रविवार, फेब्रुवारी २८, २०१०

एड्स फोबिया



चीनच्या दक्षिण भागात असलेल्या ग्वांगडॉंग या प्रांतातील Peoples No. 8 Hospital मधे काम करणारे डॉक्टर चाय वेपिंग हे एक वरिष्ठ संशोधक आहेत. एड्स किंवा एचआयव्ही या रोगाबद्दल ते संशोधन करतात. काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने या डॉक्टरांची अपॉइंटमेंट मागितली. पण त्याने हॉटेलच्या एका रिकाम्या खोलीतच आपण डॉक्टरांची भेट घेऊ असे आग्रहाने सांगितले. भेटीच्या वेळी या व्यक्तीने चेहर्‍यावर फेस मास्क लावला होता. डॉक्टरांनी याचे कारण विचारल्यावर आपल्याला एड्स हा रोग झाला आहे व तो आपली लाळ व घाम यांच्या द्वारा पसरत असल्यामुळे आपण ही काळजी घेत असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी त्याचे जुने अहवाल बघायला मागितले. या सर्व अहवालांनुसार या व्यक्तीला एड्स या रोगाचे कोणतेही लक्षण नव्हते. या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे एकदा वेश्यागमन केल्यामुळे त्याला हा रोग झाला आहे. या व्यक्तीने सात वेळा निरनिराळ्या इस्पितळांत एड्सच्या चाचण्या करून घेतल्या होत्या. प्रत्येक वेळी ही चाचणी निगेटिव्हच आली असली तरी त्या व्यक्तीला आपल्याला हा रोग झालाच आहे असे वाटत होते. आपण सर्व चाचण्या करून घेतल्या आहेत. डॉक्टरांच्या मते आपल्याला काहीही झालेले नाही पण आपण आजारीच आहोत या विचारावर ती व्यक्ती ठाम होती.

डॉक्टर चाय वेपिंग या व्यक्तीच्या परिस्थितीला एक मानसिक रोग मानतात व त्या रोगाला त्यांनी एड्स मनोगंड किंवा HIV फोबिया असे नाव दिले आहे. त्यांच्या मते जगातील सर्व देशांच्यातच असे मानसिक रुग्ण सापडतात. परंतु चीनमधल्या एकंदर परिस्थितीमुळे चीनमधे हे मानसिक रुग्ण बर्‍याच जास्त प्रमाणात आहेत. या मानसिक रुग्णांच्यामुळे, एड्सच्या विरुद्ध लढा देणार्‍या डॉक्टर्स व इतर कर्मचारी आणि एकूण वैद्यकीय प्रणालीवरच अनावश्यक ताण येतो आहे.


आपल्याला एड्स झाला आहे असे वाटणार्‍या इंटरनेट ग्राहकांनी आता चीनमधे आपले विशेष चॅट कक्ष स्थापन केले आहेत. एका अंदाजाप्रमाणे अशा कक्षांची संख्या पंधराच्या आसपास तरी आहे. एका अशाच चॅट कक्षातल्या एका सभासदाने आपले वर्णन करताना लिहिले आहे की " मला एड्स झाला आहे याबद्दल माझी खात्री आहे. दुसर्‍यांना संसर्ग होऊ नये म्हणून मी हा चॅट कक्ष जॉइन केला आहे. मी आवश्यक ती खबरदारी घेऊन एकदा वेश्यागमन केल्यावरही मला हा रोग झाला. यानंतर 24 तासातच मला ओकारी झाली. डोके मनस्वी दुखू लागले, चक्कर येऊ लागली, शरीरातले अवयव सुजत आहेत असे वाटू लागले व वेदना सुरू झाल्या. असे अनेक महिने चालले. मी अनेक इस्पितळात चाचण्या करून घेतल्या पण तेथे मला काहीच झालेले नाही असे निदान केले गेले." चीनमधल्या वैद्यकीय व्यवस्थेबद्दल अत्यंत असमाधानी असलेल्या या व्यक्तीने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनशी संपर्क साधून आपल्या आजाराबद्दल त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

शांघाय मधल्या Pasteur Institute ला मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून स्वत:ला एड्सने आजारी समजणार्‍या लोकांची पत्रे येण्यास सुरवात झाली. आतापर्यंत त्यांनी अशा 5 मानसिक रुग्णांना तपासून, त्यांना एड्स झाला नसल्याचे सांगितले. या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना एड्सची सर्व लक्षणे आहेत. त्यामुळे या संस्थेने या मानसिक रुग्णांचा एक अभ्यासच आता सुरू केला आहे.

China's Centre for Disease Control या संस्थेने तर अशा 60 मानसिक रुग्णांचा एक गट स्थापन केला आहे. या लोकांना एड्स झालेला नसतानाही एड्सची लक्षणे आहेत. निरनिराळ्या ठिकाणी डॉक्टरांच्याकडे आलेल्या या सर्व मानसिक रुग्णांमुळे, चीनमधल्या वैद्यकीय प्रणालीने हे आता मान्य केले आहे की चीन मधे आता असे शेकडो रुग्ण आहेत ज्यांना एड्स झालेला नाही पण त्यांच्या आजाराची लक्षणे अगदी एड्स प्रमाणेच आहेत.
या मानसिक म्हणा किंवा काल्पनिक म्हणा पण अस्तित्वात असलेल्या नवीन रोगाची सुरवात चीनमधल्या 2004 सालच्या सार्स या भयानक रोगाच्या साथीनंतर सुरू झाली. सार्सच्या साथीच्या वेळी चीनमधल्या वैद्यकीय प्रणालीने सर्व गोष्टी लपवून ठेवल्या व लोकांना माहिती पुरवली नाही. चीनमधे सार्समुळे 350 लोक तरी मृत्युमुखी पडले. या साथीनंतर चिनी लोकांचा तिथले डॉक्टर्स व वैद्यकीय प्रणाली यावरचा विश्वास उडलाच आहे. आपल्याला एड्सची सर्व लक्षणे आहेत असे असताना, डॉक्टर्स आपल्याला काही झालेले नाही असे सांगून आपल्याला मुद्दाम फसवत आहेत असेच या लोकांना वाटते व त्यामुळेच ते डॉक्टरांवर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत.

कारण काहीही असले तरी या विचित्र रोगाने पछाडलेले लोक एड्स झाला नसताही त्याच पद्धतीने आयुष्यातून उठत आहेत. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला संसर्ग होईल म्हणून बहुतेकांनी एकांतवास किंवा अज्ञातवास पत्करला आहे. आपण हळूहळू मृत्यूकडे वाटचाल करत आहोत असेच त्यांना वाटते आहे. चीनमधल्या अनेकांचा तिथल्या वैद्यकीय प्रणालीवर विश्वास राहिलेला नाही हे कटू सत्य मात्र या विचित्र रोगामुळे जगासमोर आले आहे हे मात्र खरे.
28 फेब्रुवारी 2010

सोमवार, फेब्रुवारी २२, २०१०

भाड्याचा बॉय फ्रेन्ड

सिनेमे किंवा नाटकांच्यात एक चावून चोथा झालेला प्लॉट नेहमी वापरला जातो. या कथानकात असलेला एखादा म्हातारा किंवा म्हातारी यांची आपल्या नातवंडाचे दोनाचे चार हात झालेले बघण्याची इच्छा असते. हा म्हातारा मरायला तरी टेकलेला असतो किंवा त्याची मोठी प्रॉपर्टी त्याच्या नातवंडाचे लग्न झाल्यावरच त्याला मिळणार असते. या नातवंडाची बंधनात अडकण्याची अजिबात तयारी नसल्याने तो आपल्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा पैसे देऊनही कोणालातरी आपला भावी सहचर म्हणून पुढे करतो वगैरे वगैरे ........
आता चिनी म्हातारे काय? आणि भारतीय म्हातारे काय? सगळे शेवटी एशिया खंडातलेच. चिनी म्हातार्‍यांचीच नाही तर चिनी आई वडीलांची सुद्धा या सिनेमाच्या प्लॉटप्रमाणे आपल्या बाळ्या किंवा बाळीने कोणीतरी सहचर लवकर शोधून काढावा अशी इच्छा असतेच. बहुतेक हा बाळ्या किंवा बाळी दुसर्‍या कोणत्या तरी शहरात नोकरी करत असतात. त्यामुळे त्यांना पत्रे, -मेल किंवा फोन यावरून आई-वडील, आज्या यांची सदैव कटकट चालू असते.
चीनमधले जे पारंपारिक पंचांग किंवा कॅलेंडर आहे ते आपल्या हिंदु किंवा मुस्लिम कॅलेंडरसारखेच चांद्रवर्षीय आहे. या कॅलेंडरप्रमाणे नववर्षदिन हा जानेवारी फेब्रुवारी महिन्यात येतो. सर्व जगभरचे चिनी वंशाचे लोक हा नववर्षदिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा सण चिनी लोकांचा सबंध वर्षातला सर्वात मोठा सण असतो. या दिवशी सर्व चिनी घरात पारंपारिक चिनी पदार्थ बनवले जातात. या नववर्षदिनाच्या आधीच्या संध्याकाळी सर्व चिनी घरात एक फॅमिली री-युनियन डिनर असते. या जेवणाला त्या कुटुंबातले सर्व जण, ते कितीही लांब रहात असले तरी, धडपडत जातातच जातात. 130 कोटी संख्येच्या चिनी लोकांचा हा वार्षिक प्रवास, पृथ्वीतलावरचे सर्वात मोठे मानवी स्थलांतर मानले जाते. घरातला मुलगा व मुलगी जरी दुसर्‍या शहरात नोकरी करण्यासाठी रहात असले तरी ते या डिनरसाठी आई-वडीलांच्या घरी जातातच
सध्याच्या काळात ही अशी लांब रहाणारी मुले व मुली, आपली करियर घडवण्याच्या मागे लागलेली असतात. आयुष्यात स्थिरावल्यावरच लग्नाचा विचार करावा अशी त्यांची साहजिकच मनोधारणा असते. या मुलांना हे फॅमिली रि-युनियन डिनर म्हणजे एक मानसिक छळवाद आता वाटू लागला आहे. या मुलांनी रि-युनियन डिनरला निदान आपल्या बॉय फ्रेंड किंवा गर्ल फ्रेंडला तरी घेऊन यावे अशी सर्व आई-वडीलांची इच्छा असते आणि असे झाले नाही तर ते कुटुंब गावातल्या इतर लोकांच्या टीकेचा विषय बनत असल्याने हे आई-वडील मुलांच्या मागे सतत भुणभुण लावतात.
चीनमधल्या एक कुटुंब-एक मूल या धोरणामुळे आता बहुतेक कुटुंबातील पुढच्या पिढीत एकच तरूण मूल असते. त्याने लवकर लग्न करून आजी आजोबांना नातवंड दाखवावे अशी त्यांची जबर इच्छा असते. या अपेक्षेचा प्रचंड ताण आता या आयुष्यात स्थिरावू पाहणार्‍या तरूण तरूणींवर येऊ लागला आहे.
यावर मार्ग म्हणून काही लोकांनी असे बॉय किंवा गर्ल फ्रेंड भाड्याने मिळवून देण्याची सोय केली आहे. बिजिंगच्या एका मुलीने काही दिवसापूर्वी इंटरनेटच्या माध्यमातून एक जाहिरात दिली होती. या जाहिरातीत या मुलीने स्पष्टच म्हटले आहे की आपले वय आता 28 झाले आहे पण मला अजूनही कोणी बॉय फ्रेंड न मिळाल्याने मी जर नववर्षदिनाला एकटीच घरी गेले तर ते माझ्या आई-वडीलांना अतिशय अपमानास्पद वाटणार आहे त्यामुळे मला एक भाड्याचा बॉय फेंड हवा आहे
या बॉय फ्रेंडबद्दलच्या या मुलीच्या अपेक्षा आहेत. मुलगा सुशिक्षित, चांगल्या वर्तणुकीचा असावा उंची 5 फूट 7 इंच ते 5 फूट 11 इंच, तो चष्मा लावणारा असावा आणि बारकुडा नको. ही मुलगी अशा मुलाला 10 दिवस तिच्या आई-वडीलांच्या घरी रहाण्यासाठी तब्बल 735 अमेरिकन डॉलर्स देण्यास तयार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही शारिरिक संबंधाची गरज आणि अपेक्षा नाही.
मिस्टर यिंग या 24 वर्षाच्या तरूणाने आपण बॉय फ्रेंड म्हणून जाण्यास तयार असल्याची जाहिरात दिली होती. तो म्हणतो की माझी आई-वडील मी त्यांना न भेटल्याने दु:खी होतील हे खरे पण मला असे काम केल्याने चांगले पैसे मिळतील तेंव्हा मी असे काम करायचे ठरवले आहे. असा भाड्याचा मित्र जरी मिळाला तरी पुढचे दहा दिवस सुरळीत पार पडतील याची खात्री नसते. खरे म्हणजे या भाड्याच्या मित्राचा व त्या मुलाचा तसा काहीच संबंध नसल्याने बोलण्यात गोंधळ होऊ शकतो. आई-वडील साहजिकच या बॉय किंवा गर्ल फ्रेंडची जास्त माहिती काढण्यास उत्सुक असतात आणि इथेच खरी गडबड होते. त्यामुळे त्या घरचा मुलगा किंवा मुलगी यांना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. झाओ शुडॉंग हे बिजिंगमधल्या चायना ऍग्रिकल्चर विद्यापीठाच्या सोशिऑलॉजी विभागाचे डीन आहेत.ते या नवीन प्रकाराबद्दल म्हणतात की चीनमधे अजूनही लोकांच्या आयुष्यात पारंपारिक प्रथा महत्वाच्या आहेत. पण आजचा चिनी तरूण वर्ग अतिशय हुशार असल्याने या पारंपारिक प्रथांना सामोरे जाण्यासाठी तो भांडवलशाही समाजातल्या कल्पनांचा वापर करतो आहे इतकेच. ग्वॉन्गडॉन्ग प्रांतातला 23 वर्षाचा झाओ यॉन्ग गेली दोन वर्षे नववर्षदिनाच्या वेळी आपल्या घरीच गेला नाही. आपल्या जवळ भाड्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने आपण गेलो नाही असे तो म्हणतो. परंतु तो दोन वेळा भाड्याचा बॉय फ्रेंड म्हणून दोन मुलींच्या बरोबर गेला होता. त्याचा सल्ला आहे की फी च्या बाबतीत आग्रह धरू नका आणि मोकळ्या मनाने जा. शेवटी ग्राहक हाच राजा असतो नाही कां? 22 फेब्रुवारी 2010

बुधवार, फेब्रुवारी १७, २०१०

परत एकदा भेसळयुक्त दूध्


2008 या वर्षात चीनमधल्या भेसळयुक्त दुधाचे प्रकरण खूपच गाजले होते. मेलॅमिन या सेंद्रीय पदार्थाची भेसळ केलेले दूध किंवा दुधाच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे त्या वर्षी 6 मुले मृत्युमुखी पडली होती व तीन लाखाहून जास्त बालके मूत्रपिंडात खडे निर्माण झाल्याने गंभीरपणे आजारी पडली होती. या भेसळयुक्त दूधापासून बनवलेले पदार्थ चिनी कंपन्यांनी निर्यातही केले होते. चिनी कंपन्यांनी बनवलेली काही उत्पादने, Dutch Lady strawberry-flavoured milk , Yili Choice Dairy Fruit Bar ,Rabbit Creamy Candy ही त्या वेळी दक्षिण मध्य एशियामधे बरीच लोकप्रिय होती.या सर्व उत्पादनांच्या चीनहून केल्या जाणार्‍या आयातीवर संपूर्णपणे बंदी त्यावेळी घालण्यात आली होती. हॉन्गकॉन्गमधेही एक मुलगी या दुधामुळे दगावली होती व अनेक मुले मूतखड्याच्या विकाराने आजारी पडली होती. त्या वेळी या प्रकरणाला इतके गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते की चीनचे पंतप्रधान वेन जिआबाओ यांना हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवावे लागले होते


या गोंधळापासून धडा घेऊन चिनी दूध प्रक्रिया संस्था दुधाची गुणवत्ता चांगली रहावी यासाठी प्रयत्न करतील अशी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पासून ते ग्राहकांपर्यंत अशा सर्वांचीच अपेक्षा होती. परंतु चीनमधल्या 1500 च्या वर संख्येने असलेले दूध उत्पादकांपैकी काहींनी हे भेसळयुक्त दूध परत बाजारात आणले आहे अशी धक्कादायक बातमी चिनी माध्यमांनी दिली आहे. आरोग्य मंत्री चेन झाऊ यांच्या अख्यतारीत असलेल्या The National Food Safety Rectification Office या संस्थेने हे असे भेसळयुक्त दूध शोधून नष्ट करण्यासाठी 10 दिवसाची आपत्कालीन मोहीम सुरू केली आहे. या बाबतीत चेन झाऊ म्हणतात की 2008 मधे दूध उत्पादकांनी आपले उत्पादन परत घेण्याची घोषणा केली होती. परंतु हे दूध त्यांनी नष्ट केले आहे अशी घोषणा त्यांनी कधीच केलेली नव्हती. त्यामुळे असा संशय निर्माण झाला आहे की या उत्पादकांनी हे भेसळयुक्त दूध परत बाजारात आणले असावे
 

दूध उत्पादक म्हणतात की त्यांना दूध पुरवणारे शेतकरीच दुधात असलेले प्रोटीनचे घटक जास्त दिसावे म्हणून मेलॅमिन पावडर दुधात मिसळतात तर दुग्धजन्य पदार्थ उत्पादक त्यांना पुरवले जाणारे दूधच भेसळयुक्त असल्याची तक्रार करतात. परंतु ही मंडळी फक्त आपली जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत असे लोकांना वाटते. आपल्या उत्पादनात वापरल्या जाणार्‍या दुधाची गुणवत्ता तपासणे हे त्या उत्पादकाचे काम आहे व ते न करता त्यांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला आहे असेच ग्राहकांना वाटते. आरोग्य अधिकारी आता दूध उत्पादकांची गोडाऊन्स, सुपर मार्केट वगैरे ठिकाणी जाऊन भेसळयुक्त दूध परत बाजारात आले आहे का याची तपासणी करणार आहेत.

एवढ्या मोठ्या देशात इतक्या प्रचंड प्रमाणात असलेले दूध उत्पादक व त्यांची उत्पादने याची गुणवत्ता तपासणे सरकारी अधिकार्‍यांना शक्य होईल का? असा प्रश्न बर्‍याच जणाना पडला आहे व ते स्वाभाविकच आहे. ज्यांची मुले लहान आहेत असे चिनी नागरिक मात्र खरोखरच काळजीतच आहेत. कारण त्यांना दूध व दुग्धजन्य पदार्थ तर खरेदी केलेच पाहिजेत. पण खरेदी केलेले दूध चांगले असेल किंवा नाही हे मात्र संशयास्पदच आहे.
17 फेब्रुवारी 2010

रविवार, फेब्रुवारी १४, २०१०

बिजिंगच्या मुंग्या

बिजिंग महानगराच्या उत्तर परिमितीवर, टॅन्जिआलिंग(Tangjialing) या नावाचे एक खेडेगाव आहे.आज या खेडेगावाचे स्वरूप मुंबईमधल्या धारावी सारखी एक झोपडपट्टी असेच झालेले आहे. मूळ 3000लोकांच्या या वस्तीत आता दाटी वाटीने 50000 लोक रहात आहेत. या पैकी बहुसंख्य तरूण सुशिक्षित आहेत. बरेचसे लोक इंजिनीअरिंगचे पदवीधर सुद्धा आहेत. हे सर्व लोक मोडक्या तोडक्या इमारतींमधे छोट्या छोट्या खोल्यांच्यात रहातात.
 आजुबाजूच्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात घाण व केरकचरा पडलेला असतो. असे असूनही या खोल्यांची भाडी काही कमी नाहीत. बिजिंगच्या थंडीला तोंड देण्यासाठी, घर गरम करण्याच्या काहीच सुविधा या खोल्यात नसतात. त्यामुळे या थंडीला तोंड देतच या मुलांना आयुष्य कंठावे लागते. टॅन्जिआलिंग पासून डाऊनटाऊन बिजिंगला जाण्यासाठी फक्त सहा बस मार्ग आहेत. त्यामुळे बस प्रवास अत्यंत कंटाळवाणा व क्लेशदायक आहे. असे सगळे जरी असले तरी दहा बाय दहाच्या टॅन्जिआलिंग मधल्या खोलीला 550 युआन एवढे तरी भाडे द्यावेच लागते. या ठिकाणी रहाणार्‍या मुलांचे सरासरी मासिक उत्पन्न 2000 युआनच्या आसपास असते. म्हणजेच पगाराचा एक पंचमाश भाग तरी या भाड्यापोटी जातो
 
या मुलांना चीनमधे मुंग्याची टोळी या नावाने आता ओळखले जाऊ लागले आहे. ही मुले हुशार, कष्टाळू व दुर्लक्षिलेली असल्याने इतर मुलांबरोबर ग्रूप्स करून रहाणाशिवाय त्यांना गत्यंतरच नसते. बिजिंगच्या या मुंग्या बहुतांशी चीनमधील खेडेगावातून आलेल्या असतात. 22 ते 29 या वयोगटीतली ही मुले बहुतांशी कुठल्यातरी फारशा माहित नसलेल्या व चीनच्या आडाकोपर्‍यात असलेल्या विद्यापीठांचे पदवीधर असतात व सध्या हॉटेलमधले वेटर, इन्शुरन्स विक्रेते किंवा संगणक मेकॅनिक या सारखी कामे करत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर 'डेंग कुन' हा एक बायोमेडिकल इंजिनीयरिग शाखेचा पदवीधर आहे. तो कॉलेजात असताना त्याची इच्छा आधुनिक हॉस्पिटल सामुग्रीचे डिझाईन करण्याची होती.परंतु त्याला नोकरीच मिळालेली नाही. तो या झोपडपट्टीत मित्राबरोबर राहून व्हिडियो गेम्स खेळण्यात वेळ घालवतो आहे. तो म्हणतो की बिजिंगमधे नोकरी मिळवणे अतिशय अवघड गोष्ट आहे.  
टॅन्जिआलिंग मधे रहाणार्‍या या मुलांकडे इतर भागातील लोक खालच्या नजरेने बघतात. त्यामुळे या ठिकाणाहून बाहेर पडण्याची सर्वांची धडपड चालू असते.
1999 साली चीनमधे शिक्षणाचे फार मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण झाले. नवीन नवीन कॉलेजे सुरू झाली. यामुळे 2003 मधे पहिल्यांदा उच्चांकी संख्येने पदवीधर बाहेर पडले. गेल्या वर्षी 60 लाख पदवीधर बाहेर पडले त्यापैकी 20 लाख अजूनही बेकारच आहेत. 2000 साली फक्त 10 लाख पदवीधर बाहेर पडले होते. एवढ्या लोकांना त्यांच्या शिक्षणास साजेशी नोकरी देणे चीनमधल्या अर्थव्यवस्थेला, अत्यंत वेगाने वाढ होत असूनही शक्य नाही. या मुलांच्या पैकी अनेक मुले आवड नसताना दुसरा मार्ग नाही म्हणून सैन्यात नोकरी करू लागली आहेत.
बिजिंगच्या या मुंग्या आता शांघाय, ग्वांगझू, वुहान, शियान(Shanghai, Guangzhou, Wuhan and Xi'an.) सारख्या इतर शहरातही पसरू लागल्या आहेत. 'लियान सि' या post-doctoral fellow at the Center for Chinese and Global Affairs of Peking University संशोधकाने नुकतेच 'मुंग्यांच्या टोळ्या' (Ant Tribe)या नावाचे व या मुलांच्या बद्दलचे एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्याच्या मते चीनमधे आता 30 लाखाहून आधिक मुले तरी या स्वरूपाचे जीवन निरनिराळ्या शहरांच्या मधे जगत असावीत. मुंग्यांप्रमाणेच ही मुले हुशार व कष्टाळू आहेत. आपल्या शिक्षणाला साजेसे काम त्यांना मिळत नसल्याने ती मुले जास्त जास्त फ्रस्ट्रेट होत आहेत. 'लियान सि' म्हणतो की पुढच्या काही वर्षात या मुलांचा प्रश्न हा चीन मधला सर्वात महत्वाचा प्रश्न बनणार आहे. एका चिनी म्हणीप्रमाणे दहा हजार मैलाचे धरण सुद्धा मुंग्यांच्या झुंडीने नष्ट होऊ शकते. म्हणूनच या मानवी मुंग्या चीनमधला एक ज्वलंत प्रश्न बनत चालला आहे.
14 फेब्रुवारी 2010



मंगळवार, फेब्रुवारी ०९, २०१०

शांघायचे पायजमा सूट्स

दुपारचा एक किंवा दोन वाजले आहेत. तुम्ही एका चिक्कार रहदारी असलेल्या रस्त्यावर आहात. रस्त्याने अनेक लोक जा- ये करताना दिसत आहेत. अशा वेळी तुम्हाला मोठ्या वयाचे पुरुष, भडक व चिवट्या बावट्याचे डिझाईन असलेला पायजमा व टॉप अशा रात्रीच्या कपड्यात इकडे तिकडे फिरताना दिसले तर तुम्ही काय समजाल? हे लोक कोणत्या तरी फॅन्सी ड्रेस स्पर्धेला चालले आहेत म्हणून! का एखाद्या पायजमा पार्टीला चालले आहेत म्हणून? पण या वेळी तुम्ही जर शांघाय या शहरात असलात तर हा अंदाज पूर्ण चूकीचा ठरेल हे समजा. असे पायजमा सूट घालणे ही शांघाय मधली एकदम इन फ़ॅशन आहे. पायजमा सूट जेवढ्या भडक रंगाचा आणि त्यावरचे डिझाईन जेवढे बटबटीत तेवढा तुमचा ड्रेस एकदम फॅशनेबल असे समजले जाते
 
शांघायमधे हे पायजमा सूट एवढे लोकप्रिय कधीपासून झाले असा प्रश्न तुमच्या आमच्या मनात साहजिकच येईल. असे मानले जाते की शांघायमधे 1930 च्या सुमारास कोणाकडेही फॅशनेबल झोपण्याचा वेष असणे हे मोठे प्रतिष्ठेचे व मानाचे लक्षण मानले जात असे. त्यामुळे ज्यांच्याकडे असे वेष असत ते आपले हे वेष सर्वांच्या नजरेला पडावे म्हणून त्या वेषातच दिवसभर रहात. तेंव्हापासून ही प्रथा शांघायमधे सुरू झाली. आता स्थानिकांच्याबरोबर अगदी परदेशी पाहुणेही याच वेषभूषेत सर्रास दिसतात. शांघायमधे चक्रम व छांदिष्ट असे लोक खूप आहेत असे म्हणतात. दिवसा पायजमा सूट घालणारे त्यांच्यापैकीच आहेत असे अनेकांना वाटत असले तरी हे लोक शांघायचे एक वैशिष्ट्य आहेत हे मात्र खास
अजून तीन महिन्यांनी शांघायमधे 'World Expo' हे एक जागतिक दर्जाचे प्रदर्शन सुरू होणार आहे. त्याच्या निमित्ताने शहरात अनेक देशांचे व प्रतिष्ठित पाहुणे येतील अशी अपेक्षा आहे. या पाहुण्यांच्या समोर शांघायच्या नागरिकांनी हे गबाळे व अशिष्ट कपडे परिधान करू नये असे शांघायच्या स्थानिक सरकारी अधिकार्‍यांना वाटते. लोकांनी ही गचाळ सवय सोडून द्यावी म्हणून मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यापासूनच एक अभियान या अधिकार्‍यांनी चालू केले आहे. अनेक विभागात मोहल्ला समित्या स्थापन करून त्यांच्यामार्फत लोक जागृती करण्यात येत आहे. या अधिकार्‍यांनी भ्रष्टाचार करणे सारख्या अनिष्ट प्रथांच्या रांगेतच हे पायजमा सूट परिधान करणे ही प्रथा घालून टाकली आहे.
झांग जिहाय (Zhang Jiehai) या समाजशास्त्रज्ञाला या प्रथेचे कारण शांघायमधली अत्यंत छोटी व दाटीदाटीची घरे हे वाटते. ही घरे आपल्याकडच्या झोपडपट्टीसारखीच असल्याने खाजगी आयुष्य़ व सार्वजनिक आयुष्य यातली सीमारेषा फार पुसट असते. त्यामुळे या पायजमा सूट्सना एक सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्यामुळेच उन्हाळ्याच्या गरमीत, कोणालाही भेटण्यास जाणे, गल्लीबोळांच्यातून फिरणे, सुपरमार्केट्समधे खरेदी करणे या सगळ्यासाठी पायजमा सूट हा वेष सर्वात उत्तम असल्याचे सर्वमान्य आहे.
शांघायच्या दाट लोकवस्तीच्या भागात अजूनही पायजमा सूट्स घालणारे निष्ठावान लोक आहेत. त्यांच्यावर सरकारी प्रचाराचा काही फारसा प्रभाव पडला आहे असे वाटत नाही. काहीही असले तरी या लोकांना भ्रष्टाचारी लोकांच्या रांगेत बसवण्याची कल्पना काही फारशी योग्य आहे असे वाटत नाही.
9 फेब्रुवारी 2010

मंगळवार, फेब्रुवारी ०२, २०१०

सुबत्तेचे बळी


हॉन्गकॉन्गच्या उत्तरेला लागूनच, अगदी सीमेलगतच, शेनझेन हे चीनच्या ग्वॉन्गडॉन्ग प्रांतामधले शहर आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून हे शहर, चीनच्या आर्थिक उदारीकरणाच्या मोहिमेत प्रथम घोषित केले गेले होते. या आधी शेनझेन एक मासेमारीवर जगणार्‍या कोळ्यांचे गाव होते. आर्थिक उदारीकरणामुळे, या गावात परदेशी गुंतवणूकींचा प्रचंड ओघ सुरू झाला व त्याचे रूप पालटूनच गेले. या शहरात आतापर्यंत 30 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी गुंतवणूक परदेशी कंपन्यांनी केली आहे. त्यामुळे आज हे शहर जगातील सर्वात जलद गतीने वाढणारे शहर बनले आहे. चीनमधले शांघाय नंतरचे सर्वात मोठे बंदर शेनझेन मधेच आहे. अनेक परदेशी कंपन्यांची मुख्यालये शेनझेन मधेच आहेत व शेनझेनचे स्वत:चे स्टॉक एक्स्चेंजही आहे. या शहराची लोकसंख्या 90 लाख आहे आणि येथले दर डोई सरासरी उत्पन्न चीनमधे सर्वात अधिक म्हणजे 13000 अमेरिकन डॉलर्स एवढे आहे.

या कारणांमुळे शेनझेनमधे सधन किंवा श्रीमंत असलेली कुटुंबे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत यात काहीच नवल नाही. शेनझेनच्या दक्षिणेलाच असलेल्या हॉन्गकॉन्गमधल्या शाळा जुन्या व प्रसिद्ध असल्यामुळे अनेक सधन कुटुंबे आपल्या मुलांना हॉन्गकॉन्गच्या शाळांच्यात पाठवतात. रोज शेनझेन ते हॉन्गकॉन्ग व परत असा प्रवास करणारी मुले 6000 च्या वर तरी असावीत. यातली कित्येक मुले हा प्रवास एकट्यानेच करतात.

या सगळ्या परिस्थितीचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी करून घेतला नसता तरच नवल असते. मुलांच्या अपहरणाचे व खंडणी मागण्याचे प्रकार शेनझेनमधे खूपच वाढू लागले आहेत. नोव्हेंबरमधे 'चेन हाओ' या 11 वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले व त्याच्या पालकांकडे 1 मिलियन युआन ची खंडणी मागण्यात केली त्याच्या पालकांनी यातली थोडीफार रक्कम आधी देऊ केली. त्याचा काही उपयोग न होता चेन ची हत्या करण्यात आली. त्याच्या आधी 'यी यिचेन' याही 11 वर्षाच्या मुलाचे असेच अपहरण करण्यात येऊन त्याचीही हत्या करण्यात आली होती.

जून ते डिसेंबर या सहा महिन्यात 20 तरी मुलांचे अपहरण केले गेले असे वृत्त वाहिन्यांनी दिले आहे तर हॉन्गकॉन्गमधले एक सुरक्षा तज्ञ मिस्टर स्टीव्ह व्हिकर्स यांच्या मते हा आकडा 28 तरी असावा. शेनझेन पोलिस मात्र फक्त 4 अपहरणाचे गुन्हे घडल्याचे मान्य करतात. अनेक चिनी पालक पोलिसांपर्यंत न जाता अपहरणकर्त्यांची मागणी पूर्ण करतात. शेनझेन पोलिसांच्या मते अपहरणाचे गुन्हे फार क्लेशदायक असतात व पोलिस एका मर्यादेपर्यंतच मदत करू शकतात. पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणे फारच जरूरीचे असते.
शेनझेनच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाने आता अपहरणाचे गुन्हे घडू नयेत म्हणून 90 दिवसाची एक मोहिम चालू केली आहे. परंतु ज्यांना या गुन्ह्यांची झळ लागली आहे त्यांचे अश्रू कोण पुसणार? हे पोलिस सांगू शकत नाहीत.
2 फेब्रुवारी 2010