मंगळवार, जुलै २७, २०१०

चेअरमन माओ आणि शालेय गणित

माध्यमिक शाळेत असताना, आपण सर्वांनी गणिताच्या पुस्तकांचा, ती कितीही अप्रिय वाटली असली तरी सामना केलेलाच असतो. आता चीनमधले विद्यार्थी वापरत असलेल्या अशा पुस्तकांचा, चीनचे माजी चेअरमन माओ यांच्याशी बादरायणी संबंध तरी कसे लावणे शक्य आहे? असा प्रश्न वाचकांच्या मनात येणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु माध्यमिक शालेय गणित आणि चेअरमन माओ यांचा संबंध आहे, अगदी घनिष्ठ संबंध आहे हे माओच्या कालातल्या गणितांच्या पुस्तकांवर एक नजर टाकली तरी समजते. आता त्या कालात चीनमधे घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा माओशी संबंध जोडला जात असेच! मग गणिताची पुस्तके तरी त्याला कशी अपवाद असतील

या पुस्तकांच्या अगदी मुखपृष्ठापासूनच ही सुरवात होते. मुखपृष्ठावरच चेअरमन माओंची छबी झळकते आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तेत्रदीपक प्रगती करणारी चिनी मुलेही येथे दिसतात. मुखपृष्ठ उलटले की पहिल्या पानावर चेअरमन माओ यांचा भाषण करतानाचा पान भर फोटो या मुलांना बघता येतो. येथेच त्यांच्या महतीचे वर्णनही मुलांना वाचता येते
 
आता प्रत्यक्ष अभ्यासाला लागूया. चक्रवाढ व्याजाच्या प्रकरणात असलेले हे एक उदाहरण बघा.
चेअरमन माओंची शिकवण आहे की वर्ग विद्रोह कधी विसरू नका. आता आपण अत्यंत जुलमी व दुष्ट असा एक जमीनदार स्किनर याने झांग अंकल या एका अत्यंत गरीब शेतकर्‍याला व्याजावर व्याज लावून त्याची कशी पिळवणूक केली ते बघूया. (चित्र. क्र. 1)
अंकल झांग या गरीब शेतकर्‍याने या जुलमी व दुष्ट जमीनदाराकडून फक्त 3 युआनचे कर्ज घेतले होते. फक्त 10 महिन्यांनंतर, व्याजावर व्याज लावल्यामुळे, ते कर्ज 3*(1+30%)10 इतके झाले. आता या फॉर्म्युला प्रमाणे हा कर्जाचा आकडा किती येतो ते आपण पाहू. "
यानंतर या पुस्तकातील पुढचा मजकूर लॉग टेबल वापरून हे उदाहरण कसे सोडवायचे हे सांगतो. अखेरीस "अशा पद्धतीने अंकल झांगचे कर्ज 41.31 युआन झाले." असे हे पुस्तक सांगते. आता या पुढची मल्लीनाथी बघा
 
" अशा रितीने 10 महिन्यात अंकल झांगकडून 41.31-3= 38.31 युआन लुबाडले गेले. दुष्ट आणि जुलुमी राजवट असलेल्या जुन्या चीनमधे, जमीनदार वर्ग त्यांच्या शेतावर काम करत असलेल्या शेत कामगारांना कसण्यासाठी जमीन भाड्याने देऊनच त्यांची पिळवणूक करत असत असे नाही तर ते या गरिबांचे रक्त व घाम यांचेही शोषण करत असत व या गरीबांच्या सांगाड्यांवर आपला गुन्हेगारी स्वर्ग रचत असत. अंकल झांग सारखे 10 कोटी गरीब शेतकरी आपल्या देशात होते. चेअरमन माओ यांनी गरीब शेतकर्‍यांची पाठ मोडणारे तीन जुलुमी डोंगर उध्वस्त करून फेकून दिल्यामुळेच आज गरीबांची सत्ता चीनमधे आली आहे. लिउ शाओची या नीच व पाठीत खंजीर खुपसू पाहणार्‍या नराधमाने " वर्ग विद्रोह थांबवणे" किंवा "जास्त पिळवणूक म्हणजे जास्त सहकार्य " या सारख्या आपल्या कल्पनांचा प्रचार करून जुलमी जमीनदारांचीच स्तुती स्तोत्रे गायला सुरवात केली व गरीबांची सत्ता उलथवून चीन मधे परत भांडवलशाही आणून कोट्यावधी लोकांना परत एकदा दुख:द भूतकालात नेण्याचा प्रयत्न केला"

या गणिताच्या पुस्तकामधले कोणतेही प्रकरण बहुदा चेअरमन माओ यांच्या कोणत्यातरी विधानाने सुरू होते. काही वचने चांगलीही असतात. उदाहरणार्थ "उत्तम अभ्यास हा तुमची दररोज प्रगती करेल". किंवा " छान छान अभ्यास, दिवस दिवस वर" या सारखी अतिशय विनोदीही असतात या वचनानंतर इतर मजकूर येतो. चीनमधल्या पुष्कळ लोकांना आता ही पुस्तके म्हणजे वेडपटपणा वाटतो. पण त्याने एवढेच सिद्ध होते की चीन आता किती बदलला आहे.
परंतु जरा जास्त खोलात जाऊन विचार केला तर या परिस्थितीतील विरोधाभास लगेच लक्षात येईल. या पुस्तकांवरून अभ्यास केलेली पिढी आता जुनी झाली आहे व ज्याचा विनाश करा म्हणून जुन्या पिढीला सतत सांगितले गेले त्याच दुष्ट भांडवलदार जगात, नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धात्मक चढाओढ, नव्या चिनी पिढीला करावी लागते आहे. याचा एक परिणाम म्हणजे डेंग या चिनी नेत्याच्या आधीच्या कालाबद्दल एक रम्य स्वप्न ही नवी पिढी मनात रंगवते आहे. या डॆंग पूर्व कालात, सर्व जण समान पातळीवर (म्हणजे गरीब) होते असे या नव्या पिढीला वाटते. माओ यांनी शेतकर्‍यांच्या पाठीवर असलेल्या 3 डोंगरांना ( राजा, जमीनदार व नोकरशाही याचा जुलूम) उध्वस्त करून फेकून दिले होते त्या डोंगरांच्या जागी आता नवे 3 डोंगर ( घर मिळवणे, वैद्यकीय मदत, शिक्षण) हे येऊन बसले आहेत असे या नव्या पिढीला वाटते आहे. त्यामुळे माओ यांच्या राजकीय विचारसरणीचा प्रभाव परत एकदा नव्या पिढीत जाणवू लागला आहे.
या अशा वातावरणात, चीन मधले नवे अती श्रीमंत व राज्यकर्त्यांशी निकट संबंधी यांच्यावर खूप टीका होते आहे. ही मंडळी कायद्याच्या वर आणि कोणतीही मूल्य न बाळगणारे आहेत असे सामान्यांचे मत झाले आहे. हे लोक आपली संपत्ती व मुले परदेशी पाठवत आहेत असा त्यांच्यावर आरोप केला जातो. या लोकांची श्रीमंती व हावरेपणा यामुळे गरीब-श्रीमंत यातील दरी वाढत चालली आहे. माओच्या कल्पनांना परत एकदा उजाळा येण्याचे हे ही कारण आहेच.
27 जुलै 2010

मंगळवार, जुलै २०, २०१०

युनान मधल्या मृत्यूंचे गूढ


युनान हा चीनमधला प्रांत, या देशाच्या नैऋत्य कोपर्‍यात दडलेला आहे. चीनच्या इतर भागातले हवामान व युनानचे हवामान यात जमीन -अस्मानाचा फरक आहे. युनानची सीमा- मियानमार, थायलंड व लाओस या देशांना लागून आहे व एकूण हवामान विषुव वृत्तीय प्रदेशातल्या देशांसारखेच आहे. भारतासारखाच येथे उन्हाळ्यात मोसमी पाऊस पडतो. प्रत्येक पावसाळ्यात, या युनानच्या कानाकोपर्‍यात दडलेल्या छोट्या छोट्या खेडेगावांतील खेडूतांना, सगळ्यात भिती कशाची वाटत असेल तर अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची. प्रत्येक पावसाळ्यात, या छोट्या गावांच्यामधे, हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मरण पावणार्‍यांची संख्या वाढतच चालली होती. हा असा तीव्र हृदयविकाराचा झटका कोणत्याही वयाच्या खेडूतांना येत असल्याने या गूढ आजारामागचे रहस्य आणखीनच गडद झाले होते. या आजाराला वैद्यकीय वर्तुळांच्यात Yunnan Sudden Death Syndrome असे नाव दिले गेले आहे. आतापर्यंत 400 खेडूत तरी या आजाराने मृत्युमुखी पडले आहेत

या एकूणच प्रकारामागचे कारण लक्षात येत नसल्याने, पाच वर्षांपूर्वी मध्यवर्ती सरकारने China's Center for Disease Control and Prevention या संस्थेला या आजारामागचे कारण शोधण्यासाठी एक अभ्यासगट स्थापन करण्यास सांगितले. या संस्थेने China Field Epidemiology Training Program या कार्यक्रमाच्या अंतर्गत असा गट स्थापन केला. निरिक्षणे करताना या अभ्यासगटाला अनेक अडचणी आल्या. युनानच्या कानाकोपर्‍यात राहणार्‍या खेडूतांना, त्यांची स्वत:ची स्थानिक भाषाच फक्त येत असल्याने, बिजिंगच्या या मंडळींचे मॅन्डरीन, त्यांना समजत नव्हते. ही सगळी खेडेगावे दुर्गम अशा डोंगराळ भागात असल्याने पावसाळ्याच्या दिवसात तेथे जाणेही अवघड होते. एखादा गावकरी मृत्युमुखी पडला तर स्थानिक परंपरांप्रमाणे त्याला लगेच मूठमाती देण्यात येत असल्याने शव विच्छेदन करणे दुरापास्त होते. धुवांधार पाऊस व दरडी कोसळण्याच्या प्रकारांमुळे प्रवास करणेच अशक्य होत असे. या सगळ्या अडचणींवर मात करून या अभ्यासगटाने अतिशय बारकाईने निरिक्षणे करून पाच वर्षांनंतर आता आपला अहवाल तयार केला आहे.
मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींबद्दल माहिती जमा केल्यावर, या व्यक्ती मृत होण्याच्या आधी त्यांना काही कॉमन वैद्यकीय लक्षणे दिसत होती असे लक्षात आले. या सर्व व्यक्तींना, मळमळणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके जलद होणे, आकडी येणे व अतिशय थकवा वाटणे ही लक्षणे मृत्यूआधी दिसली होती. तसेच हे सर्व मृत्यू, पावसाळ्यामधल्या एका छोट्या कालखंडातच घडत होते. मृत्युमुखी पडलेले गावकरी काय करत होते? व त्यांची जीवनशैली काय होती? याचा अभ्यास केल्यावर तीन कॉमन गोष्टी आढळून आल्या. हे सर्व गावकरी एकतर साचलेले पाणी पीत होते, त्यांना आयुष्यात सतत ताणतणावांचा सामना करायला लागत होता व या सर्व गावकर्‍यांच्या आहारात, मश्रूम किंवा कुत्र्याच्या छत्र्या होत्या.
युनान हा प्रांत तिथे मिळणार्‍या जंगली मश्रूम्ससाठी जगप्रसिद्ध आहे. इथल्या मश्रूम्स चीनमधेच नाही तर बाहेरच्या देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. या निर्यात होणार्‍या मश्रूम्स अतिशय महाग असतात त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात संपूर्ण कुटुंबे मश्रूम्स शोधण्याच्या मोहिमेवर बाहेर पडलेली युनानमधे नेहमी दिसतात. या कारणामुळे या मृत गावकर्‍यांच्या आहारात मश्रूम्स होत्या यात खरे म्हणजे नवलविशेष काही नव्हते. तरी सुद्धा या गटाने एक सर्वसाधारण अशी धोक्याची सूचना जाहीर केली की लोकांनी अनोळखी जातीच्या मश्रूम्स आपल्या आहारात ठेवू नयेत. पण याचा फारसा काहीच उपयोग झाला नाही. 2008 साली म्हणजे तब्बल तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर या अभ्यासगटाच्या असे लक्षात आले की ज्या व्यक्ती मृत पावल्या आहेत त्या सगळ्यांच्या घरच्या पावसाळ्यातल्या आहारात, एक फारशी माहिती नसलेली व अतिशय निरागस दिसणारी, Little White.या नावाची मश्रूम आहे. ही विशिष्ट मश्रूम या गावकर्‍यांच्या आहारात का असते? याचा शोध घेतल्यावर या अभ्यासगटाच्या असे लक्षात आले की ही मश्रूम फार छोट्या आकाराची असल्याने आणि तोडल्यावर काही तासांतच या पांढर्‍या शुभ्र मश्रूमचा रंग तपकिरी रंगात बदलत असल्याने याची विक्री किंवा निर्यात होऊ शकत नाही व म्हणून युनानमधले गावकरी त्यांना जंगलांच्यात सापडलेल्या या प्रकारच्या मश्रूम्सचा, स्वत:च्या आहारातच समावेश करतात

या Little White.मश्रूमचे जीवशास्त्रीय नाव ट्रॉजिया (Trogia) आहे व ती मश्रूम्सच्या Marasmiaceae या प्रजातींपैकी एक आहे. ही मश्रूम, Jacob Gabriel Trog. या स्विस मश्रूमतज्ञाने शोधून काढलेली असल्याने तिला हे नाव देण्यात आलेले आहे. या मश्रूममधे तीन प्रकारची विषारी ऍमिनो ऍसिड्स असतात हे वनस्पतीशास्त्रज्ञांना ज्ञात आहे. परंतु या ऍमिनो ऍसिड्सचे प्रमाण या मश्रूममधे खूपच कमी असल्याने ती खाण्यात तसा धोका काहीच नसतो. मृत्युमुखी पडलेल्या काही व्यक्तींचे शव विच्छेदन केल्यावर या अभ्यासगटाच्या असे लक्षात आले की या व्यक्तींच्या शरीरात बेरियम या धातूचे प्रमाण सर्वसाधारण व्यक्तींच्या मानाने बरेच जास्त आढळले आहे. बेरियम धातूच्या अगदी कमी प्रमाणातल्या सेवनानेही हृदयाच्या ठोक्यांमधे अनियमता, श्वासोच्छवास करण्यास अडचण, रक्तदाब वाढणे, मेंदू, यकृत, मूत्रपिंड या अवयवांना सूज येणे व हृदयविकार या सारखी लक्षणे हा धातू सेवन केलेल्या व्यक्तींमधे दिसून येतात.
या सर्व अभ्यासानंतर हा गट या अनुमानाला आला की ही Little White मश्रूम, जमिनीमधे असलेले बेरियम धातूचे क्षार ओढून घेत असली पाहिजे व ज्या व्यक्ती या मश्रूमचा आहारात समावेश करतील त्यांना बेरियम धातूचा विषप्रयोग होत असला पाहिजे.
गावकर्‍यांनी या मश्रूमचा आपल्या आहारात समावेश करू नये म्हणून शिक्षणात्मक मोहिमा आता या भागात उघडण्यात आल्या आहेत व त्याचा उत्तम परिणाम या वर्षी दिसून येतो आहे कारण या वर्षी या विकाराला बळी पडलेल्यांच्या संख्येत एकदम घट झाली आहे.
माझ्या लहानपणी माझी आजी मला नेहमी सांगत असे की अनोळखी झाडांच्या पाने फुलांना हात सुद्धा लावू नये आणि कोणतेही फळ तोंडात तर कधीच टाकू नये. तिच्या या सांगण्यामागचे इंगित हे असे आहे तर!
19 जुलै 2010

शनिवार, जुलै १०, २०१०

यॉन्ग यूडीचे महायुद्ध


काही वर्षांपूर्वी हॉलीवूडच्या सिनेमामधले 'रॅम्बो' या नावाचे एक पात्र खूप लोकप्रिय झाले होते. या रॅम्बोचा 'फर्स्ट ब्लड' नावाचा एक चित्रपट बघितल्याचे मला आठवते. या सर्व रॅम्बो चित्रपटांच्यात एक कॉमन धागा असायचा. भली थोरली व अफलातून अशी शस्त्रे वापरून हा रॅम्बो नेहमीच शत्रूच्या मोठ्या सैनिकांना गारद करून टाकायचा. One man army असेच या चित्रपटांचे सूत्र असे. अर्थात सिनेमा बघायला जरी मजा येत असली तरी या सगळ्या कवी कल्पना आहेत प्रत्यक्षात असे काही घडत नसते हे सर्व प्रेक्षक ध्यानात ठेवूनच हे चित्रपट बघत हे नक्की.

आश्चर्य वाटेल पण चीनमधल्या मत्स्यपालन करणार्‍या एका गरीब शेतकर्‍याने हा रॅम्बो अगदी प्रत्यक्षात आणला आहे. त्याने एकट्याने आपल्या शत्रूंच्या विरूद्ध लढा तर दिलाच! पण यासाठी कल्पनाही करता येणारे नाही अशी शस्त्रे वापरली आहेत. त्याच्या या महायुद्धात त्याने कोणताही शत्रू जखमी होणार नाही याची काळजी घेत त्यांना दोन वेळा पळवून लावले. या सगळ्या प्रसंगावर एखादा चित्रपट कोणी काढला तर त्या चित्रपटाची कथा प्रत्यक्षात घडली आहे यावर कोणत्याही प्रेक्षकाचा विश्वास सुद्धा बसणार नाही


या 56 वर्षे वयाच्या शेतकर्‍याचे नाव आहे यॉन्ग यूडी व चीनमधल्या हुबेई प्रांतामधल्या वुहान शहराच्या सीमेच्या लगतच तो राहतो. चीनमधे, शेतकरी ते कसत असलेल्या, जमिनीचे मालक कधीच नसतात. सर्व जमीन सरकारी मालकीचीच असते. यॉन्गची शेती अशीच सरकारी मालकीची असली तरी 2019 पर्यंत ती जमीन कसण्यासाठी त्याला सरकारने भाड्याने दिली होती. या बाबतच्या कागदपत्रांवर सह्या वगैरे औपचारिकता पूर्ण झालेली असल्याने यॉन्ग निश्चिंत मनाने या जमिनीतून कापूस व फलोत्पादन करत होता. या जमीनीत असलेल्या एका तळ्यातून तो मस्य उत्पादनही करत होता.
या वर्षीच्या सुरवातीला वुहान या शहरात मोठमोठ्या इमारती बांधणार्‍या SuperMechaCorp Developers या बिल्डर, डेव्हलपर कंपनीच्या नजरेत वुहानची जमीन भरली. त्यांच्या नवीन प्रकल्पाला ही जागा योग्य असल्याचे त्यांचे मत झाले. सरकारी अधिकार्‍यांना पटवून त्यांनी यॉन्गला त्याचे सरकारी कॉन्ट्रॅक्ट रद्द करून घेऊन त्याची शेतजमीन कंपनीला विकण्यास सांगितले. त्यासाठी भरपाई म्हणून त्याला अंदाजे 19000 अमेरिकन डॉलर्स एवढी रक्कम किंमत म्हणून देऊ असे सांगितले. जर यॉन्गने याला मान्यता दर्शवली नाही तर भाडोत्री गुंड व बुलडोझर पाठवून त्याची शेती नष्ट केली जाईल अशी धमकीही त्याला देण्यात आली. यॉन्ग या ऑफरबद्दल चर्चा करण्यासाठी गेला व तेथील अधिकार्‍यांना त्याने या धमकीबद्दल सांगितले. यावर त्याला असे सांगण्यात आले की जर यॉन्गने मंजूरी दिली नाही तर त्याला बरीच शारिरीक दुखापत होण्याची शक्यता आहे. ती झाल्यावर त्याला ही ऑफर नक्कीच आवडेल.
यॉन्गने या नंतर कंपनीच्या फोन कॉल्सना उत्तर देण्याचेही बंद केले व कंपनीच्या धमक्यांना उत्तर देण्याच्या तयारीला तो लागला

आपल्याकडे कर्ज किंवा क्रेडिट कार्डची देणी थकवल्यावर बॅन्का व क्रेडिट कार्ड कंपन्या ज्या पद्धतीचे भाडोत्री गुंड पाठवतात तशा 30 गुंडाची एक टोळी 26 फेब्रुवारी 2010ला यॉन्गच्या शेतावर चालून आली. त्यांना जे दृष्य़ समोर दिसले त्यांनी ते आश्चर्यचकीत झाले. यॉन्ग एक शेतसामान वाहण्याची ढकलगाडी (Wheelbarrow)घेऊन त्यांच्या समोर आला. या ढकलगाडीला त्याने 25 ते 30 प्लॅस्टिकच्या नळ्या बसवल्या होत्या. या नळ्यांच्यातून, बंदुकीची दारू भरलेले मोठे फटाके जोडलेले अग्निबाण यॉन्गने या गुंडाच्यावर फेकण्यास सुरवात केली. परंतु त्याच्या या हत्याराने बॉम्ब फेकण्याची क्रिया खूप हळूहळू होत होती. याचा फायदा घेऊन काही गुंड यॉन्गपर्यंत पोचले व त्यांनी त्याला बदडण्यास सुरवात केली. यॉ न्गने मार खाला पण आपली जागा सोडली नाही. शेवटी ते गुंड परत फिरले. जाताना त्यांनी आपण पुढच्या वेळी बुलडोझर घेऊन येणार असल्याचे सांगितले



ते गेल्यावर यॉन्ग त्याचे नातेवाईक व मित्र यांनी मिळून पुढच्या युद्धाचा बेत आखला. यॉन्गने मग घराजवळ एक टॉवर बांधला. या टॉवरवर त्याने 300 फूटापर्यंत बॉम्ब फेकेल असा एक रॉकेट लॉन्चर, खूपसा दारूगोळा, एक कर्णा व बसायला कोच ठेवला. व आपल्या युद्धाची सर्व तयारी केली. या 26 मे ला परत एकदा गुंडाची टोळी येताना त्याला दिसली. यावेळी त्यांनी पोलिसांजवळ असतात तशी शील्ड्स व हेल्मेट्स घातली होती. त्यांच्यामागे बुलडोझर येत होते

हे गुंड त्याच्या मार्‍याच्या टप्यात आल्याबरोबर कर्ण्यावरून त्याने त्यांना थांबायला व परत फिरायला सांगितले. हे केले नाही तर परिणाम वाईट होतील असा दमही त्यांना दिला. त्याच्या धमकीचा उपयोग न होता हे गुंड पुढे येत आहेत हे बघितल्यावर त्याने आपल्या रॉकेट लॉन्चर मधून बॉम्ब्सचा वर्षाव चालू केला. तो एवढ्या भरभर हे बॉम्ब फेकत होता की गुंडांना पुढे येता येईना. बॉम्ब्समुळे यॉन्गच्या नेहमी शांत असलेल्या शेतीला, युद्धभूमीचे स्वरूप थोड्या वेळ प्राप्त झाले. हे सगळे आवाज ऐकून पोलिस त्या ठिकाणी आले व त्यांनी या गुंडाना व त्यांच्या बुलडोझरना पिटाळून लावले आणि ते यॉन्गला पोलिस स्टेशनवर चौकशीसाठी घेऊन गेले. परंतु यॉन्गने कोणताच गुन्हा केल्याचे त्यांना सिद्ध करता येईना. कारण त्याने फोडलेले फटाके गुंडांपासून लांब असल्याने ते इजा करण्यासाठी फेकले होते असे म्हणता येत नव्हते. शेवटी शांततेचा भंग केल्याबद्दल त्याला दम भरून सोडून देण्यात आले. कदाचित पोलिसांना मनातून यॉन्गच्या शौर्याचे कौतुकच वाटले असावे.
यॉन्गच्या या महायुद्धाची कथा जशी माध्यमांना समजली तसा यॉन्ग एकदम एक सुपर हीरो झाला. बिजिंगचा एक सुप्रतिष्ठित वकील त्याच्या मदतीसाठी आला. त्याने या कंपनीशी चर्चा करून शेवटी यॉन्गला 1,12000 अमेरिकन डॉलर्स भरपाई देऊ केली. ती जमीन प्रत्यक्षात यॉन्गची नव्हतीच. पुढच्या 9 वर्षात त्याला या शेत जमिनीमधून जे उत्पन्न मिळण्यासारखे होते त्याच्या कितीतरी पट रक्कम त्याला मिळाली असल्याने तो खुष झाला आहे. त्याने माध्यमांना असेही सांगितले आहे की या युद्धानंतर त्याच्याशी वागण्याची सरकारी अधिकार्‍यांची पद्धतच बदलून गेली आहे. आता ते त्याच्याशी अतिशय सहकार्याच्या भावनेने बोलतात. यॉन्गचे उदाहरण अनेक चिनी गरीब शेतकर्‍यांना फारच आवडले असून आपल्यावर होणार्‍या अन्यायाला तोंड देण्याचे ते या पुढे प्रयत्न करतील यात शंकाच नाही.
रॅम्बो हा काही फक्त सिनेमात नाही. तो चीनमधल्या वुहान प्रांतात सुद्धा प्रत्यक्षात अवतरला आहे.
10 जुलै 2010