बुधवार, ऑक्टोबर १३, २०१०

चिनी चंद्रयानाचे उड्डाण

आपण सगळ्यांनीच ही बातमी वाचली असेल की चीनने आपले Chang'e II हे चंद्रयान 1 ऑक्टोबरला 18:59:57 या वेळेला आपल्या Long March II F 18 या रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात पाठवले.
 
या उड्डाणानंतर चीनमधल्या नेटईझ( Netease) या वृत्तसंस्थेने या उड्डाणामधे एक जबाबदारीची भूमिका बजावत असलेल्या Long March rocket technology division च्या संचालिका लिऊ यानमिन यांची एक मुलाखत टीव्हीवर घेतली. या मुलाखतीत या चंद्रयानाच्या उड्डाणाबद्दल अनेक प्रश्न लिऊ यानमिन यांना विचारले गेले. अमेरिका, भारत हे देश आपली रॉकेट उड्डाणे, साधारण समुद्र किनार्‍यावर असलेल्या ठिकाणांहून करतात. या मागची कल्पना अशी आहे की जर या रॉकेटचे काही भाग जमिनीवर कोसळणार असतील तर ते समुद्रावर पडावेत. जेणेकरून जीवित किंवा वित्त हानी होणार नाही. या दोन्ही गोष्टींना चिनी सरकार फारसे महत्व देते असे वाटत नाही कारण चीनची सर्व रॉकेट उड्डाणे त्यांच्या देशाच्या आतील भागातूनच होतात. 1 ऑक्टोबरचे हे चंद्रयान, चीनने सिचुआन प्रांतातल्या शिचांग (Xichang) या शहरापासून 40 मैल दूर असलेल्या आपल्या रॉकेट लॉन्च स्टेशनवरून सोडले होते. या स्थानाच्या जवळच अनेक खेडेगावे आहेत व जळणारे रॉकेटचे भाग जमिनीवर पडल्याने येथे जीवित व वित्त हानी झाल्याचा पूर्वेतिहास आहे

या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर नेटईझ च्या मुलाखत घेणार्‍याने श्रीमती लिऊ यानमिन यांना मुद्दाम काही प्रश्न विचारले. यापैकी पहिला प्रश्न असा होता की या उड्डाणासाठी जवळपास रहाणार्‍या लोकांना हलवले होते का? लिऊ बाईंनी या प्रश्नाचे उत्तर देताना हे मान्य केले की 2.5 किलोमीटर परिसरात रहाणार्‍या अंदाजे 2000 खेडूतांना हलवण्यात आले होते. याचे कारण असे की 300 टन वजनाचे हे रॉकेट जेंव्हा उड्डाण करते तेंव्हा प्रचंड ध्वनी व हादरे निर्माण होतात तसेच काही विपरित प्रकार घडण्याची ही शक्यता असते. त्यामुळे या लोकांना आम्ही हलवले. यानंतर नेटईझच्या वार्ताहराने विचारले की उड्डाणानंतर किती वेळ रॉकेटमधून जळणारे भाग जमिनीवर पडण्याची शक्यता असते? याला लिऊ बाईंचे उत्तर होते 130 सेकंद. या नंतर त्यांना असे विचारले गेले की या जळणार्‍या भागांमुळे हानी होऊ नये म्हणून काय काळजी घेतली जाते? या प्रश्नाचे उत्तर देताना लिऊ बाईंनी सांगितले की आम्ही सर्व ती काळजी घेतो यासाठी आमच्याकडे प्रशिक्षित व्यावसायिक लोक आहेत. म्हणजे या मुलाखतीवरून तरी असे दिसत होते की सर्व आलबेल आहे

प्रत्यक्षात काय घडले ते पाहूया. 1 ऑक्टोबरच्या रात्री जिआंगशी प्रांतातल्या सुईचुआन काऊंटी मधल्या दोन खेडेगावातल्या लोकांना मोठे गडगडाटाचे आवाज ऐकू आले. त्यांना प्रथम धरणीकंप झाला असावा असे वाटले. परंतु नंतर असे आढळले की रॉकेटच्या नाकावर जेथे चंद्रयान बसवलेले होते त्याच्या भोवती असणारे संरक्षक कवचाचे मोठे तुकडे या गावांच्यात येऊन पडले होते.  

या शिवाय गुईझाऊ प्रांतातल्या झेनयुआन काऊंटीमधल्या एका खेडेगावात मुख्य रॉकेटचा एक मोठा तुकडा पडलेला आढळला. तर जिन्शा काऊंटी मधल्या एका गावात व सिचुआन प्रांतातल्या गुलिन काऊंटी मधल्या एका गावात बूस्टर रॉकेट्स सापडली. या सर्व गावकर्‍यांचे नशीब जोरावरच होते असे म्हणले पाहिजे कारण जीवित हानी तर झाली नाहीच पण वित्त हानीही अगदी किरकोळ झाली. हे सर्व भाग उडाणाच्या बर्‍याच नंतर खाली पडले होते.अर्थात ज्या अवकाश संशोधन संस्थेने हे रॉकेट अवकाशात पाठवले त्यांनी या खेडूतांची साधी क्षमा सुद्धा मागितली नाही हा भाग निराळा

वर निर्देश केलेल्या मुलाखतीत, या लिऊ बाईंना भारताच्या चंद्रयानाबद्दल एक प्रश्न विचारला गेला. परंतु भारताच्या रॉकेट्सची खात्री देता येत नाही. ती अवकाशात स्थिर रहात नाहीत व त्यांची उपग्रह वाहून नेण्याची क्षमता चिनी रॉकेट्स पेक्षा फारच कमी असल्याने भारताच्या अवकाश कार्यक्रमा बद्दल काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.
रॉकेटचे हे भाग दाट वस्ती असलेल्या एखाद्या भागावर पडले असते तर काय झाले असते हा विचार करण्यातही अर्थ नाही. रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची जागा शोधताना हे असे काही घडू शकते याला बहुदा काही महत्वच दिले गेलेले नाही.
13 ऑक्टोबर 2010

1 टिप्पणी:

sharayu म्हणाले...

भारतीय चंद्रयानाचा मार्ग वेळखाऊ असला तरी त्याच्याकडून कमी उर्जा वापरली जाते. याचे कारण उर्जेची उधळपट्टी टाळणे हे आहे.