सोमवार, डिसेंबर १३, २०१०

व्हिक्टोरियन इंग्लंड व आधुनिक चीन

आपल्यापैकी बहुतेकांनी चार्ल्स डिकन्स या प्रसिद्ध लेखकाच्या कादंबर्‍या किंवा किमान त्यांची भाषांतरे नक्की वाचली असतील. डेव्हिड कॉपरफील्ड, ऑलिव्हर ट्विस्ट, वगैरेसारख्या त्याने लिहिलेल्या कादंबर्‍या इंग्रजी साहित्यात अजरामर झालेल्या आहेत. या कादंबर्‍यांच्यात व्हिक्टोरियन इंग्लंड मधल्या प्रायव्हेट शाळांचे जे चित्रण त्याने केले आहे त्याला खरोखर तोड नाही. या शाळांमधील शिक्षणपद्धती, मुलांना देण्यात येणारी वागणूक व शिक्षा याचे इतके भावनास्पर्शी वर्णन डिकन्सने केलेले आहे की या शाळांबद्दल आत्यंतिक चीड वाचकाच्या मनात दाटून आल्याशिवाय रहात नाही.
चीन मधल्या शान्शी प्रांतामधल्या हानबिन जिल्ह्यातल्या आन्कान्ग या शहरामध्ये काही खेडूतांना नुकतीच जी वागणूक दिली गेली त्याबद्दलच्या बातम्या वाचताना डिकन्सच्या व्हिक्टोरियन इंग्लन्ड मधल्या शाळांच्या मधले वर्णन तर आपण वाचत नाही ना? असे मला सारखे वाटत राहिले
या आन्कान्ग शहराच्या जवळ एक एक्सप्रेस वे किंवा जलदगती मार्ग बांधण्याचे काम चालू आहे. हा रस्ता बांधण्यासाठी काही शेतकर्‍यांच्या जमिनी स्थानिक प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. आपल्या शेतजमिनी घेऊन त्याचा पुरेसा मोबदला आपल्याला मिळालेला नाही असे या शेतकर्‍यांना वाटत असल्याने त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन पुकारले. 50 खेडुतांचा एक जमाव या काम चालू असलेल्या रस्त्यावर जमला व त्यांनी ठेकेदाराला काम पुढे चालू करण्यास प्रतिबंध केला व रस्त्यावरून जाणारी वाहने थांबवली. या सत्याग्रहामुळे थोड्याच वेळात तेथे पोलिस आले व त्यांनी शेतकर्‍यांना आपला एक प्रतिनिधी बोलणी करण्यासाठी पाठवण्यास सांगितले व व्हिडियो कॅमेर्‍याने त्या शेतकर्‍यांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे हा जमाव अधिकच चिडला व त्यांनी पोलिसांशी धक्काबुक्की करून त्यांना चित्रीकरण करण्यास मनाई केली. पोलिसांच्या मते त्यांनी कॅमेर्‍याचे नुकसानही केले. परिस्थिती हाताबाहेर जाते आहे हे बघितल्यावर पोलिसांनी जास्त कुमक मागवली व अखेरीस 9 ग्रामस्थांना अटक केली

2 नोव्हेंबरला हे 9 ग्रामस्थ व इतर 8 जण यांच्यावर खटला चालवण्यासाठी आन्कान्ग प्रशासनाचे गव्हर्नर व इतर अधिकार्‍यांनी, सर्व नागरिकांची एक खुली सभा घेतली. या सभेत या 17 आंदोलकांवर खटला वगैरे काही न चालवता त्यांना डिकन्सच्या शाळांमधे शोभेल अशी शिक्षा देण्यात आली. या सर्व 17 जणांना जमलेल्या प्रचंड गर्दीसमोर उभे करण्यात आले. त्यांच्या गळ्यात त्यांचे नाव/पत्ता व त्यांचा गुन्हा काय? हे सांगणारा एक मोठा पांढरा बोर्ड अडकवण्यात आला व त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जमलेल्या जमावाची सहानुभूती कोणाकडे होती? याची कल्पना या प्रसंगाच्या फोटोमधे असलेल्या जमावातील लोकांच्या चेहर्‍यावरचे भाव बघून चांगलीच येते

स्थानिक प्रशासनाने हातात घेतलेल्या कोणत्याही प्रकल्पाला कोणीही कोणत्याही कारणासाठी विरोध करू नये म्हणून Ankang Municipal Public Security Bureau deputy director आणि deputy head of Hanbin District Government असलेला Yang Peng याने एक धमकीवजा नोटिस आता काढली आहे. या नोटिसीमधे म्हटले आहे की " कोणत्याही बांधकामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे किंवा बांधकामावर दंगा धोपा करणे, बांधकाम मजुरांना धमक्या देणे असे प्रकार घडल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल. अशा बांधकामांना पाणी व वीज न पुरवणे हा ही गुन्हा समजण्यात येईल. "
आंदोलकांना बाजू मांडण्याची संधी सुद्धा न देता असली अपमानास्पद शिक्षा देण्याचा हा प्रकार डिकन्सच्या कादंबर्‍यांच्यात शोभणाराच होता. त्या बिचार्‍या खेडुतांची गार्‍हाणी तर कोणी ऐकलीच नाहीत व त्यावर त्यांना असली अपमानास्पद शिक्षा मात्र देण्यात आली

भारतात असला प्रकार कोणी करण्याचा नुसता प्रयत्न जरी कोणी केला तरी त्यावरून केवढा गदारोळ उठेल त्याची कल्पनाही करवत नाही.
अर्थात एकाधिकारशाही व लोकशाही यांच्यामधे हा फरक आहेच. या प्रसंगाचे फोटो मात्र बरेच काही सांगून जातात.
13 डिसेंबर 2010

शुक्रवार, नोव्हेंबर ०५, २०१०

खेकडे वाटपाचे आधुनिक यंत्र

1950 किंवा 1960 च्या दशकात मुंबईला चर्चगेटच्या समोर जे एरॉस नावाचे चित्रपटगृह आहे तिथे कोका कोला कंपनीने एक मशिन बसवले होते. त्या यंत्रात 4 आण्यांचे किंवा 25 पैशांचे नाणे टाकले की खालच्या बाजूला असलेल्या एका कप्यात थंडगार कोका कोलाची एक काचेची बाटली येऊन पडत असे. कोणत्याही विक्रेत्याच्या हजेरीशिवाय पेये किंवा खाद्यपदार्थ तुमच्या हातात देऊ शकणारे या यंत्राची त्या वेळी सगळ्यानाच मोठी मजा वाटायची. अर्थात त्या काळात 4 आण्याचे नाणे ही तशी बरीच मोठी रक्कम असल्याने येता जाता ते यंत्र वापरणे शक्य नव्हते पण कधीतरी गंमत म्हणून ते यंत्र मी वापरलेले होते.
पुढे परदेशात अशा प्रकारची अनेक यंत्रे मी बघितली. सिंगापूर मधे आमच्या सदनिका संकुलात ब्रेड, स्नॅक्स किंवा पेयांचे वाटप करतील अशी 3/4 यंत्रे बसवलेली आहेत. त्यामुळे वाटप यंत्रे ही माझ्यासाठी तरी काही नवलाची गोष्ट राहिलेली नाही. अरब अमिरातीमधे सोने अशा मशि न्समधून मिळते किंवा पॅरिस मधे पर्फ्युम्सच्या बाटल्या अशा यंत्रातून मिळतात असे मी वाचले आहे. सोने किंवा पर्फ्युम्स खरेदी हे माझे प्रांत नसल्यामुळे मला यातला अनुभव नाही हे मला मान्य करायलाच पाहिजे.



मात्र चीन मधल्या नानजिंग शहरात बसवलेल्या एका नवीन वाटप यंत्राबद्दलची माहिती मी परवा जेंव्हा वाचली तेंव्हा मात्र मी आश्चर्याने थक्क झालो.नानजिंग शहरातल्या मेट्रोच्या लाइन 1 वरच्या शिन्जेइकाऊ (Xinjiekou) या स्टेशनवर हे वाटप यंत्र बसवले आहे. या स्टेशनवरून डेउआनपान हे एक्झिट जे घेतात त्यांना हे यंत्र दिसते. या यंत्रावरून कसले वाटप होते हे कळल्यावर त्यावर विश्वास बसणेही कठिण आहे. पण छायाचित्रे बघितल्यावर विश्वास ठेवायलाच लागतो. या यंत्रातून पायावर केस असलेले जिवंत खेकडे (Hairy Crab) वितरित केले जातात
 
या वर्षी म्हणे चीनमधे दोन गोष्टींचे अमाप पीक आले आहे. एक तर पिवळ्या रंगाची chrysanthemums ही फुले व रसरशीत व पोसलेले केसाळ खेकडे. खेकड्यांच्या विपुल उपलब्धतेमुळे एका कंपनीने हे खेकडे यंत्राद्वारे विकण्यास सुरवात केली आहे. 1 ऑक्टोबरला या यंत्रावरून खेकडे विक्री सुरू झाली. पहिल्यांदा या यंत्राकडे नावीन्य म्हणून लोक बघत होते. या नाविन्याचे प्रथम संशयात रूपांतर झाले व पहिल्या दिवशी फक्त 1 खेकडा विकला गेला. 1 महिन्यानंतर रोज 200 खेकडे तरी विकले जाऊ लागले आहेत
 
या यंत्रात 5 ओळींच्यामधे खेकडे ठेवलेले असतात. खेकडे एका प्लॅस्टिकच्या आवरणात पॅक केलेले असल्याने पैसे ताकले की सुलभपणे खालच्या कप्यात येऊन पडतात. 10युआन पासून 50 युआन पर्यंत खेकड्यांच्या किंमती आहेत. या शिवाय खेकड्यांपासून बनवलेल्या व्हिनिगरच्या बाटल्याही या यंत्रातून मिळतात
 
चाय चुन ही महिला म्हणते की बाजार भावापेक्षा हे खेकडे नक्कीच स्वस्त आहेत. मी काल 2 खेकडे विकत घेतले होते. ते चांगल्या प्रतीचे असल्याने आज 8 घेतले आहेत. बरेचसे नानजिंगचे नागरिक या मशिनचे फोटो काढण्यासाठीचे येथे येत आहेत.
हे मशिन यशस्वी ठरले तर नंतर कोणते जिवंत प्राणी असल्या मशिन्समधून चीनमधे मिळू लागतील याचा अंदाज बांधणे केवळ अशक्य आहे.
5 ऑक्टोबर 2010

बुधवार, ऑक्टोबर १३, २०१०

चिनी चंद्रयानाचे उड्डाण

आपण सगळ्यांनीच ही बातमी वाचली असेल की चीनने आपले Chang'e II हे चंद्रयान 1 ऑक्टोबरला 18:59:57 या वेळेला आपल्या Long March II F 18 या रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात पाठवले.
 
या उड्डाणानंतर चीनमधल्या नेटईझ( Netease) या वृत्तसंस्थेने या उड्डाणामधे एक जबाबदारीची भूमिका बजावत असलेल्या Long March rocket technology division च्या संचालिका लिऊ यानमिन यांची एक मुलाखत टीव्हीवर घेतली. या मुलाखतीत या चंद्रयानाच्या उड्डाणाबद्दल अनेक प्रश्न लिऊ यानमिन यांना विचारले गेले. अमेरिका, भारत हे देश आपली रॉकेट उड्डाणे, साधारण समुद्र किनार्‍यावर असलेल्या ठिकाणांहून करतात. या मागची कल्पना अशी आहे की जर या रॉकेटचे काही भाग जमिनीवर कोसळणार असतील तर ते समुद्रावर पडावेत. जेणेकरून जीवित किंवा वित्त हानी होणार नाही. या दोन्ही गोष्टींना चिनी सरकार फारसे महत्व देते असे वाटत नाही कारण चीनची सर्व रॉकेट उड्डाणे त्यांच्या देशाच्या आतील भागातूनच होतात. 1 ऑक्टोबरचे हे चंद्रयान, चीनने सिचुआन प्रांतातल्या शिचांग (Xichang) या शहरापासून 40 मैल दूर असलेल्या आपल्या रॉकेट लॉन्च स्टेशनवरून सोडले होते. या स्थानाच्या जवळच अनेक खेडेगावे आहेत व जळणारे रॉकेटचे भाग जमिनीवर पडल्याने येथे जीवित व वित्त हानी झाल्याचा पूर्वेतिहास आहे

या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर नेटईझ च्या मुलाखत घेणार्‍याने श्रीमती लिऊ यानमिन यांना मुद्दाम काही प्रश्न विचारले. यापैकी पहिला प्रश्न असा होता की या उड्डाणासाठी जवळपास रहाणार्‍या लोकांना हलवले होते का? लिऊ बाईंनी या प्रश्नाचे उत्तर देताना हे मान्य केले की 2.5 किलोमीटर परिसरात रहाणार्‍या अंदाजे 2000 खेडूतांना हलवण्यात आले होते. याचे कारण असे की 300 टन वजनाचे हे रॉकेट जेंव्हा उड्डाण करते तेंव्हा प्रचंड ध्वनी व हादरे निर्माण होतात तसेच काही विपरित प्रकार घडण्याची ही शक्यता असते. त्यामुळे या लोकांना आम्ही हलवले. यानंतर नेटईझच्या वार्ताहराने विचारले की उड्डाणानंतर किती वेळ रॉकेटमधून जळणारे भाग जमिनीवर पडण्याची शक्यता असते? याला लिऊ बाईंचे उत्तर होते 130 सेकंद. या नंतर त्यांना असे विचारले गेले की या जळणार्‍या भागांमुळे हानी होऊ नये म्हणून काय काळजी घेतली जाते? या प्रश्नाचे उत्तर देताना लिऊ बाईंनी सांगितले की आम्ही सर्व ती काळजी घेतो यासाठी आमच्याकडे प्रशिक्षित व्यावसायिक लोक आहेत. म्हणजे या मुलाखतीवरून तरी असे दिसत होते की सर्व आलबेल आहे

प्रत्यक्षात काय घडले ते पाहूया. 1 ऑक्टोबरच्या रात्री जिआंगशी प्रांतातल्या सुईचुआन काऊंटी मधल्या दोन खेडेगावातल्या लोकांना मोठे गडगडाटाचे आवाज ऐकू आले. त्यांना प्रथम धरणीकंप झाला असावा असे वाटले. परंतु नंतर असे आढळले की रॉकेटच्या नाकावर जेथे चंद्रयान बसवलेले होते त्याच्या भोवती असणारे संरक्षक कवचाचे मोठे तुकडे या गावांच्यात येऊन पडले होते.  

या शिवाय गुईझाऊ प्रांतातल्या झेनयुआन काऊंटीमधल्या एका खेडेगावात मुख्य रॉकेटचा एक मोठा तुकडा पडलेला आढळला. तर जिन्शा काऊंटी मधल्या एका गावात व सिचुआन प्रांतातल्या गुलिन काऊंटी मधल्या एका गावात बूस्टर रॉकेट्स सापडली. या सर्व गावकर्‍यांचे नशीब जोरावरच होते असे म्हणले पाहिजे कारण जीवित हानी तर झाली नाहीच पण वित्त हानीही अगदी किरकोळ झाली. हे सर्व भाग उडाणाच्या बर्‍याच नंतर खाली पडले होते.अर्थात ज्या अवकाश संशोधन संस्थेने हे रॉकेट अवकाशात पाठवले त्यांनी या खेडूतांची साधी क्षमा सुद्धा मागितली नाही हा भाग निराळा

वर निर्देश केलेल्या मुलाखतीत, या लिऊ बाईंना भारताच्या चंद्रयानाबद्दल एक प्रश्न विचारला गेला. परंतु भारताच्या रॉकेट्सची खात्री देता येत नाही. ती अवकाशात स्थिर रहात नाहीत व त्यांची उपग्रह वाहून नेण्याची क्षमता चिनी रॉकेट्स पेक्षा फारच कमी असल्याने भारताच्या अवकाश कार्यक्रमा बद्दल काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.
रॉकेटचे हे भाग दाट वस्ती असलेल्या एखाद्या भागावर पडले असते तर काय झाले असते हा विचार करण्यातही अर्थ नाही. रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची जागा शोधताना हे असे काही घडू शकते याला बहुदा काही महत्वच दिले गेलेले नाही.
13 ऑक्टोबर 2010

बुधवार, सप्टेंबर २९, २०१०

श्रेष्ठतेचा हव्यास की भ्रष्टाचार?


काही दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनीच ही बातमी वाचली असेल की चीन हा देश आता जगातील द्वितीय क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनला आहे. आपला देश सर्वात भव्य व श्रेष्ठ असावा, आपल्या देशातल्या इमारती, सुविधा, वाहतुक व्यवस्था, कारखाने अगदी आधुनिक असावेत आणि आपला देश प्रथम दर्जाचा असावा अशी इच्छा कोणत्याही देशाची असणार त्याचप्रमाणे चिनी लोकांचीही असते. परंतु चीन बद्दलची एखादीच अशी बातमी वाचनात येते की सर्व गोष्टींचे आधुनिकीकरण करण्याचा एखादा गंड तर या देशाला झालेला नाही ना अशी मनात शंका येऊ लागते.
जगामधले सर्वात जास्त बांधकाम चीन मधे होते आहे. दर वर्षाला या देशात 200 कोटी वर्ग मीटर एवढे नवीन बांधकाम होते. या बांधकामासाठी हा देश जगाच्या एकूण सिमेंट व पोलाद उत्पादनापैकी 40 % वापरत असतो. मात्र नवीन आणि आधुनिक इमारती बांधण्याच्या या हव्यासासाठी योग्य भूखंड सारखे कोठून मिळणार? त्यामुळे 10/15 वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती सुद्धा आता पाडल्या जाऊ लागल्या आहेत. या इमारती खरे तर अतिशय उत्तम अवस्थेत असल्या तरी त्या सुरुंग लावून पाडल्या जातात. एकीकडे पर्यावरण व पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पदार्थ किंवा खनिज स्त्रोतांचा न्यूनतम वापर केला पाहिजे असे पर्यावरण तज्ञ सांगत असताना हे उपलब्ध स्त्रोत अनावश्यक रित्या वापरण्याच्या या अट्टाहासाला गंडच म्हटले पाहिजे.
अशा नुकत्याच पाडलेल्या काही इमारतींची उदाहरणे.
 1. Vienna Wood Community in Hefei City; ही 20000 वर्ग मीटर एरिया असलेली वसाहत पूर्ण होण्याच्या आधीच 2005 साली पाडण्यात आली. या वसाहतीची मुख्य इमारत 58.5 मीटर उंच होती. या इमारतीच्या 16 व्या मजल्याचे काम चालू असतानाच ही इमारत पाडण्यात आली व अनेक कोटी युआन अक्षरश: मातीत गेले. इमारत पाडण्याचे कारण- स्थानिक प्रशासनाला असे वाटले की या शहरातल्या हुआनशान रस्त्यावरून जवळचा डाशूशान पर्वत, ही इमारत मधे आल्यामुळे नीट दिसू शकत नाही व त्यामुळे शहराचे सौंदर्य कमी होते आहे
 2. The Bund Community in Wuhan यांगत्झी नदीचा व्ह्यू कोणत्याही अपार्टमेंट मधून दिसेल अशी जाहिरात केलेली ही वसाहत, 2002 मधे पाडण्यात आली. ही वसाहत पाडण्याच्या आधी सर्व वैधानिक परवानग्या घेण्यात आलेल्या होत्या. परंतु पूर्ण झाल्यावर, या वसाहतीमुळे यांगत्झी नदीच्या पूर नियंत्रण कायद्यांचा भंग होतो आहे असा शोध लागला. मूळचा 2 कोटी युआन खर्च तर धुळीत गेलाच पण या जागेचे सुशोभीकरण करण्यासाठी आणखी बराच खर्च आला
 3. Yuxi Exhibition Center चोन्गचिन्ग महानगरपालिकेच्या यांगचुआन या भागात ही वैशिष्ट्यपूर्ण इमारत होती. ती बांधण्यास 4 कोटी युआन खर्च आला होता. येथे प्रदर्शने आयोजित होत असत. ही इमारत एका खाण उद्योजकाने विकत घेतली व फक्त 5 वर्षे जुनी असतानाच 2005 मधे पाडून टाकली. पाडण्यासाठी 250 Kg. डायनामाईट वापरावे लागले होते. या ठिकाणी आता एक पंचतारांकित हॉटेल बांधले गेले आहे
 4. Zhongyin Building in Wenzhou City ही 93 मीटर उंच इमारत 1997 मधे बांधली होती. बांधल्यानंतर लगेचच, हे बांधकाम शहरातला सर्वात मोठा आर्थिक गुन्हा म्हणून गणले जाऊ लागले. 43 व्यक्तींच्यावर 3 कोटी युआनचा भ्रष्टाचार केल्याबाबत गुन्हे दाखल केले गेले. त्यामुळे या इमारतीला भ्रष्टाचार सदन असे म्हणत असत. या बांधकामात सुरक्षा नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले असल्याने ही 2004 मधे पाडून टाकण्यात आली
 5. Shouyi Sports Centerही 10 वर्षे जुनी असलेली इमारत 2009 मधे पाडली गेली. हुबेई प्रांतामधले अनेक खेळाडू या ठिकाणीच सराव करून पुढे विश्वविजेते झाले होते. 1911 सालच्या क्रांतीची शताब्दी साजरी करण्यासाठी एक संग्रहालय या जागेवर बांधण्याचे ठरल्यावर ही पाडून टाकण्यात आली
 6. Five Lake Hotel in Nancang City, 13 वर्षे जुने हॉटेल 2010 पाडले. हे हॉटेल नानकान्ग शहरातली उल्लेखनीय जागा म्हणून गणली जात असे. हॉन्गकॉन्गच्या एका कंपनीने हे हॉटेल विकत घेतले व त्याचे पंचतारांकित हॉटेल बनवण्यासाठी जुनी इमारत पाडून टाकली. 40000 टन राडा रोडा निर्माण झाला आहे. त्याची विल्हेवाट लावण्यास मोठे प्रयत्न चालू आहेत
7. Shenyang Summer Palace, शहरात असलेले नागरिकांच्या करमणूकीचे हे एक मोठे केंद्र होते. पहिल्या 5 वर्षात या ठिकाणाला 4 कोटी पर्यटकांनी भेट दिली होती. 15 वर्षे जुनी ही इमारत 2009 मधे सदनिका बांधण्यासाठी पाडली
 8. Zhejiang University’s No. 3 building in lakeside campus, 67 मीटर उंच 20 मजले असलेली इमारत विद्यापीठाच्या या कॅम्पसवरची सर्वात मोठी इमारत होती. विद्यापीठाने ही इमारत या जागी व्यापारी संकुल बांधण्यासाठी 24.6 कोटी युआनला विकली. ही पाडली तेंव्हा विद्यापीठाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी तो दिवस एक दुख:द दिवस म्हणून मानला होता
9. Tsingtao Railway Building, 16 वर्षे जुनी असलेली या शहरातली उल्लेखनीय वास्तू, 2008 च्या ऑलिंपिक खेळांच्या वेळच्या बांधकाम कार्यक्रमात पाडली
10. Shenyang Wulihe Stadium, चीनच्या फुटबॉलची मक्का समजत असत. 25 कोटी युआन खर्च करून बांधलेले हे स्टेडियम 2007 मधे 18 वर्षांनंतर पाडले गेले. 16 कोटी युआनला या जागेचा लिलाव करण्यात आला.
 11. “Asian First Arc” in Shanghai, शांघाई मधल्या सुप्रसिद्ध बंडचा देखावा अतिशय सुंदर दिसतो म्हणून हा रस्ता प्रसिद्ध होता. बांधल्यानंतर 10 वर्षांनीच बंड भागाचे रिमॉडेलिंग करण्याचा निर्णय झाला व हा रस्ता 2008 मधे पाडला गेला.
5/10 वर्षे जुन्या झालेल्या इमारती पाडण्याच्या खुळामागे काय मानसशास्त्र आहे हे सांगणे खरोखरच फार कठिण आहे. चीनमधे सर्व निर्णय अधिकारी पातळीवर घेतले जातात. त्यामुळे कोणती जागा विकसित करायची किंवा कोणती इमारत पाडून नवी बांधायची याचे निर्णय अधिकारीच घेतात. नागरिकांना तो निर्णय मान्य नसला तरी असहाय्यपणे बघत रहाण्याशिवाय दुसरे काही करता येत नाही. अधिकारी हा निर्णय घेताना बर्‍याच वेळा वैयक्तिक स्वार्थासाठी तो घेत असले पाहिजेत हे वेनझाऊ शहराच्या उदाहरणावरून स्पष्टच दिसते आहे. ही बांधकामे पाडणे म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचा केवढा दुरुपयोग आहे हे बहुदा शासनाच्या लक्षातच येत नसावे. आपल्याकडे प्रत्येक प्रकल्पाला होणारी दिरंगाई व फाटे बघितले की पुष्कळ वेळा नको ती लोकशाही असे वाटते परंतु लोकशाही मधे असलेल्या अधिकार्‍यांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर असलेला लोकप्रतिनिधींचा अंकुश ही किती आवश्यक बाब आहे हे चीनमधल्या या इमारती पाडण्याच्या प्रकारांमुळे चांगलेच लक्षात येते.
29 सप्टेंबर 2010

बुधवार, सप्टेंबर १५, २०१०

शाळेमधली केशरचना कशी असावी आणि नसावी?


जगभरच्या शाळांच्यामधे, त्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची वेषभूषा कशी असावी या बद्दल नोयम असतात. अमेरिकेतील शाळांच्यात बहुदा ते सर्वात शिथिल असावेत. भारतात सुद्धा शाळेत जाणारी मुले-मुली अलीकडे गणवेशात असतात. या पलीकडे जाऊन केस कापलेले असावेत. मुलींच्या दोन वेण्या घातलेल्या असाव्यात. केस कापलेले असले तर ते डोळ्यावर येऊ नयेत म्हणून हेअर बॅ न्ड लावावा वगैरे सूचना सर्वच शाळा देत असतात. मला आठवते आहे की माझी मुलगी पुण्याला हुजुरपागेत शिकत असताना दोन घट्ट वेण्या घालूनच शाळेत जात असे. दुसरी कोणतीही केशरचना करण्याची शाळेची परवानगी नसे.
चीनमधल्या एका शाळेने आता विद्यार्थ्यांची केशरचना कशी असावी हे सांगताना ती कोणत्या प्रकारची नसावी हे विद्यार्थ्यांना कळावे म्हणून शाळेत चक्क नोटीस बोर्डावर नोटीसाच लावल्या आहेत. गंमत म्हणजे या नोटीसांची छायाचित्रे काढून शाळेतल्याच एका विद्यार्थिनीने कोणत्या तरी मित्र-मैत्रिणीच्या संगणकावरून आंतरजालावर प्रसिद्ध करून टाकली आहेत. पुढचे वर्णन या विद्यार्थिनीच्याच शब्दात.
आपली शाळा परत सुरू झाली आहे. मला त्यामुळे आपल्या शाळेच्या नोटीस बोर्डावर लावलेल्या दुख:(Tragic) फोटोंची आठवण येते आहे. ही माहिती तुम्हाला सगळ्यांना शेअर करता यावी म्हणून मी ती परत माझ्या मैत्रिणीच्या घरून पोस्ट करते आहे. ज्या कोणी ही माहिती पहिल्यांदा पोस्ट केली आहे तो नक्कीच मागच्या जन्मी पंख तुटलेला देवदूत असला पाहिजे. आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्यावर प्रेम केले पाहिजे आणि आपण सगळ्यांनी त्याला डान्टेन्ग(Danteng) केले पाहिजे.(Danteng हा आंतरजालावरचा चिनी स्लॅन्ग शब्द आहे. त्याचा अचूक अर्थ त्या विद्यार्थिनीला व तिच्या मित्र मैत्रिणींनाच माहित असावा. पण या शब्दाचे अर्थ साधारणपणे 'कंटाळा आल्यावर केलेली एखादी गोष्ट' किंवा एखादी असाधारण, अतर्क्य, अर्थहीन गोष्ट असाही हो ऊ शकतो. मदत करता येणार नाही अशी व्यक्ती किंवा धक्कादायक, मूर्ख शॉकिंग असाही काही जण याचा अर्थ करतात. आंतरजालावरील एखादे पोस्ट वाचल्यावर त्या लेखकाने मला डेन्टान्ग केले अशा पद्धतीनेही हा शब्द वापरला जातो.)
आपल्या शाळेने बंदी घातलेल्या केशरचना
20100902-hair-03

Japanese gangster pirate hairstyle
(Or abnormal style)

20100902-hair-04

Not manly style
(imitating woman’s hairstyle, bang in the front style)

20100902-hair-05

Nervous breakdown style

20100902-hair-06

No money to get a hair cut homeless style
(only applies to male students, front back and sides are too long)

20100902-hair-07

Pretending to be “Buddhist nun” style

20100902-hair-08

Younger kids with this style is naive style, others are called retard style
(A tuft of hair in the front of the head )

20100902-hair-09

“no blade of grass growing on it” shiny style

20100902-hair-10

“Sit behind a screen to receive ministerial reports; hold court from behind a screen” Sinister style

20100902-hair-11

Migraine style
(No face to see people style)

20100902-hair-12

School abnormal style look


20100902-hair-13

Fraud and trickery style
(painting eyebrows and eyes, lip stick, fake eye lashes)

20100902-hair-15

Adult women ageing style
(premed fair, dyed hair)

20100902-hair-14

Adult women ageing style 2
(hair in disarray style)


20100902-hair-16

inappropriate integrating unfashionable with modern style

20100902-hair-17

Home made “cross-eye” disfigure style


आणि शेवटी आपल्या शाळेने मान्य केलेल्या केशरचना.


Male student standard hairstyle: Not blocking the eyes in the front, not blocking the ears on the sides, not touching the collar at the back.

Female student standard hairstyle: Not passing eyebrows in the front, short hair do not pass the collar at the back, long hair do not drop on the shoulder.

मी फोटोखालच्या वर्णनाचे मराठी भाषांतर मुद्दामच केलेले नाही. या मुलीने केलेले, मूळ मॅंडरिनमधे असलेल्या वर्णनाचे, इंग्रजीतले भाषांतर मला खूप आवडले.
कोणती केशरचना नको याची चित्रे काढून ती नोटीसबोर्डावर लावण्याची शाळेची कल्पना मला तरी गंमतीदार वाटली. पण या पोस्टच्या मूळ लेखकाला आणि ते परत पोस्ट करणार्‍या विद्यार्थिनीला ती फारशी आवडलेली नसावी. हा बहुदा आपल्या स्वातंत्र्यावरचा घाला त्यांना वाटत असावा.
15 सप्टेंबर 2010

रविवार, सप्टेंबर ०५, २०१०

चिनी पाट्या- लई भारी!



1960च्या दशकात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी देशभर आणीबाणी जाहीर केली होती. काळात सगळीकडे " बाते कम काम जादा" सारखी वचने लिहिलेल्या मोठमोठ्या पाट्या लावलेल्या असत. या पाट्यांच्यावर एक असंबंधित चित्र, व हिंदी व इंग्रजीमधे लिहिलेला एक संदेश असे. बहुतेक वेळा हिंदी वाक्याचे इंग्रजीत भाषांतर केलेले असल्याने त्या इंग्रजी वाक्याचा अर्थ काहीतरी दुसराच निघू शकत असे. या कारणामुळे मला ह्या पाट्या वाचायला आवडत.
पुण्याच्या लोकांना जिकडे तिकडे पाट्या लावायला खूप आवडते. अनोळखी घरात शिरताना दारावरच्या पाहुण्याने काय करावे? कोणते वर्तन चालेल? कोणते चालणार नाही. हे अचूकपणे लिहिलेल्या पाट्या दिसतात. काही दुकानदार आपण विकत असलेल्या मालाचे वर्णन करताना " येथे दणकट लंगोट मिळतील " अशा पद्धतीच्या पाट्या लावून बरीच मजा आणतात.
हे सगळे असले तरी पाट्या लावण्याच्या बाबतीत चिनी लोकांचा हात कोणीही धरू शकणार नाही. उद्‌बोधक पाट्या, उत्साहवर्धक पाट्या, सूचना देणार्‍या पाट्या जागोजागी लावलेल्या असतात. शाळांमधे तर पाट्याच पाट्या असतात. आणीबाणीमधल्या भारतीय पाट्यांप्रमाणेच या पाट्यावर काहीतरी चित्र व एक मॅन्डरिन व इंग्रजी भाषेतला संदेश लिहिलेला असतो. इंग्रजीमधे लिहिलेला हा संदेश मॅन्डरिनमधून भाषांतर करून लिहिलेला असल्याने बर्‍याच वेळा अतिशय विनोदी असतो. चिनी लोकांच्या इंग्रजीला चिंगलिश असे नाव आता पडले आहे. हुईझॉऊ बोलुओ एक्स्पेरिमेन्टल स्कूल (Huizhou Boluo Experimental School)) या शाळेमधे लावलेल्या अशा काही चिन्गलिश मधल्या पाट्यांची मला आवडलेली उदाहरणे.

विद्यार्थी निवासामधली मेट्रनची खोली.

तुमच्या थाळीतला प्रत्येक दाणा पिकवायला अमाप कष्ट पडतात हे तुम्हाला माहित आहे का?

काटकसरीने जगण्यासाठी अन्न व वस्त्रे या बाबत फार आग्रही राहू नका.



दुसर्‍याला सहाय्य आणि मदत करण्यासाठी एकता आणि प्रेम

हळू चाला. दुसर्‍यांना विचलित करू नका.

पर्यावरणाची जपणूक करा. उधळेपट्टीला विरोध करा.
अन्नाला संपत्ती मानणे हा चांगला गुण आहे.
प्राथमिक शाळेचे कॅन्टीन

आंतरजाल कार्यालय, सॉफ्टवेअर उत्पादन खोली
संस्थेत शांतता पाळा. गडबड करू नका व दुसर्‍याला पकडण्यासाठी धावू नका.
वैयक्तिक आरोग्यासंबंधी  चांगल्या सवई लावून घेण्यासाठीस्वत:ला जाणा.
 थूंकू नका
आहेत की नाही लई भारी! या पाट्यांवरून एक गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आली. हुईझॉऊ बोलुओ एक्स्पेरिमेन्टल स्कूल या शाळेत जे विषय शिकवले जातात त्यात इंग्लिश हा विषय नक्कीच नाही.हा!हा!हा!
5 सप्टेंबर 2010