शुक्रवार, जानेवारी २९, २०१०

कर्करोगींचे गाव


ग्वांगडॉंग(Guangdong) हा चीनमधे अगदी दक्षिणेला असलेला प्रांत आहे. या प्रांतातल्या लिऍंगचिऍओ(Liangqiao) या शहराच्या दक्षिणेला शांगबा(Shangba) नावाचे अंदाजे 3300 वस्तीचे एक खेडेगाव आहे. प्रथमदर्शनी हे गावे म्हणजे ऊस आणि तांदुळाच्या शेतांमधे लपलेले एक छानसे खेडेगाव वाटते. परंतु आज हे गाव कर्करोगींचे गाव या नावानेच ओळखले जाऊ लागले आहे.

1987 पासून या गावातले 250 तरी गावकरी कर्करोगाचे शिकार बनले आहेत. गावात होणार्‍या मृत्युपैकी 80 टक्के तरी मृत्यु, जठर किंवा पचनसंस्थेच्या कर्करोगाला बळी पडलेले आहेत. या शिवाय या गावातले बहुसंख्य लोक, त्वचा रोग व मूतखड्याच्या विकारांनी पछाडलेले आहेत. या गावाजवळूनच वहात असलेल्या हेंगशुई(Hengshui)या नदीचे पाणी आणि गावाजवळचे भूजल या रोगांना कारणीभूत झालेले आहे. या नदीला आता मृत्युची नदी या नावानेच ओळखले जाऊ लागले आहे. या नदीचे पाणी एवढे प्रदुषित झालेले आहे की कोणताही जलचर प्राणी या नदीत 24 तासापेक्षा जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही.
या गावाजवळ एक छोटे धरण या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधलेले आहे. या धरणातून पुरवले जाणारे पाणी जेंव्हा गावातल्या नळांच्यातून बाहेर येते तेंव्हा ते अशुद्ध व पूर्ण मातकट रंगाचे असते कारण कोणतीच जलशुद्धीकरण योजना येथे बसवलेली नाही. या सगळ्या प्रदुषणाचा उगम या गावाच्या जवळच असलेल्या डबाओशान(Dabaoshan) येथल्या जस्त, तांबे व लोखंडाच्या खाणी हा आहे. मागच्या वर्षी या सरकारी मालकीच्या खाणींनी 6000 टन तांब्याचे व 850000 टन लोह खनिज खाणीबाहेर काढले. या खाणींमधून निघणारे सांडपाणी हेंगशुई नदीच्या पाण्यात मिसळते. या सांडपाण्यामुळेच शांगबा गावाच्या जवळच्या शेतामधून निघणार्‍या शेतीमालात, कॅडमियम धातूचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. या शेतात पिकलेला तांदूळ चवीलाही विचित्रच लागतो असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे.


या भागातील शेतकरी मागासलेले आणि गरीबच आहेत. अशा परिस्थितीत त्यांना हे प्रदुषित पाणी व तांदुळ यांचा सामना करावा लागत असल्याने रोगराई आणि मृत्युचे प्रमाण वाढत चालले आहे. परिस्थिती एवढी गंभीर होत चालली आहे की एखादा गावकरी आजारी पडला तर बहुतांशी निदान, कर्करोगाचेच असते.

काही गावकर्‍यांनी या प्रदुषित पाण्याचा वापर टाळण्यासाठी, जवळच्या उंच डोंगरावर जाऊन वर असलेले शुद्ध पाणी पिण्यासाठी आणण्यास सुरवात केली आहे परंतु हे काम अतिशय कष्टप्रद आहे. या गावकर्‍यांना पाणी जरी शुद्ध मिळाले तरी त्यांना, त्यांच्याच शेतात पिकलेला व कॅडमियम सारख्या धातूंनी प्रदुषित झालेला, तांदुळच खावा लागत असल्याने कर्करोगाचे सावट त्यांच्यावरही आहेच.


सरकारी खाणींनी गावकर्‍यांना वैद्यकीय मदत देऊ केली आहे पण कर्करोगासारख्या आजाराच्या उपचारासाठी जो प्रचंड खर्च येतो त्या खर्चाच्या एक टक्का सुद्धा ही मदत नसते.
सर्व जगाचे चीन हे वर्कशॉप आहे असे चिनी सरकार मोठ्या गर्वाने सांगते पण हे वर्कशॉप चालवण्यासाठी प्रदुषणाची कोणती भयानक किंमत चिनी गरिबांना द्यावी लागते आहे याचे हे एक उदाहरण आहे. एकाधिकार शासनात निर्णय भरभर घेतले जाऊ शकतात. पण लोकशाहीत असलेला विविध दबावगटांचा प्रभाव चीनमधे नसल्याने घेतलेला निर्णयाचे किती भयावह परिणाम नंतर होऊ शकतात याचे शांगबा गाव एक दुर्दैवी उदाहरण आहे असेच म्हणावे लागते.

19 सप्टेंबर 2009

बुधवार, जानेवारी २७, २०१०

बालकांसाठी वधू संशोधन

झेन्ग कुटुंब हे बिजिंगमधे रहाणारे एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे. या कुटुंबात, झेन्ग पती-पत्नी, श्रीयुत झेन्ग यांचे वरिष्ठ नागरिक असलेले आई-वडील व जवळच्याच अपार्टमेंट ब्लॉकमधे रहाणारे श्रीमती झेन्ग यांचे आई-वडील एवढेच सभासद आहेत. झेन्ग पती-पत्नीना, मेंगमेंग या नावाचा एक अतिशय गोड मुलगा आहे. मेंगमेंगचे वय आहे एक महिना पूर्ण. झेन्ग पती-पत्नीना मेंगमेंगचा एक महिन्याचा वाढदिवस साजरा करायचा आहे. या पार्टीला कोणाकोणाला आमंत्रण द्यायचे? या विषयावर सध्या झेन्ग कुटुंबात सतत चर्चा चालू आहे. नातेवाईक, मित्र यांची यादी करताना, ज्या कुटुंबात नवजात मुलगी जन्माला आली असेल त्याच कुटुंबाना प्राधान्य द्यावे असे झेन्ग पती पत्नी व त्यांचे आई-वडील यांना वाटते आहे कारण मेंगमेंगच्या लग्नाची काळजी झेन्ग पती-पत्नीना आतापासूनच सतावू लागली आहे. झेन्ग पती-पत्नी काही कोणी अशिक्षित लोक नाहीत. ते दोघेही मोठ्या कंपन्यांच्यात कार्य करणारे अधिकारी आहेत.
झेन्ग कुटुंबाचे हे वर्णन काही काल्पनिक नाही. चीनमधली ही सध्याची सत्य परिस्थिती आहे. जर मेंगमेंग साठी आताच वधू नियोजित केली नाही तर तो जेंव्हा लग्नाच्या वयाचा होईल तेंव्हा त्याला बायको मिळणे जवळपास अशक्यच असणार आहे याची झेन्ग पतीपत्नीना चांगलीच कल्पना आली आहे. व म्हणूनच त्यांची आतापासूनच धडपड चालू झाली आहे. मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी जसे आई-वडील धडपडत असतात तशीच स्पर्धा आता भावी पत्नी मिळवण्यासाठी पण चीनमधे करावी लागणार असे दिसते आहे.


2020 या वर्षापर्यंत चीनमधल्या एकूण पुरुषांची संख्या, स्त्रियांच्या एकूण संख्येपेक्षा 2.5 कोटीनी जास्त होईल असा तज्ञांचा अंदाज आहे. या फरकाला प्रामुख्याने कारण चीनचे अधिकृत 'एक कुटुंब एक मूल' धोरण आहे. भारताप्रमाणेच चीनमध्येही, मुलगा होण्याला अतिशय प्राधान्य दिले जाते. यासाठी भ्रूणहत्येचा वापर करण्यास मागे पुढे पाहिले जात नाही. लोकसंख्या तज्ञांच्या मताप्रमाणे कोणत्याही समाजात 100 मुलींच्या बरोबर 103 ते 107 मुलगे जन्माला येण्याचे प्रमाण सर्वसाधारण मानले जाते. चीनमधे 1980 मधेच 100 मुलींच्या बरोबर 108 मुलगे जन्माला आले होते. 2000 सालात हे प्रमाण शहरांच्यात 100:116 तर खेडेगावांच्यात 100:140 एवढे विषम झाले होते. चायनीज अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेस(Chinese Academy of Social Sciences) मधील एका विचार समुहाने(think-tank) अलीकडेच केलेल्या एका अभ्यासाप्रमाणे मुले आणि मुली यांच्या जन्मातल्या या विषम प्रमाणाचा परिणाम म्हणून चीनमधे निदान 2.5 कोटी तरी पुरुषांना पत्नी मिळणे दुरापास्तच होणार आहे. या विचार समुहाच्या मताप्रमाणे 130 कोटी चिनी लोकसंख्येला भेडसावत असलेला हा सर्वात मोठा प्रश्न आहे.


या विषमतेचा प्रथम परिणाम समाजातील गरीब लोकांच्यावर होणार आहे. या विषमतेमुळे काय आणि कोणते, सामाजिक व लैंगिक प्रश्न पुढील काळात उभे रहाणार आहेत ते आता सांगणे सुद्धा कठीण आहे परंतु मुलींना पळवणे, त्यांना अनैतिक मार्गाला लावणे हे प्रकार वाढतील यात शंकाच नाही. कदाचित चीनच्या आजूबाजूला असलेल्या राष्ट्रांतून मुलींचा व्यापार सुरू होणे सुद्धा शक्य आहे.
महत्वाचे सामाजिक निर्णय घेताना त्याचे दूरगामी परिणाम काय होतील हे न बघता निर्णय घेण्याची चिनी अधिकार्‍यांची पद्धत आहे. त्याच प्रकारे घेतलेला 'एक कुटुंब एक मूल ' हा निर्णय आहे. मानवी अधिकार संस्थांनी या निर्णयाचा मानवी अधिकाराचे सरळ सरळ उल्लंघन म्हणून अनेक वेळा निषेध केलेला आहे. चिनी अधिकार्‍यांनी या निषेधाची कधी दखलही घेतलेली नाही.
चीनच्या अधिकृत माध्यमातून आता येणार्‍या या बातम्यांवरून हे धोरण चक्क फसले आहे व यामुळे पुढच्या काळात मोठे सामाजिक व लैंगिक प्रश्न चीनमधे उभे रहाणार आहेत हे चिनी अधिकार्‍यांनी मान्य केल्याचे मात्र स्पष्ट होते आहे.
27 जानेवारी 2010

शुक्रवार, जानेवारी २२, २०१०

इंटरनेट निर्वासित



शिनजिआंग हा चीनचा सर्वात पश्चिमेकडचा प्रांत. या प्रांताची राजधानी आहे उरमुची. उरमुची रेल्वे स्टेशनवरून पूर्वेकडे, शिआन, शांघाय, बिजिंग किंवा चेंगडू या सारख्या कोणत्याही शहराला जाणार्‍या प्रत्येक ट्रेनला, शिनजिआंग प्रांत एकदा ओलांडला की पहिल्यांदा जे स्टेशन लागते ते म्हणजे लिउयुवान. त्यामुळेच उरमुचीवरून येणारी प्रत्येक ट्रेन ही तेथून 400 कि.मी. अंतरावर असलेल्या लिऊयुवान स्टेशनवर थांबतेच. चीनच्या गान्सू प्रांतामधले हे लिउयुवान शहर भणाणणार्‍या वार्‍याचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. चीनमधल्या आंतर्राष्ट्रीय प्रवाशांना हे शहर चांगलेच माहिती असते कारण डुनहुआंगच्या प्रसिद्ध 'हजार बुद्धांच्या गुहा' बघायला येणारे प्रवासी प्रथम येथेच उतरतात. हे शहर प्राचीन सिल्क रूटवरच आहे


या लिऊयुवान शहरातल्या रेल्वे स्टेशनवर अलीकडे एक नवीनच दृष्य़ बघायला मिळते आहे. उरमुचीवरूनची कोणतीही ट्रेन येथे थांबली की काही लोकांचा एक जथ्था या स्टेशनवर उतरतो या जथ्थ्यातले बहुतांशी लोक तरूण असतात व त्यांच्या पाठीवर बॅकपॅक दिसतो. या लोकांचे लक्ष असते लिउयुवान रेल्वे स्टेशन प्लाझाच्या समोरच असलेले एक पार्लर ज्यावर मोठी पांढर्‍या रंगातली पाटी आहे. या पाटीवर लिहिलेले आहे ' ईझी कनेक्शन इंटरनेट कॅफे'. ही मंडळी आहेत शिनजियांगचे इंटरनेट निर्वासित आणि त्यांच्या पाठीवरच्या बॅकपॅकमधे असतो त्यांचा लॅपटॉप संगणक. या इंटरनेट कॅफेमधे जाण्यासाठी ही मंडळी तब्बल 13 तासाचा रेल्वे प्रवास करून लिउयुवानला येतात.





मागच्या वर्षी शिनजियांग प्रांतातील मुस्लिम धर्माचे व उघिर वंशाचे लोक व चीनच्या इतर भागातून आलेले हान वंशाचे चिनी यात वांशिक दंगली उसळल्या होत्या व200 तरी लोक मृत्युमुखी पडले होते. त्या नंतर चिनी अधिकार्‍यांनी सबंध शिनजियांग प्रांताचे इंटरनेट गेटवे बंदच करून टाकले त्याचबरोबर मोबाईल फोनवरचे SMS आणि आंतर्राष्ट्रीय फोनकॉल यावरही संपूर्ण बंदी घालण्यात आली. स्वायत्त असलेला शिनजिआंग प्रांत हा काही लहान सहान भू प्रदेश नव्हे. 1,646,900 वर्ग कि,मी एवढा याचा विस्तार आहे. एकोणिस कोटीच्या जवळपास लोक या प्रांतात रहातात. खनिज पदार्थांच्या खाणी, लोखंड व पोलाद उद्योग या सारखे अवजड उद्योग या भागात आहेत. येथून काही प्रमाणात शेती उत्पन्नही चीनमधे पाठवले जाते. भारत, अफगाणिस्तान, ताजिकीस्तान, किरगिझस्तान, कझाखस्तान, रशिया आणि मंगोलिया या देशांच्या सीमा या प्रांताला भिडलेल्या आहेत. येथे असलेल्या अनेकांचे उद्योगधंदे इंटरनेटवर अवलंबून आहेत. या अशा लोकांना लिऊयुवान शहराकडे पळ काढण्याशिवाय दुसरा मार्गच उरलेला नाही


हे इंटरनेट निर्वासित येण्यापूर्वी कॅफेमधली आपली जागा आरक्षित करूनच येतात. त्यानंतर 10/12 तास तरी ते ही खुर्ची सोडायला तयार नसतात. लिउयुवान शहरात रहाण्याची सोय असलेली हॉटेल्स अगदी कमी आहेत. त्यामुळे या निर्वासितांचे तसे हालच होतात. बहुतेक निर्वासित त्यामुळे रात्रीची गाडी पकडून परत उरमुचीला परत जातात. दर तीन चार दिवसांनी ही फेरी करावी लागत असल्याने बरेच व्यावसायिक अगदी कंटाळून गेले आहेत व ते स्वाभाविकच आहे. काही लोकांना आपण परत 1970च्या कालात गेलो आहोत असे वाटते आहे तर काही मंडळींनी आपल्या धंद्याचा प्रतिनिधी शिनजियांगच्या बाहेर ठेवला आहे.शिनजिआंगमधली परकीय गुंतवणूक व प्रवाशांपासून मिळणारे उत्पन्न यात प्रचंड घट झाली आहे तर आयात निर्यात उद्योगाची उलाढाल 40 % कमी झाली आहे.


एक माणूस मात्र या परिस्थितीवर अतिशय खुष आहे. तो म्हणजे 'ईझी कनेक्शन इंटरनेट कॅफे' चा मालक. त्याचा धंदा कधी नव्हे एवढा छान चालला आहे.
22 जानेवारी 2010


रविवार, जानेवारी १७, २०१०

तू मोठेपणी कोण होणार?


दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही एक सप्टेंबरला, चीनच्या ग्वांगझाउ(Guangzhou) शहरातल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचे नवीन वर्ष चालू झाले. या निमित्ताने तिथल्या सदर्न मेट्रोपलिस डेली या वृत्तसंस्थेने, प्राथमिक शाळेतल्या काही मुलांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीत, प्रत्येक मुलाला, मुलाखत घेणार्‍याने एक कॉमन प्रश्न विचारला. हा प्रश्न होता की “तू पुढे आयुष्यात कोण होणार?.




माहित नाही बुवा!
उत्तर देणार्‍या बहुतेक मुलांच्या भविष्याबद्दलच्या कल्पना, अपेक्षेप्रमाणेच अगदी अस्पष्ट होत्या. त्यांना आपण कोण होणार याबद्दल काहीच खात्रीलायकपणे सांगता आले नाही.

फायरमन!


पायलट!
एका मुलीने मी पायलट होणार म्हणून सांगितले तर काहींनी आपण फोटोग्राफर, पेंटर किंवा फायरमन होणार म्हणून सांगितले. यानंतर मुलाखतीसाठी आली एक छोटी मुलगी. तिला जेंव्हा मुलाखत घेणार्‍याने “तू मोठेपणी कोण होणार? हा प्रश्न विचारला तेंव्हा तिच्या उत्तराने मुलाखत घेणारा आणि स्टुडियोमधले बाकी सर्व तंत्रज्ञ, आश्चर्याने अक्षरश: विस्मित झाले.



त्या मुलीचे उत्तर होते “ मी मोठी झाले की मी एक अधिकारी होणार".
"कोणच्या प्रकारचा अधिकारी?" मुलाखतकाराचा प्रश्न
"भ्रष्ट अधिकारी, कारण भ्रष्ट अधिकार्‍यांना आयुष्य़ांत सर्व काही मिळते” मुलीचे लगेच उत्तर.
चीनमधे भ्रष्टाचाराने किती प्रचंड स्वरूप धारण केले आहे याची या उत्तरावरून सहज कल्पना येते. प्राथमिक शाळेतल्या एका मुलीला, भ्रष्टाचारी अधिकार्‍यांचे जीवनमान आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान, यातील फरक लक्षात येतो आणि भ्रष्टाचारी व्हावेसे वाटते यापेक्षा जास्त भयानक वास्तव काय असणार?
चीनमधली माध्यमे व इंटरनेटवरची संकेत स्थळे यांना या मुलाखतीबाबत, लोकांचा मोठा प्रतिसाद येतो आहे.
राजाचे नवीन कपडे या नावाची एक गोष्ट सर्वांना अत्यंत परिचित आहे, या गोष्टीतल्या राजाप्रमाणेच चीन मधल्या भ्रष्टाचार्‍याचे सत्य या चिमुरडीने बाहेर आणले आहे असे काही जणाना वाटते तर काहींचे मत असे आहे की चीनमधल्या भ्रष्टाचाराने लहान मुलांचा निरागसपणाही लोप पावण्याच्या मार्गावर जात चालला आहे. आपण पुढच्या पिढीच्या मनात, चांगल्या व्हॅल्यूज कशा रूजवणार आहोत? असा प्रश्न काहींना पडला आहे. चीनच्या अध्यक्षांना (Hu Jintao), चीनमधील सध्याच्या राजवटीला, भ्रष्टाचार हा सर्वात मोठा धोका वाटतो.
भारतातील परिस्थिती यापेक्षा काही फारशी निराळी किंवा चांगली आहे असे मला वाटत नाही. आयुष्यभर भ्रष्टाचार करून गब्बर झालेले अनेक अधिकारी निवृत्त होऊन मोठ्या मानसन्मानाने रहात असलेले आपण पहातो. अर्थात याबाबत कोणीच उघडपणे बोलत नसल्याने त्यांना संशयाचा फायदा मिळत रहातोच.
भारत आणि चीन, किंबहुना यांच्यासारख्या बहुतेक गरिब राष्ट्रांत हीच परिस्थिती आहे. आम्ही यंव केले, तंव केले अशा कितीहा बढाया ही राष्ट्रे मारत असली तरी जोपर्यंत भ्रष्टाचारावर काबू मिळवण्यात त्यांना यश येत नाही तोपर्यंत त्यांना पुढारलेले म्हणणे फारच कठिण आहे.
5 ऑगस्ट 2009


गुरुवार, जानेवारी १४, २०१०

छोटे बादशहा

"चार दिवस सासूचे" अशी एक म्हण आपल्याकडे आहे. मात्र सध्याच्या चिनी कुटुंबांत घरातला बच्चा किंवा बच्ची यांना जे VIP स्थान प्राप्त झाले आहे त्यावरून हीच म्हण या चिनी कुटुंबांसाठी तरी "चार दिवस छोट्यांचे" अशीच बदलली आहे असे म्हणावे लागते. फेंग ची (काल्पनिक नाव) हा बिजिंगमधल्या एका सधन कुटुंबातला तीन वर्षाचा एकुलता एक मुलगा आहे. घरात आई-वडील, आजी आजोबा आहेत व दुसरे आजी-आजोबा जवळच रहात आहेत. या सगळ्या नातेवाईकांत हा एकटाच छोटा मुलगा आहे. साहजिकच फेंग ची चे कमालीचे लाड होत असतात. गोळ्या, चॉकलेट, नवे कपडे आणि खेळणी, काय पाहिजे ते त्याला मिळते. त्याने नुसता शब्द टाकायचा अवकाश, ती वस्तू त्याच्यासमोर हजर होते. बिजिंगमधल्या Beijing Intelligence and Capability Kindergarten या नावाजलेल्या शाळेत तो जातो. शाळेत जाताना त्याचा थाटमाट और असतो. त्याची आजी, त्याला शाळेत पोचवायला व आणायला, शोफर चालवत असलेल्या घरच्या गाडीने येते जाते. साहजिकच फेंग ची ला सगळे जग आपल्याभोवतीच फिरते आहे असे वाटले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पण फेंग ची हा काही कोणी विशेष मुलगा नाहीये. चीनमधे त्याच्यासारखी लाखो इतर मुले आहेत ज्यांचे असेच लाड होत आहेत.
चीनमधल्या एक कुटुंब एक मूल धोरणामुळे 1980 सालापासून असे लक्षावधी फेंग ची घराघरातून वाढत आहेत. चिनी सरकार या धोरणामुळे देशातली गरीबी कशी कमी झाली आहे व राहणीमान कसे सुधारले आहे याची टिमकी सतत वाजवत असते. चिनी सरकारच्या मताप्रमाणे या धोरणाचे फलित म्हणून गेल्या 25 वर्षांत 20 कोटी कमी बालके जन्माला आली आहेत. सर्व देशाचा विचार केला तर दर कुटुंबामागे सरासरी दोन मुले आता असतात. पण शहरांचा विचार केला तर घरटी एकच मूल असते. या एक मूल धोरणाचा एक अतिशय क्लेशदायक दुष्परिणाम आता चिनी कुटुंबांच्यात दिसून येऊ लागला आहे. कोणतीही भावंडे नसलेली ही नवीन चिनी पिढी अत्यंत गर्विष्ठ व आढ्यताखोर बनत चालली आहे.
चिनी लोक या पिढीला 'चिआओ हुआंग्डी' म्हणजे छोटे बादशहा या नावाने ओळखतात. चिनी वृत्त माध्यमांतून या छोट्या बादशहांच्यावर खूप टीका होते. 25 वर्षे वयाखालील चिनी तरूणांमधले निदान 20% म्हणजे 10 कोटी चिनी तरूण तरी एकच मूल असलेल्या घरात वाढलेले आहेत. हे तरूण अत्यंत स्वयंकेंद्री, संकुचित मनोवृत्तीचे आहेत व त्यांच्यावर केलेली कोणतीही टीका त्यांना चालत नाही असे एक पत्रकार म्हणतात. ही मुले अत्यंत लाडावलेली असतात. त्यांना समाजात वागावे कसे ते कळत नाही. मागितलेली प्रत्येक गोष्ट त्यांना लगेच हवी असते व यांना जरा जरी काही झाले तरी घरातील सर्वजण आकाशपाताळ एक करतात अशीही टीका त्यांच्यावर होत असते. या तरूणांचा आत्मविश्वास दांडगा असतो व कॉस्मॉपॉलिटन असल्याने नवीन गोष्टी त्यांना सतत हव्या असतात. साहजिकच हे तरूण, उपभोक्ता उत्पादने बनवणार्‍या परदेशी कंपन्यांच्याचे फार लाडके आहेत कारण चीनमधे हीच मंडळी त्यांचे खरे गिर्‍हाईक आहेत. अमेरिकन फास्ट फूड या मुलांचे अतिशय आवडीचे असल्याने यांच्यापैकी निदान 20% तरूण तरी लठ्ठंभारती बनत चालले आहेत
या तरूणांच्यावरची सर्वच टीका योग्य आहे असे वाटत नाही यांच्या डोक्यावर मागच्या दोन पिढ्यातील नातलगांच्या अपेक्षांचे एवढे मोठे असते की वयाच्या पाचव्या किंवा सहाव्या वर्षापासून त्यांना शालेय अभ्यासक्रमात उत्कृष्ट गुण मिळवावेच लागतात. या शिवाय पियानो शिकणे, इंग्रजी संभाषण, ज्यूडो, कराटे आणि गॉल्फ या सारख्या गोष्टी शिकणे त्यांना क्रमपात्रच असते.
या मुलांसाठी असलेल्या बालशाळा सुद्धा आता खास रित्या या मुलांना शिक्षण देतात. दीड वर्षाचे मूल झाले की ते या शाळेत जाऊ लागते. या शाळेची फी सर्वसाधारण कुटुंबांच्या उत्पन्नाच्या दुप्पट तरी असते. या मुलांना गणित, शास्त्र, कला, चिनी भाषा आणि संगीत यांचे शिक्षण दिले जाते. या शिवाय या शाळा टेनिस, गॉल्फ, हे ही शिकवतात. शिस्त, स्पर्धांना तोंड कसे द्यायचे आणि वागायचे कसे? याचे खास शिक्षण मुलांना दिले जाते. मुले 3 वर्षाची होईपर्यंत बरीच शिस्तशीर बनतात असे दिसते. याच वयाला या मुलांना 1 ते 100 पर्यंत अंक म्हणता यावे लागतात.
चीनमधे इंटरनेट वापरावर खूपच बंधने आहेत पण हे सगळे छोटे बादशहा आता कॉम्प्युटर, इंटरनेट यांचा वापर अतिशय सहजपणे करतात. चीनची ही तरूण पिढी एका बाजूने चिनी सरकारच्या सततच्या ब्रेन वॉशिंगमुळे कट्टर वामपंथी बनली आहे. त्याचवेळी अमेरिकन उपभोक्ता संस्कृती, संगीत, पुस्तके याचीही ही पिढी चाहती आहे. त्यांना पाश्चात्य संगीत आवडते. अमेरिकन फास्ट फूड आवडते. अमेरिकन लेखकांची पुस्तके आवडतात. अमेरिकन फॅशनचे कपडे आवडतात. या दोन विचारसरणींच्या ओढाताणीत हे छोटे बादशहा कसा टिकाव धरतात व या विरोधाभासाला कसे तोंड देतात हे पाहण्यासारखे आहे.
14 जानेवारी 2010

मंगळवार, जानेवारी १२, २०१०

हम दो हमारा (री) एक




1978 साली चीनच्या राज्यघटनेत एक कुटुंब एक मूल हे राष्ट्राचे अधिकृत धोरण असल्याचे प्रथम नमूद करण्यात आले. तेंव्हापासून या धोरणाच्या चांगल्या व वाईट दोन्ही परिणामांबद्दल बरेच लिहिले गेले आहे. काही दिवसांपूर्वी रॉब गिफर्ड या लेखकाने लिहिलेले China Road: A Journey Into the Future of a Rising Power हे पुस्तक माझ्या वाचनात आले. या लेखकाने चीन मधल्या रूट 312 या शांघायमधून निघून पश्चिमेकडे जाणार्‍या रस्त्यावर, हिचहायकिंग करून केलेल्या आपल्या प्रवासाचे मोठे वाचनीय वर्णन केले आहे. या त्याच्या प्रवासात एका ठिकाणी बसमधे एक स्त्री डॉक्टर व तिच्या दोन सहाय्यिका या सहप्रवासी म्हणून भेटतात. त्या डॉक्टरीण बाईंशी बोलल्यावर त्याच्या हे लक्षात येते की या डॉक्टरीणबाईंच्याकडे सरकारी एक मूल धोरण राबवण्याचे काम आहे. या बाई व त्यांच्या सहाय्यिका गावोगावी फिरून कोणी बाई दुसर्‍यांदा गरोदर आहे का याचा शोध घेतात. जर कोणी अशी बाई सापडली तर अत्यंत निर्दयपणे भ्रूणहत्या करण्यात येते. जर गर्भवाढ बरीच झालेली असली तर त्या गर्भाला विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकण्यात येते. थोडक्यात म्हणजे ही डॉक्टरीणबाई देवदूत नसून एक यमदूत होती




हे वर्णन वाचल्यावर मला चिनी लोकांच्या सोशिकतेबद्दल खरोखर कमाल वाटली. आपल्याकडची आणीबाणीच्या कालातील संजय गांधींची नसबंदी मोहिम आठवली व त्याची परिणिती सरकार कोसळण्यात कशी झाली होती हे ही स्मरले. या उलट चीनमधले गरीब खेडूत व शेतकरी या प्रकारची सरकारी निर्दयता कसे सहन करत असतील याचे आश्चर्यही वाटले.




याच प्रकारच्या अत्यंत निष्ठूर आणि क्रूर वर्तनाची प्रकरणे आता जिथे दारिद्र्य किंवा गरिबी व्यापक प्रमाणात आहे अशा ठिकाणांहून बाहेर येत आहेत. ग्वांग्क्शी( Guangxi) प्रांतामधे 61 गरोदर महिलांना हॉस्पिटलमधे पकडून नेण्यात आले व विषारी इंजेक्शन देऊन गर्भहत्या केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीला आले.चीनच्या मध्यवर्ती सरकारने आता या प्रकारच्या गर्भहत्या करण्यास जरी बंदी घातली असली तरी सरकारी लक्षे पूर्ण करण्यासाठी जास्त उत्साही अधिकारी अजूनही या प्रकारची कृत्ये करतच आहेत. चीनमधे कोणत्याही तरूण किंवा तरूणीला लग्न करण्यासाठी सरकारी परवाना घ्यावा लागतो. असा परवाना नसलेली कोणतीही तरूणी जर गरोदर राहिली तर नियमाप्रमाणे ताबडतोब भ्रूणहत्या करण्यात येते. स्थानिक अधिकार्‍यांच्या बढत्या, भ्रूणहत्यांचे हे लक्ष पूर्ण करण्यावर अवलंबून असल्यामुळे, ते जरा जास्तच उत्साही असतात.



1978 मध्ये हे धोरण राबवण्यास सुरवात झाली त्यानंतर चीनमधली दरडोई जन्म संख्या कथा कादंबर्‍यात शोभेल अशा रितीने खाली आली हे सत्य आहे. परंतु आता हे सरकारच्या लक्षात येऊ लागले आहे की हे धोरण अजिबातच लोकमान्य झालेले नाही व त्याला लोकांचा प्रचंड विरोध आहे. आता हे धोरण राबवण्यास सुरवात केल्याला सुद्धा तीस वर्षे उलटून गेली आहेत चीनमधला फर्टिलिटी रेट(Fertility Rate) आता भारतीय किंवा अमेरिकन फर्टिलिटी रेटपेक्षा बराच कमी झाला आहे. त्यामुळे हे धोरण बदलावे असे अनेक तज्ञ सरकारला सुचवत आहेत.


कोणत्याही देशातला हा फर्टिलिटी रेट जर दोनच्या खाली गेला तर त्या देशातल्या लोकांचे सरासरी वय वाढू लागते. तरुणांच्या मानाने म्हातारे व काम न करू शकणारे हात वाढू लागतात. अनेक प्रगत देशात ही स्थिती आहे व हे देश यावर काय तोडगा काढावा या विचारात आहेत. तज्ञांच्या मताने चीनमधे ही परिस्थिती पुढच्या वीस वर्षांमधे येणार आहे.


भारतप्रमाणेच चीन मधेही सर्व कुटुंबाना एक तरी मुलगा हवा असतो. परंतु या एक मूल धोरणाप्रमाणे, फक्त एक मुलगी असलेली कुटुंबेही आता खूप आहेत. अशा कुटुंबाना आणखी एक मुलगा होऊ देण्यासाठीची परवानगी आता शांघायसारख्या काही शहरांच्यात देण्यात येते आहे.
चीनमधे मानवी अधिकार, मूलभूत स्वातंत्र्य यांना फारशी काहीच किंमत नाही. श्रीमंत लोक या नियमांमधून पळवाटा काढतातच. पण खेडेगावात राहणारे गोरगरीब मात्र भरडून निघतात हे सत्य नाकारता येत नाही.


12 जानेवारी 2010

रविवार, जानेवारी १०, २०१०

दडवादडवीचे उद्योग

एखादी दुर्दैवी घटना दडवून ठेवण्यात चिनी अधिकार्‍यांचा हात कोणी धरू शकणार नाही. प्रथम अशी कोणतीही घटना घडल्याचाच इन्कार करणे. ते अशक्यच झाले तर या घटनेमुळे झालेली जीवित किंवा मालमत्ता हानी कमीत कमी झाली असण्याचे सांगणे यात चिनी अधिकार्‍यांचा हातखंडा असतो. चार, पाच वर्षापूर्वी पूर्व एशिया मधे SARS या रोगाची मोठी साथ आली होती. चिनी आरोग्य अधिकार्‍यांनी कित्येक दिवस चीनमधे अशी काही साथ असल्याचेच नाकारले होते. जागतिक आरोग्य संघटनेला खरी परिस्थिती समजली तेंव्हा खूपच उशीर झाला होता व अनेक चिनी नागरिक विनाकारण मृत्युमुखी पडले होते.


चीनच्या हेबाई प्रांतामधे असलेल्या 'पुयान्ग आयर्न ऍन्ड स्टील कंपनी' या कंपनीमधे एक भट्टी उभारण्याचे काम चालू होते. हे काम चालू असताना या कंपनीची जवळच असलेली एक वायु वाहिनी फुटली व या भट्टीवर काम करत असलेल्या कामगारांना विषबाधा झाली.


ही घटना अत्यंत किरकोळ असल्याचे सांगून प्रथम या कंपनीच्या अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मागच्या आठवड्यात सोमवारी ही घटना घडली. मंगळवारी या घटनेत 7 कामगारांचा मृत्यु झाल्याचे कंपनी अधिकार्‍यांनी मान्य केले. या नंतर पोलिसानी जेंव्हा या घटनेची चौकशी करण्यास सुरवात केली तेंव्हा गुरवारी कंपनी अधिकार्‍यांनी या घटनेत 21 कंत्राटी कामगार मृत्युमुखी पडल्याचे अखेरीस मान्य केले व आपण ही घटना दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला हे ही मान्य केले. आता पोलिसांनी या कंपनीतील सहायक व्यवस्थापकाला अटक केली व इतर दोन अधिकार्‍यांना घरी अडकवून ठेवले आहे. Nanjing Sanye utility installment company ही कंपनी ही भट्टी उभारण्याचे कंत्राटी काम करत होती.


चीनमधे एकूणच, उद्योगांमधे होणार्‍या अपघातांचे प्रमाण अतिशय जास्त आहे. याच आठवड्याचे उदाहरण द्यायचे तर गुरवारी गान्सू प्रांतामधे चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन च्या एका रसायने बनवणार्‍या कारखान्यात प्रचंड स्फोट झाला. हा स्फोट 20 किलोमीटरवरून सुद्धा दिसला होता. या स्फोटात एक कामगार मृत्युमुखी पडला. याच दिवशी दक्षिण ग्वॅन्गडॉन्ग प्रांतातल्या एका विद्युत उपकरणांच्या कारखान्यात काम करणार्‍या 150 कामगारांना, पार्‍याची (Mercury) विषबाधा झाल्याचे आढळून आले आहे. ही विषबाधा या कारखान्यात सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे झाली आहे. चीनचे औद्योगिक सुरक्षा या विषयातले रेकॉर्ड अतिशय खराब आहे यात शंकाच नाही. दरवर्षी हजारो कामगार खाणी, कारखाने व बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जागा येथे आपला प्राण गमावतात.



उद्योग, कारखाने यात अपघात तर जगातील सर्व देशातच होत असतात. चीन मधे हे अपघात दडवून ठेवण्याचा जो प्रयत्न केला जातो त्यामुळे कदाचित त्या वेळेस त्या देशाची छबी चांगली रहण्यास मदत होत असेल. परंतु अशा घटनेत कोणाचा हलगर्जीपण झाला? काय सुधारणा करता येतील? या गोष्टी प्रकाशात येत नाहीत व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत.
10 जानेवारी 2010

बुधवार, जानेवारी ०६, २०१०

पिवळे प्रदुषण


पीत नदी (Yellow River) ही चीनमधली दुसर्‍या क्रमांकाची सर्वात लांबवर वहात जाणारी नदी आहे. तिबेटच्या उत्तरेला असलेल्या चिंघाई प्रांतातल्या बायेनहार पर्वतात ती उगम पावते व 5464 किलोमीटरचा पूर्व दिशेला प्रवास करून समुद्राला मिळते.


या नदीचे खोरे 7,45000 वर्ग किलोमीटरचे असून या खोर्‍यात अंदाजे 12 कोटी लोक रहातात. या सगळ्या वर्णनावरून, ही नदी चीनच्या दृष्टीने किती महत्वाची आहे हे लक्षात येते. ही नदी प्रचंड प्रमाणात गाळ वाहून नेत असल्याने या नदीच्या पाण्याचा रंग नेहमीच मातकट दिसतो व या रंगामुळेच या नदीला पीत नदी असे नाव पडले आहे.






चीनमधल्या नद्या या जगामधल्या सर्वात जास्त प्रदूषण असलेल्या नद्या आहेत असे मानले जाते. पीत नदीमधले सर्वसाधारण प्रदूषण याला अपवाद नाही. शान्शी प्रांतामधे, पीत नदीला वायहे ही नदी येऊन मिळते. वायहे नदीचीच चिशुई ही एक उपनदी आहे. चिशुई नदीजवळून, चायना पेट्रोलियम कॉर्पोरेशन या तेल कंपनीची लांझाऊ- चेंगशा या स्थानांना जोडणारी एक तेल वाहिनी जाते. मागच्या बुधवारी ही तेल वाहिनी चिशुई नदीजवळ फुटली व दीड लाख लिटर डिझेल तेल चिशुई नदीच्या पाण्यात मिसळले. या डिझेल तेलाचा तवंग नदीच्या पाण्यावर 13 मैल लांब पसरला. चिशुई नदीमधून साहजिकच हे तेलमिश्रित पाणी वायहे नदीमधे आले. आपत्कालीन परिस्थिती म्हणून जवळपास 700 कामगारांनी नदीला कालवे खोदणे, 27 तरंगणारे ऑइल स्लिक ब्लॉकर्स नदीपात्रात सोडणे वगैरे कामे रात्रभरात केली. यामुळे पीत नदीत हे तेल येणार नाही असे वाटले होते. परंतु त्याचा उपयोग झालेला दिसत नाही.





पीत नदीचे पाणी आधीच अतिशय प्रदुषित आहे त्यात हे तेल मिसळले गेल्याने पीत नदीचे पाणी पिण्यास अयोग्य म्हणून चिनी सरकारने घोषित केले आहे. शान्शी प्रांताबरोबर हेनान प्रांतातही आता पीत नदीचे पाणी पिण्यास अयोग्य घोषित करण्यात आले आहे. झेंगझॉंग व कायफेंग या दोन शहरांची वस्ती 35 लाख तरी आहे. या शहरांचा पाणीपुरवठा पीत नदीवरच अवलंबून असल्याने या शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. जवळच असलेल्या सानमेन्शिया या धरणात असलेल्या पाण्यावर पण आता हा तेलाचा तवंग पसरला आहे. ज्या ठिकाणी तेलवाहिनी फुटली तेथून 33 किलोमीटर अंतरावर सुद्धा पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे.




पीत नदीचे हे प्रदुषण खूप मोठ्या प्रमाणावर जनसामान्यांचे हाल करणार आहे हे नक्की. चीनमधल्या जनतेवरच्या कोणत्याही संकटाने अतिशय मोठे स्वरूप धारण केल्याशिवाय चिनी प्रसार माध्यमे त्याच्या बातम्या देत नाहीत. आता सर्व प्रसार माध्यमांनी या तेल गळतीच्या बातम्या दिलेल्या असल्याने या संकटाचे भयावह स्वरूप आंतर्राष्ट्रीय माध्यमांपर्यंत पोचू शकले आहे. व या वरूनच त्याचे स्वरूप लक्षात येऊ शकते.


5 जानेवारी 2010

मंगळवार, जानेवारी ०५, २०१०

भय इथले संपत नाही !

साधारण एका महिन्यापूर्वी, चीनच्या हूनान प्रांतातल्या एका गावातल्या 1300 मुलांना, रक्तात शिशाचे प्रमाण जास्त झाल्याने, विषबाधा झाली होती. त्या गावात असलेल्या एका मॅन्गनीज शुद्धीकरण कारखान्यामुळे ही विषबाधा झाली होती असे आढळल्यावर, हा कारखाना बंद करण्यात आला होता
 
या घटनेला महिना व्हायच्या आतच, चीनमधील अग्नेय दिशेला असलेल्या फुजियान प्रांतातल्या, लोंजयान शहराजवळच्या, जिओयांग गावातल्या 121 मुलांना अशीच विषबाधा, रक्तात शिशाचे प्रमाण आधिक असल्याने झाली आहे. या खेपेस ही विषबाधा या गावामधल्या ‘हुचिआंग बॅटरी फॅक्टरी’ (Huaqiang Battery Factory) मुळे झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. विषबाधा झाल्याचे कळल्यावर गावकरी संतप्त झाले व त्यांनी रास्ता रोको आंदोलन व निदर्शने केली. गावातील सर्व दुकानांनी कडकडीत हरताळ पाळला. हे झाल्यावर तेथील जिल्हा अधिकारी जागृत झाले व त्यांनी ही फॅक्टरी बंद केली आहे. ही फॅक्टरी सरकारने बंद केली नाही तर आपण गाव सोडून जाऊ अशी धमकी सर्व गावकर्‍यांनी  अधिकार्‍यांना दिली आहे.या फॅक्टरीच्या जवळपासच्या गांवामधल्या शाळांमधली उपस्थिती पूर्ण रोडावली आहे
 
सरकारने या भागातल्या सर्व 14 वर्षांखालच्या मुलांची रक्त तपासणी मोफत करून देण्याचे मान्य केले आहे. विषबाधा झालेल्या मुलांवर सरकारने ताबडतोब सुरू करावेत असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. गेल्या तीन महिन्यात झालेली ही तिसरी घटना आहे. जलद गतीने, नियोजन न करता आणि प्रदुषण व पर्यावरणाची हानी याकडे काटेकोरपणे लक्ष न देता, केलेल्या उद्योगीकरणाचे किती भयानक दुष्परिणाम होऊ शकतात याच्या, या तिन्ही घटना साक्षीदार आहेत. पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी सर्व प्रगत राष्ट्रांना, अशा प्रकारचे प्रदुषण निर्माण करू शकणार्‍या उद्योगधंदे, त्यांच्या देशात चालवण्यातले धोके लक्षात आले व त्यांनी सर्व प्रदुषणकारी उद्योग विकसनशील देशांमधे हलवण्याचे धोरण स्वीकारले. नवीन उद्योगधंद्यांना मुक्त वाव देण्याचे चिनी सरकारचे धोरण असल्याने, असे अनेक उद्योग चीन मधे आले. या उद्योगधंद्यांना परवाने देताना पर्यावरण, प्रदुषण या सारख्या बाबींची पूर्तता, फक्त कागदोपत्रीच झाली असावी. प्रत्यक्षात अधिकार्‍यांचे हात ओले करून आपल्याला पाहिजे तशी मनमानी या उद्योगधंद्यांनी केली असावी. चीन मधले उद्योगीकरण आता इतके बेसुमार वाढले आहे की त्यामुळे त्या देशाच्या पर्यावरणाची होणारी हानी वाढत चालली आहे. या पर्यावरण हानीनेच चिनी नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका संभवतो आहे. 28 सप्टेंबर 2009