रविवार, जानेवारी १०, २०१०

दडवादडवीचे उद्योग

एखादी दुर्दैवी घटना दडवून ठेवण्यात चिनी अधिकार्‍यांचा हात कोणी धरू शकणार नाही. प्रथम अशी कोणतीही घटना घडल्याचाच इन्कार करणे. ते अशक्यच झाले तर या घटनेमुळे झालेली जीवित किंवा मालमत्ता हानी कमीत कमी झाली असण्याचे सांगणे यात चिनी अधिकार्‍यांचा हातखंडा असतो. चार, पाच वर्षापूर्वी पूर्व एशिया मधे SARS या रोगाची मोठी साथ आली होती. चिनी आरोग्य अधिकार्‍यांनी कित्येक दिवस चीनमधे अशी काही साथ असल्याचेच नाकारले होते. जागतिक आरोग्य संघटनेला खरी परिस्थिती समजली तेंव्हा खूपच उशीर झाला होता व अनेक चिनी नागरिक विनाकारण मृत्युमुखी पडले होते.


चीनच्या हेबाई प्रांतामधे असलेल्या 'पुयान्ग आयर्न ऍन्ड स्टील कंपनी' या कंपनीमधे एक भट्टी उभारण्याचे काम चालू होते. हे काम चालू असताना या कंपनीची जवळच असलेली एक वायु वाहिनी फुटली व या भट्टीवर काम करत असलेल्या कामगारांना विषबाधा झाली.


ही घटना अत्यंत किरकोळ असल्याचे सांगून प्रथम या कंपनीच्या अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मागच्या आठवड्यात सोमवारी ही घटना घडली. मंगळवारी या घटनेत 7 कामगारांचा मृत्यु झाल्याचे कंपनी अधिकार्‍यांनी मान्य केले. या नंतर पोलिसानी जेंव्हा या घटनेची चौकशी करण्यास सुरवात केली तेंव्हा गुरवारी कंपनी अधिकार्‍यांनी या घटनेत 21 कंत्राटी कामगार मृत्युमुखी पडल्याचे अखेरीस मान्य केले व आपण ही घटना दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला हे ही मान्य केले. आता पोलिसांनी या कंपनीतील सहायक व्यवस्थापकाला अटक केली व इतर दोन अधिकार्‍यांना घरी अडकवून ठेवले आहे. Nanjing Sanye utility installment company ही कंपनी ही भट्टी उभारण्याचे कंत्राटी काम करत होती.


चीनमधे एकूणच, उद्योगांमधे होणार्‍या अपघातांचे प्रमाण अतिशय जास्त आहे. याच आठवड्याचे उदाहरण द्यायचे तर गुरवारी गान्सू प्रांतामधे चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन च्या एका रसायने बनवणार्‍या कारखान्यात प्रचंड स्फोट झाला. हा स्फोट 20 किलोमीटरवरून सुद्धा दिसला होता. या स्फोटात एक कामगार मृत्युमुखी पडला. याच दिवशी दक्षिण ग्वॅन्गडॉन्ग प्रांतातल्या एका विद्युत उपकरणांच्या कारखान्यात काम करणार्‍या 150 कामगारांना, पार्‍याची (Mercury) विषबाधा झाल्याचे आढळून आले आहे. ही विषबाधा या कारखान्यात सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे झाली आहे. चीनचे औद्योगिक सुरक्षा या विषयातले रेकॉर्ड अतिशय खराब आहे यात शंकाच नाही. दरवर्षी हजारो कामगार खाणी, कारखाने व बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जागा येथे आपला प्राण गमावतात.



उद्योग, कारखाने यात अपघात तर जगातील सर्व देशातच होत असतात. चीन मधे हे अपघात दडवून ठेवण्याचा जो प्रयत्न केला जातो त्यामुळे कदाचित त्या वेळेस त्या देशाची छबी चांगली रहण्यास मदत होत असेल. परंतु अशा घटनेत कोणाचा हलगर्जीपण झाला? काय सुधारणा करता येतील? या गोष्टी प्रकाशात येत नाहीत व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत.
10 जानेवारी 2010

२ टिप्पण्या:

विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे होत असेलतर त्यामागे फक्त देशाची छबी खराब होऊ नये हेच कारण असणार
बाकी देश हि अशा गोष्टी लपवून ठेवण्याचाच जादातर प्रयत्न करत असतात
असो माहितीबद्दल धन्यवाद

Naniwadekar म्हणाले...

> उद्योग, कारखाने यात अपघात तर जगातील सर्व देशातच होत असतात. चीन मधे हे अपघात दडवून ठेवण्याचा जो प्रयत्न ...
>---

माओ त्से तुंगला माणसांच्या प्राणाविषयी काळजी नव्हती, आणि एकूणच आशिया-आफ़्रिकेत या बाबीला कमी महत्त्व आहे. रस्त्यावर अपघात होऊन तिथे रुग्णवाहिका पोचू न शकल्यास किंवा एखादा भटक्या जंगलात हरवल्यास युरोप-अमेरिकेत शोधासाठी हेलिकॉप्टर सर्रास वापरतात. पण अर्थशास्त्रातलं काही एक कळत नसूनही मला प्रश्न पडतो की असा पैसा फेकल्यामुळे तर अमेरिका कर्ज़बाज़ारी झालेली नाही?

चीनमधली प्रत्येक ज़ोडप्याला एकच अपत्य ही योजना खरच राबवल्या ज़ाते आहे का, याविषयीदेखील शंका आहे. आणि त्यांची खरी लोकसंख्या अधिकृत आकड्यापेक्षा जास्त असू शकेल.

- नानिवडेकर