरोधात असला तरी प्रत्यक्षात तो स्थानिक अधिकार्‍यांची मनमानी आणि जुलुम यांच्याबद्दल आहे.

कुनमिंगमधे 26 मार्चला एका फेरीवालीवर झालेल्या चेनगुआनच्या अत्याचाराचे वर्णन एका वर्तमान पत्राने दिले आहे. या पत्रातील बातमीप्रमाणे या फेरीवालीला चेनगुआनच्या गुंडांनी रस्त्यावर आडवे पाडले व तिची हातगाडी तिच्या देहावर टाकली व त्यावर तिला हलता येउ नये म्हणून एक गॅस सिलिंडर टाकला. या प्रकारात ती बाई बेशुद्ध पडल्यावर चेनगुआनचे लोक तिथून हटले.

बिजिंग मधल्या काही कायदे तज्ञांनी, सरकारला कोणतीही खाजगी इमारत मनमानी करून पाडता येऊ नये यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचे सांगितले आहे. यु जिआनरॉंग हा बुद्धीवादी, चेनगुआन विरुद्धच्या या छोट्या मोठ्या घटनांना समाजात मोठ्या प्रमाणात असलेल्या असंतोषाच्या विस्फोटाच्या धोक्याची घंटा मानतो. आंतरजालावर प्रसिद्ध झालेल्या त्याच्या लेखात तो म्हणतो की चीनमधे अतिशय मोठ्या प्रमाणात सामाजिक असंतोष आहे व चिनी अधिकारी ज्या पद्धतीने तो दडपू पहात आहेत ती पद्धत बघता, त्याचा मोठा स्फोट होण्याची शक्यता जाणवते. अशा प्रकारचा स्फोट हे देशावरील सर्वात मोठे संकटच ठरू शकते.

आपल्याकडे काही राजकीय पक्ष अशा प्रकारच्या संघटना उभ्या करून गुंडगिरी करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात. परंतु ज्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे राज्य राखायचे ते सरकारी नोकरच जर गुंडगिरी करू लागले तर सर्व सामान्य लोकांनी कोणाकडे पहायचे? चीन मधे हेच घडते आहे.
7 एप्रिल 2010