शुक्रवार, नोव्हेंबर ०५, २०१०

खेकडे वाटपाचे आधुनिक यंत्र

1950 किंवा 1960 च्या दशकात मुंबईला चर्चगेटच्या समोर जे एरॉस नावाचे चित्रपटगृह आहे तिथे कोका कोला कंपनीने एक मशिन बसवले होते. त्या यंत्रात 4 आण्यांचे किंवा 25 पैशांचे नाणे टाकले की खालच्या बाजूला असलेल्या एका कप्यात थंडगार कोका कोलाची एक काचेची बाटली येऊन पडत असे. कोणत्याही विक्रेत्याच्या हजेरीशिवाय पेये किंवा खाद्यपदार्थ तुमच्या हातात देऊ शकणारे या यंत्राची त्या वेळी सगळ्यानाच मोठी मजा वाटायची. अर्थात त्या काळात 4 आण्याचे नाणे ही तशी बरीच मोठी रक्कम असल्याने येता जाता ते यंत्र वापरणे शक्य नव्हते पण कधीतरी गंमत म्हणून ते यंत्र मी वापरलेले होते.
पुढे परदेशात अशा प्रकारची अनेक यंत्रे मी बघितली. सिंगापूर मधे आमच्या सदनिका संकुलात ब्रेड, स्नॅक्स किंवा पेयांचे वाटप करतील अशी 3/4 यंत्रे बसवलेली आहेत. त्यामुळे वाटप यंत्रे ही माझ्यासाठी तरी काही नवलाची गोष्ट राहिलेली नाही. अरब अमिरातीमधे सोने अशा मशि न्समधून मिळते किंवा पॅरिस मधे पर्फ्युम्सच्या बाटल्या अशा यंत्रातून मिळतात असे मी वाचले आहे. सोने किंवा पर्फ्युम्स खरेदी हे माझे प्रांत नसल्यामुळे मला यातला अनुभव नाही हे मला मान्य करायलाच पाहिजे.



मात्र चीन मधल्या नानजिंग शहरात बसवलेल्या एका नवीन वाटप यंत्राबद्दलची माहिती मी परवा जेंव्हा वाचली तेंव्हा मात्र मी आश्चर्याने थक्क झालो.नानजिंग शहरातल्या मेट्रोच्या लाइन 1 वरच्या शिन्जेइकाऊ (Xinjiekou) या स्टेशनवर हे वाटप यंत्र बसवले आहे. या स्टेशनवरून डेउआनपान हे एक्झिट जे घेतात त्यांना हे यंत्र दिसते. या यंत्रावरून कसले वाटप होते हे कळल्यावर त्यावर विश्वास बसणेही कठिण आहे. पण छायाचित्रे बघितल्यावर विश्वास ठेवायलाच लागतो. या यंत्रातून पायावर केस असलेले जिवंत खेकडे (Hairy Crab) वितरित केले जातात
 
या वर्षी म्हणे चीनमधे दोन गोष्टींचे अमाप पीक आले आहे. एक तर पिवळ्या रंगाची chrysanthemums ही फुले व रसरशीत व पोसलेले केसाळ खेकडे. खेकड्यांच्या विपुल उपलब्धतेमुळे एका कंपनीने हे खेकडे यंत्राद्वारे विकण्यास सुरवात केली आहे. 1 ऑक्टोबरला या यंत्रावरून खेकडे विक्री सुरू झाली. पहिल्यांदा या यंत्राकडे नावीन्य म्हणून लोक बघत होते. या नाविन्याचे प्रथम संशयात रूपांतर झाले व पहिल्या दिवशी फक्त 1 खेकडा विकला गेला. 1 महिन्यानंतर रोज 200 खेकडे तरी विकले जाऊ लागले आहेत
 
या यंत्रात 5 ओळींच्यामधे खेकडे ठेवलेले असतात. खेकडे एका प्लॅस्टिकच्या आवरणात पॅक केलेले असल्याने पैसे ताकले की सुलभपणे खालच्या कप्यात येऊन पडतात. 10युआन पासून 50 युआन पर्यंत खेकड्यांच्या किंमती आहेत. या शिवाय खेकड्यांपासून बनवलेल्या व्हिनिगरच्या बाटल्याही या यंत्रातून मिळतात
 
चाय चुन ही महिला म्हणते की बाजार भावापेक्षा हे खेकडे नक्कीच स्वस्त आहेत. मी काल 2 खेकडे विकत घेतले होते. ते चांगल्या प्रतीचे असल्याने आज 8 घेतले आहेत. बरेचसे नानजिंगचे नागरिक या मशिनचे फोटो काढण्यासाठीचे येथे येत आहेत.
हे मशिन यशस्वी ठरले तर नंतर कोणते जिवंत प्राणी असल्या मशिन्समधून चीनमधे मिळू लागतील याचा अंदाज बांधणे केवळ अशक्य आहे.
5 ऑक्टोबर 2010