शुक्रवार, जून ०४, २०१०

भुताटकीचे गावचारी बाजूंनी पसरलेल्या वाळवंटात प्रवास करताना तुमच्या नजरेसमोर जर एखादे आधुनिक गाव अचानक आले तर तुम्हाला काय वाटेल? चारी दिशांना जाणारे मोठे राजरस्ते, त्यांच्या बाजूला मोठमोठ्या आधुनिक इमारती हे सगळे पाहून आपण हे सगळे प्रत्यक्षात बघतो आहोत की स्वप्नात? असा विचार तुमच्या मनात नक्कीच डोकावून गेल्या शिवाय रहाणार नाही. पण या एवढ्या मोठ्या परिसरात वाहने जाताना दिसत नाहीत. लोकांची वर्दळ दिसत नाही हे बघून कोठेतरी काहीतरी विचित्र आहे अशी तुमची समजूत झाल्याशिवाय रहाणार नाही हे नक्की

हे दृष्य तुम्हाला दिसेल चीनमधल्या इनर मंगोलिया प्रांतातल्या चिंगशुईहे या काऊंटी मधल्या वॅंगुइयाओ गावाजवळ.(Wangguiyao town)  ही काऊंटी ज्या भागात आहे तो आहे एक वाळवंटी प्रदेश. अनेक टेकड्यांच्या रांगा व त्यातून भणाणता वारा असेच दृष्य या भूभागात बघायला मिळते. अशा या ओसाड व वैराण प्रदेशात हे निर्मनुष्य गाव उभे आहे. अनेक इमारती पूर्ण बांधलेल्या आहेत तर अनेक इमारती कामगार काम सोडून पळून गेल्याने नुसत्या पोकळ सांगाड्यांच्या स्वरूपात उभ्या आहेत. रस्त्यावर वाहने दिसत नाहीतच पण खूप वेळ उभे राहिले तर एखादा जवळपासच्या शेतामधला ट्रॅक्टर रस्त्याने जा ये करताना दिसतो


या काऊंटीच्या स्थानिक पुढार्‍यांनी हा प्रकल्प हातात घेतला खरा! पण त्यांच्याकडे तो पूर्ण करण्यासाठी पैसेच नसल्याने आता तो अर्धवट सोडून द्यावा लागला आहे. हा प्रकल्प जवळच्याच एका गावातल्या लोकांचे स्थलांतर करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी हातात घेतला गेला होता. पण या नवीन प्रकल्पात घरे, शाळा वगैरे मिळण्याऐवजी त्या लोकांना आपल्या जुन्या गावातच रहावे लागत आहे आणि स्थानिक प्रशासनाकडे पैसेच नसल्याने दुसर्‍या कोणत्याच कामावर किंवा प्रकल्पावर पैसे खर्च करता येत नाहीत. या प्रकल्पावर अनेक मिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च झाले आहेत. चिंगशुईहे चे लोक स्थानिक प्रशासनावर साहजिकच अतिशय संतापलेले आहेत


एका स्थानिक अधिकारी पॅन ली याच्या मते, हा प्रकल्प स्थानिक प्रशासनाने मंजूर करून मध्यवर्ती सरकारकडे पाठवला होता व त्याची मंजुरीही घेतली होती. परंतु मध्यवर्ती सरकारच्या संकेत स्थळावर मंजूर प्रकल्पांच्या यादीत या प्रकल्पाचे नाव आढळून येत नाही. या प्रांताची राजधानी होहहॉट जवळच हा प्रकल्प उभारण्यात येत होता. हा भाग चीनच्या अत्यंत दरिद्री भागापैकी एक समजला जातो. हा प्रकल्प झाल्यावर या भागातील गुंतवणूकीला प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिक व्यापार उदिम तेजीत येईल अशी कल्पना होती. पण प्रत्यक्षात स्थानिक प्रशासनाने स्वत:जवळचे सर्व पैसे या प्रकल्पावर खर्च करून टाकल्याने त्यांच्या जवळ कोणतीही विकासकार्ये करण्यासाठी पैसेच आता उरलेले नाहीत. या प्रकल्पावर एकूण खर्च किती होणार होता? व त्या पैकी प्रत्यक्षात किती खर्च झाला? याबाबत स्थानिक प्रशासन काहीच बोलत नाही परंतु चिनी वर्तमानपत्रांच्या मताने हा प्रकल्प 880 मिलियन अमेरिकन डॉलर्सचा होता. ही रक्कम स्थानिक प्रशासनाच्या वार्षिक अंदाजपत्राच्या(4.4 मिलियन अमेरिकन डॉलर्स) अनेक पट अधिक आहेस्थानिक लोकांच्या मताने, या प्रकल्पामुळे या भागाचा विकास किमान 10 वर्षांनी तरी मागे पडला आहे. या नव्या प्रकल्पात बांधण्यात येणार्‍या एका हॉटेलच्या प्रकल्पावर जिंग वेन हा वॉचमन म्हणून राहतो आहे. तो म्हणतो की या प्रकल्पाचे काम 2005 मधे सुरू झाले व दोन वर्षांनी ते थांबले. त्यानंतर पुन्हा कधीच कोणतीही काम सुरू झालेले नाही. जिंग वेन व त्याची बायको हे दोनच रहिवासी या गावात सध्या राहतात. चिनी माध्यमांच्या मताने चिंगशुईहे प्रशासनाने, बिजिंगची मंजूरी मिळेलच असे धरून हा प्रकल्प सुरू केला पण बिजिंगची मंजूरी त्यांना मिळालीच नाही. त्यांनी काम तसेच चालू केले होते. चिंगशुईहे प्रशासनाकडचे पैसे संपले असे म्हणणे योग्य होणार नाही. त्यांच्याकडे मुळातच पैसे नव्हते. स्थानिक प्रशासनाचे अधिकारी या प्रकल्पाबद्दल काहीही बोलण्यास राजी होत नाहीत.

जुन्या गावातील रस्ता व एक मांस विक्रेता
हॉन्गकॉन्गच्या सिटी युनिव्हर्सिटी मधले एक प्रोफेसर जोसेफ चेंग म्हणतात की " चीनच्या ग्रामीण भागातले पुढारी वाटेल तशी मनमानी करताना दिसतात. याचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक जनतेला त्यांच्यावर नियंत्रण कोणत्याही पद्धतीने ठेवता येत नाही व लांब असलेले मध्यवर्ती शासन त्यांच्यावर कोणताही अंकुश ठेवू शकत नाही. कम्युनिस्ट पार्टीचा स्थानिक सेक्रेटरी हाच बहुतेक ठिकाणी सर्वै सर्वा असतो व लोकशाहीमधे निरनिराळ्या गटांच्या दबावामुळे शासनाच्या मनमानी करण्यावर जसे नियंत्रण ठेवले जाते तसे या ठिकाणी होत नाही व असे प्रकल्प हातात घेतले जातात व शेवटी लोकांचेच नुकसान होते.
4 जून 2010

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: