बुधवार, एप्रिल ०७, २०१०

सरकारी गुंड सेना चेनगुआन (Chengguan)

मार्च महिन्याच्या 26 आणि 27 तारखेला, थायलंड, ब्रम्हदेश व लाओस या देशांच्या सीमांना लागून असलेल्या चीनमधल्या युनान प्रांताची राजधानी कुनमिंग येथे, रात्रीच्या वेळी मोठे दंगे उसळले. हे दंगे रस्त्यावरचे पथारीवाले, फेरीवाले आणि कायदा व सुव्यवस्था अधिकारी यांच्यामधे झाले होते. भारताप्रमाणेच चीनमध्येही या प्रकारचे दंगे बर्‍याच वेळा होतात व या बातमीला काही फार महत्वाची बातमी असे म्हणता आले नसते. परंतु हे दंगे पथारीवाले, फेरीवाले आणि पोलिस यांच्यात न होता चेनगुआन या दलाच्या जवानांबरोबर झाले होते हे कळल्यावर या बातमीला एक नवीनच महत्व प्राप्त झाले. कुनमिंग मधल्या फेरीवाल्यांमधे अशी अफवा पसरली होती की चेनगुआनच्या जवानांनी एका फेरीवाल्याला बेदम मारहाण केली व त्यातच त्या फेरीवाल्याचा मृत्यू झाला. हे समजताच फेरीवाले भडकले व त्यांनी दंगा करण्यास सुरुवात केली; दहा सरकारी वाहने जाळण्यात आली व अनेक लोक जखमी झाले.
चेनगुआन हे City Administration and Law Enforcement Bureau या दलाचे संक्षिप्त चिनी नाव आहे. हे दल चीनमधल्या बहुतेक प्रमुख शहरांच्यात कार्यरत असते. या दलाला पोलिस दलाचा लांबचा भाऊ म्हटले तरी चालेल. या दलाचे अधिकृत कार्य, शहरांच्यातील रस्त्यावर विक्री करणार्‍या व अनधिकृत असलेल्या फेरीवाल्यांची तिथून हकालपट्टी करणे व ज्या इमारती पाडण्याबद्दल सरकारी आदेश निघेल, त्या इमारती, भुईसपाट होत आहेत की नाही यावर देखरेख करणे, हे आहे. प्रत्यक्षात या दलाचे जवान सरकारी गुंड म्हणूनच ओळखले जातात. धाकटदपशा व गुंडगिरी याबद्दल हे जवान चीनमधे प्रसिद्ध आहेत.


कुनमिंगमधे कोणा फेरीवाल्याचा मृत्यू प्रत्यक्षात झालेला नव्हता हे जरी खरे असले तरी चेनगुआन दलाचे जवान अशा प्रकारच्या प्रकरणांबाबत प्रसिद्ध आहेत. 2008 च्या जानेवारी महिन्यात चीनच्या मध्यवर्ती भागातील हुबेई प्रांतातील काही खेडुतांनी त्यांच्या खेड्याजवळचा कचरा डेपो हलवावा म्हणून आंदोलन केले. या खेडुतांचे आंदोलन बंद पाडण्यासाठी, चेनगुआनचे जवान त्यांना मारहाण करत असल्याचे शूटिंग एका माणसाने केले. यामुळे चिडून चेनगुआनच्या जवानांनी या माणसाला इतकी मारहाण केली की तो मरणच पावला. जुलै महिन्यात शांघाय शहरातल्या एका फेरीवाल्याचा मेंदू मारहाणीमुळे निकामी झाला होता तर ऑक्टोबर महिन्यात बिजिंग मधल्या एका माणसाला तो त्याची मोटर सायकल अनधिकृतपणे टॅक्सी म्हणून वापरत असल्याच्या आरोपावरून चेनगुआनच्या जवानांनी बेदम मारहाण केली त त्यात त्याचा मृत्यू झाला.
नोव्हेंबर महिन्यात, सिचुआन प्रांतातल्या एका महिलेच्या घरात चेनगुआनचे गुंड घुसले व सरकारी आदेशाप्रमाणे हे घर पाडावयाचे असल्याने त्या महिलेला घराच्या बाहेर काढू लागले. त्या महिलेने स्वत:ला पेटवून घेतले व त्यातच तिचा मृत्यू झाला. मागच्या वर्षीच्या मे महिन्यात नानजिंग शहरातल्या शेकडो कॉलेज विद्यार्थ्यांनी आपल्या एका सहाध्यायीला मारहाण केली म्हणून चेनगुआन विरुद्ध निदर्शने केली होती तर जून महिन्यात ग्वांगडॉंग मधल्या दंगलखोरांनी चेनगुआनच्या जवानांना पकडून ठेवले होते. शेवटी पोलिसांना कारवाई करून त्यांना सोडवावे लागले.


मागच्या वर्षी कुनमिंग मधेच एका फेरीवाल्याचा मृत्यू झाल्यावर इतर फेरीवाल्यांनी त्याचे प्रेत एका हातगाडीवर घालून चेनगुआनच्या ऑफिसात नेले होते व तिथे दहनाचे प्रतीक म्हणून काही कागद जाळले होते. चेनगुआनने वर्णिल्याप्रमाणे या फेरीवाल्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांनीच म्हणे झाला होता. याच महिन्यात शांघाय मधल्या एका माणसाने त्याच्यावर चेनगुआनच्या अधिकार्‍यांनी खोटे गुन्हे दाखल करून घेतले म्हणून सार्वजनिक जागी स्वत:च्या हाताचे एक बोट तोडून घेतले.


चेनगुआनच्या गुंडगिरीची व दुष्कीर्तीची आता चीनमधल्या माध्यमांनीही दखल घ्यायला सुरुवात केली आहे. एका वृत्तपत्राच्या मताप्रमाणे जनमानसात, चेनगुआनच्या बद्दल असलेला असंतोष आता खदखदतो आहे व कोणत्याही क्षणी त्याचा स्फोट होण्याची शक्यता आहे. हा असंतोष जरी सध्या चेनगुआनच्या विरोधात असला तरी प्रत्यक्षात तो स्थानिक अधिकार्‍यांची मनमानी आणि जुलुम यांच्याबद्दल आहे.

कुनमिंगमधे 26 मार्चला एका फेरीवालीवर झालेल्या चेनगुआनच्या अत्याचाराचे वर्णन एका वर्तमान पत्राने दिले आहे. या पत्रातील बातमीप्रमाणे या फेरीवालीला चेनगुआनच्या गुंडांनी रस्त्यावर आडवे पाडले व तिची हातगाडी तिच्या देहावर टाकली व त्यावर तिला हलता येउ नये म्हणून एक गॅस सिलिंडर टाकला. या प्रकारात ती बाई बेशुद्ध पडल्यावर चेनगुआनचे लोक तिथून हटले.

बिजिंग मधल्या काही कायदे तज्ञांनी, सरकारला कोणतीही खाजगी इमारत मनमानी करून पाडता येऊ नये यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचे सांगितले आहे. यु जिआनरॉंग हा बुद्धीवादी, चेनगुआन विरुद्धच्या या छोट्या मोठ्या घटनांना समाजात मोठ्या प्रमाणात असलेल्या असंतोषाच्या विस्फोटाच्या धोक्याची घंटा मानतो. आंतरजालावर प्रसिद्ध झालेल्या त्याच्या लेखात तो म्हणतो की चीनमधे अतिशय मोठ्या प्रमाणात सामाजिक असंतोष आहे व चिनी अधिकारी ज्या पद्धतीने तो दडपू पहात आहेत ती पद्धत बघता, त्याचा मोठा स्फोट होण्याची शक्यता जाणवते. अशा प्रकारचा स्फोट हे देशावरील सर्वात मोठे संकटच ठरू शकते.

आपल्याकडे काही राजकीय पक्ष अशा प्रकारच्या संघटना उभ्या करून गुंडगिरी करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात. परंतु ज्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे राज्य राखायचे ते सरकारी नोकरच जर गुंडगिरी करू लागले तर सर्व सामान्य लोकांनी कोणाकडे पहायचे? चीन मधे हेच घडते आहे.
7 एप्रिल 2010

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: