शुक्रवार, मार्च १८, २०११

शाळेचा पटांगणाचा असाही उपयोग


मे महिन्याची किंवा दिवाळीची सुट्टी लागली की शाळा कॉलेजे ओस पडतात. मोठ्या मोठ्या इमारती, त्या भोवतीचे पटांगण हे सगळे रिकामे रिकामे भासते. त्यामुळे आपल्याकडे बरेच शालाचालक, लग्न, मुंजी किंवा किमान पक्षी बारशी, डोहाळजेवणे किंवा वाढदिवस यांसारख्या कार्यक्रमाना शाळेच्या इमारती भाड्याने देऊन या रिकाम्या इमारतींचा उपयोग करताना व शालेच्या उत्पन्नात भर घालताना दिसतात.
चीनच्या वायव्य भागात असलेल्या झेंजिआंग (Zhejiang ) प्रांतातल्या समुद्र किनार्‍याजवळ असलेल्या टाईझाऊ (Taizhou ) या भागात वेनलिंग (Wenling) हे एक मध्यम आकाराचे शहर आहे. या वेनलिंग शहराच्या शिनहेझेन(Xinhezhen) विभागात असलेल्या शिनहे माध्यमिक शाळेच्या (Xinhe Middle School) चालकांनी शाळेच्या पटांगणाचा गेल्या 3 मार्चला एक नवीनच उपयोग करून एक पायंडाच पाडला आहे.
या शहरात राहणार्‍या एका अत्यंत श्रीमंत व्यापार्‍याची, 82 वर्ष वय असलेली आई, चेन लाओताय (Chen Laotai,) ही त्या दिवशी परलोकवासी झाली. तिचा अंत्यसंस्कार व अंत्ययात्रा काढण्यासाठी ही शाळा चालकांनी भाड्याने दिली होती. त्या दिवशी शाळेला सुट्टी वगैरे काही नव्हती. त्यामुळे शाळेचे सर्व वर्ग बंद ठेवण्यात आले व ही शाळा या कामासाठी वापरली गेली


आपल्या आईवरचे अंत्यसंस्कार व तिची अंत्ययात्रा आपल्या इतमामाला साजेशी व्हावी अशी या व्यापार्‍याची इच्छा होती. या शाळेचे पटांगण यामुळे मोठ्या आलीशान रित्या सजवले गेले होते. पटांगणाच्या मध्यभागी एक मोठा गालिचा अंथरण्यात आला होता. याच्या दोन्ही बाजूंना दोन मोठे प्रोजेक्शन टीव्ही बसवलेले होते. त्यावरून या म्हातारीची चित्रे सतत दाखवण्यात येत होती. शतकाहून जास्त भिख्खू अंत्यसंस्काराची धर्मकृत्ये करत होते. वेनलिंग मधे पुरेसे भिख्खू उपलब्ध नसल्याने वेनझाओ(Wenzhou) व निंगबो (Ningbo) येथून जादा भिख्खू आणण्यात आले होते. या बाईंच्या मृत्यूबद्दल दुख: व्यक्त करण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. यातल्या बहुतांशी लोकांना अर्थातच या बाई कोण आहेत हे माहितच नव्हते. या बाईंच्या पार्थिव शरीराजवळ सुगंधी द्रव्य जाळले तर 200 ते 1700 युआन व 12 सिगरेट्सचे पाकिट हे देण्यात येत असल्याने ही सर्व मंडळी जमली होती.
बरीच वर्षे विधवा असलेल्या या बाईंना 5 मुलगे व 1 मुलगी आहे. बाईंनी मुलांना चांगलेच वाढवले असावे कारण सर्व जण सुस्थितीत आहेत. प्रॉपर्टी, हॉटेल्स, खाणी यासारखे उद्योग ही मुले चालवतात. या अंत्यसंस्कारासाठी प्रत्येक मुलाने 10 लाख युआन खर्च केले आहेत

बाईंच्या अंत्ययात्रेसाठी 9 लिंकन लिमूझिन्स, 100 वादक असलेले बॅण्ड पथक व 8 व्हिडियो कॅमेरे तयार ठेवण्यात आलेले होते. वर्गाला सुट्टी असल्याने व पटांगणावर जाण्यासाठी अनुमती नसल्याने, अनेक शाळकरी विद्यार्थी अंत्ययात्रा बघायला गेले होते व एकूण गर्दी आणखीनच वाढली होती.रस्त्यावरच्या फेरीवाल्यांना त्यांनी धंदा बंद ठेवावा म्हणून 500 युआन आधीच देण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुक  कोठे  अडत नव्हती.

या अंत्ययात्रेवर इंटरनेटवरून बरीच टीका झाल्याने स्थानिक प्रशासन एकदम जागृत झाले व त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आता प्रशासनाला असा शोध लागला आहे की या अंत्ययात्रेमुळे कोणत्यातरी नियमाचे उलंघन झाले आहे त्यामुळे आणखी चौकशी करण्यासाठी एका उपप्राचार्याला निलंबित करण्यात आले आहे.
18 मार्च 2011