सोमवार, डिसेंबर १३, २०१०

व्हिक्टोरियन इंग्लंड व आधुनिक चीन

आपल्यापैकी बहुतेकांनी चार्ल्स डिकन्स या प्रसिद्ध लेखकाच्या कादंबर्‍या किंवा किमान त्यांची भाषांतरे नक्की वाचली असतील. डेव्हिड कॉपरफील्ड, ऑलिव्हर ट्विस्ट, वगैरेसारख्या त्याने लिहिलेल्या कादंबर्‍या इंग्रजी साहित्यात अजरामर झालेल्या आहेत. या कादंबर्‍यांच्यात व्हिक्टोरियन इंग्लंड मधल्या प्रायव्हेट शाळांचे जे चित्रण त्याने केले आहे त्याला खरोखर तोड नाही. या शाळांमधील शिक्षणपद्धती, मुलांना देण्यात येणारी वागणूक व शिक्षा याचे इतके भावनास्पर्शी वर्णन डिकन्सने केलेले आहे की या शाळांबद्दल आत्यंतिक चीड वाचकाच्या मनात दाटून आल्याशिवाय रहात नाही.
चीन मधल्या शान्शी प्रांतामधल्या हानबिन जिल्ह्यातल्या आन्कान्ग या शहरामध्ये काही खेडूतांना नुकतीच जी वागणूक दिली गेली त्याबद्दलच्या बातम्या वाचताना डिकन्सच्या व्हिक्टोरियन इंग्लन्ड मधल्या शाळांच्या मधले वर्णन तर आपण वाचत नाही ना? असे मला सारखे वाटत राहिले
या आन्कान्ग शहराच्या जवळ एक एक्सप्रेस वे किंवा जलदगती मार्ग बांधण्याचे काम चालू आहे. हा रस्ता बांधण्यासाठी काही शेतकर्‍यांच्या जमिनी स्थानिक प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. आपल्या शेतजमिनी घेऊन त्याचा पुरेसा मोबदला आपल्याला मिळालेला नाही असे या शेतकर्‍यांना वाटत असल्याने त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन पुकारले. 50 खेडुतांचा एक जमाव या काम चालू असलेल्या रस्त्यावर जमला व त्यांनी ठेकेदाराला काम पुढे चालू करण्यास प्रतिबंध केला व रस्त्यावरून जाणारी वाहने थांबवली. या सत्याग्रहामुळे थोड्याच वेळात तेथे पोलिस आले व त्यांनी शेतकर्‍यांना आपला एक प्रतिनिधी बोलणी करण्यासाठी पाठवण्यास सांगितले व व्हिडियो कॅमेर्‍याने त्या शेतकर्‍यांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे हा जमाव अधिकच चिडला व त्यांनी पोलिसांशी धक्काबुक्की करून त्यांना चित्रीकरण करण्यास मनाई केली. पोलिसांच्या मते त्यांनी कॅमेर्‍याचे नुकसानही केले. परिस्थिती हाताबाहेर जाते आहे हे बघितल्यावर पोलिसांनी जास्त कुमक मागवली व अखेरीस 9 ग्रामस्थांना अटक केली

2 नोव्हेंबरला हे 9 ग्रामस्थ व इतर 8 जण यांच्यावर खटला चालवण्यासाठी आन्कान्ग प्रशासनाचे गव्हर्नर व इतर अधिकार्‍यांनी, सर्व नागरिकांची एक खुली सभा घेतली. या सभेत या 17 आंदोलकांवर खटला वगैरे काही न चालवता त्यांना डिकन्सच्या शाळांमधे शोभेल अशी शिक्षा देण्यात आली. या सर्व 17 जणांना जमलेल्या प्रचंड गर्दीसमोर उभे करण्यात आले. त्यांच्या गळ्यात त्यांचे नाव/पत्ता व त्यांचा गुन्हा काय? हे सांगणारा एक मोठा पांढरा बोर्ड अडकवण्यात आला व त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जमलेल्या जमावाची सहानुभूती कोणाकडे होती? याची कल्पना या प्रसंगाच्या फोटोमधे असलेल्या जमावातील लोकांच्या चेहर्‍यावरचे भाव बघून चांगलीच येते

स्थानिक प्रशासनाने हातात घेतलेल्या कोणत्याही प्रकल्पाला कोणीही कोणत्याही कारणासाठी विरोध करू नये म्हणून Ankang Municipal Public Security Bureau deputy director आणि deputy head of Hanbin District Government असलेला Yang Peng याने एक धमकीवजा नोटिस आता काढली आहे. या नोटिसीमधे म्हटले आहे की " कोणत्याही बांधकामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे किंवा बांधकामावर दंगा धोपा करणे, बांधकाम मजुरांना धमक्या देणे असे प्रकार घडल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल. अशा बांधकामांना पाणी व वीज न पुरवणे हा ही गुन्हा समजण्यात येईल. "
आंदोलकांना बाजू मांडण्याची संधी सुद्धा न देता असली अपमानास्पद शिक्षा देण्याचा हा प्रकार डिकन्सच्या कादंबर्‍यांच्यात शोभणाराच होता. त्या बिचार्‍या खेडुतांची गार्‍हाणी तर कोणी ऐकलीच नाहीत व त्यावर त्यांना असली अपमानास्पद शिक्षा मात्र देण्यात आली

भारतात असला प्रकार कोणी करण्याचा नुसता प्रयत्न जरी कोणी केला तरी त्यावरून केवढा गदारोळ उठेल त्याची कल्पनाही करवत नाही.
अर्थात एकाधिकारशाही व लोकशाही यांच्यामधे हा फरक आहेच. या प्रसंगाचे फोटो मात्र बरेच काही सांगून जातात.
13 डिसेंबर 2010