मंगळवार, जुलै २०, २०१०

युनान मधल्या मृत्यूंचे गूढ


युनान हा चीनमधला प्रांत, या देशाच्या नैऋत्य कोपर्‍यात दडलेला आहे. चीनच्या इतर भागातले हवामान व युनानचे हवामान यात जमीन -अस्मानाचा फरक आहे. युनानची सीमा- मियानमार, थायलंड व लाओस या देशांना लागून आहे व एकूण हवामान विषुव वृत्तीय प्रदेशातल्या देशांसारखेच आहे. भारतासारखाच येथे उन्हाळ्यात मोसमी पाऊस पडतो. प्रत्येक पावसाळ्यात, या युनानच्या कानाकोपर्‍यात दडलेल्या छोट्या छोट्या खेडेगावांतील खेडूतांना, सगळ्यात भिती कशाची वाटत असेल तर अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची. प्रत्येक पावसाळ्यात, या छोट्या गावांच्यामधे, हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मरण पावणार्‍यांची संख्या वाढतच चालली होती. हा असा तीव्र हृदयविकाराचा झटका कोणत्याही वयाच्या खेडूतांना येत असल्याने या गूढ आजारामागचे रहस्य आणखीनच गडद झाले होते. या आजाराला वैद्यकीय वर्तुळांच्यात Yunnan Sudden Death Syndrome असे नाव दिले गेले आहे. आतापर्यंत 400 खेडूत तरी या आजाराने मृत्युमुखी पडले आहेत

या एकूणच प्रकारामागचे कारण लक्षात येत नसल्याने, पाच वर्षांपूर्वी मध्यवर्ती सरकारने China's Center for Disease Control and Prevention या संस्थेला या आजारामागचे कारण शोधण्यासाठी एक अभ्यासगट स्थापन करण्यास सांगितले. या संस्थेने China Field Epidemiology Training Program या कार्यक्रमाच्या अंतर्गत असा गट स्थापन केला. निरिक्षणे करताना या अभ्यासगटाला अनेक अडचणी आल्या. युनानच्या कानाकोपर्‍यात राहणार्‍या खेडूतांना, त्यांची स्वत:ची स्थानिक भाषाच फक्त येत असल्याने, बिजिंगच्या या मंडळींचे मॅन्डरीन, त्यांना समजत नव्हते. ही सगळी खेडेगावे दुर्गम अशा डोंगराळ भागात असल्याने पावसाळ्याच्या दिवसात तेथे जाणेही अवघड होते. एखादा गावकरी मृत्युमुखी पडला तर स्थानिक परंपरांप्रमाणे त्याला लगेच मूठमाती देण्यात येत असल्याने शव विच्छेदन करणे दुरापास्त होते. धुवांधार पाऊस व दरडी कोसळण्याच्या प्रकारांमुळे प्रवास करणेच अशक्य होत असे. या सगळ्या अडचणींवर मात करून या अभ्यासगटाने अतिशय बारकाईने निरिक्षणे करून पाच वर्षांनंतर आता आपला अहवाल तयार केला आहे.
मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींबद्दल माहिती जमा केल्यावर, या व्यक्ती मृत होण्याच्या आधी त्यांना काही कॉमन वैद्यकीय लक्षणे दिसत होती असे लक्षात आले. या सर्व व्यक्तींना, मळमळणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके जलद होणे, आकडी येणे व अतिशय थकवा वाटणे ही लक्षणे मृत्यूआधी दिसली होती. तसेच हे सर्व मृत्यू, पावसाळ्यामधल्या एका छोट्या कालखंडातच घडत होते. मृत्युमुखी पडलेले गावकरी काय करत होते? व त्यांची जीवनशैली काय होती? याचा अभ्यास केल्यावर तीन कॉमन गोष्टी आढळून आल्या. हे सर्व गावकरी एकतर साचलेले पाणी पीत होते, त्यांना आयुष्यात सतत ताणतणावांचा सामना करायला लागत होता व या सर्व गावकर्‍यांच्या आहारात, मश्रूम किंवा कुत्र्याच्या छत्र्या होत्या.
युनान हा प्रांत तिथे मिळणार्‍या जंगली मश्रूम्ससाठी जगप्रसिद्ध आहे. इथल्या मश्रूम्स चीनमधेच नाही तर बाहेरच्या देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. या निर्यात होणार्‍या मश्रूम्स अतिशय महाग असतात त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात संपूर्ण कुटुंबे मश्रूम्स शोधण्याच्या मोहिमेवर बाहेर पडलेली युनानमधे नेहमी दिसतात. या कारणामुळे या मृत गावकर्‍यांच्या आहारात मश्रूम्स होत्या यात खरे म्हणजे नवलविशेष काही नव्हते. तरी सुद्धा या गटाने एक सर्वसाधारण अशी धोक्याची सूचना जाहीर केली की लोकांनी अनोळखी जातीच्या मश्रूम्स आपल्या आहारात ठेवू नयेत. पण याचा फारसा काहीच उपयोग झाला नाही. 2008 साली म्हणजे तब्बल तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर या अभ्यासगटाच्या असे लक्षात आले की ज्या व्यक्ती मृत पावल्या आहेत त्या सगळ्यांच्या घरच्या पावसाळ्यातल्या आहारात, एक फारशी माहिती नसलेली व अतिशय निरागस दिसणारी, Little White.या नावाची मश्रूम आहे. ही विशिष्ट मश्रूम या गावकर्‍यांच्या आहारात का असते? याचा शोध घेतल्यावर या अभ्यासगटाच्या असे लक्षात आले की ही मश्रूम फार छोट्या आकाराची असल्याने आणि तोडल्यावर काही तासांतच या पांढर्‍या शुभ्र मश्रूमचा रंग तपकिरी रंगात बदलत असल्याने याची विक्री किंवा निर्यात होऊ शकत नाही व म्हणून युनानमधले गावकरी त्यांना जंगलांच्यात सापडलेल्या या प्रकारच्या मश्रूम्सचा, स्वत:च्या आहारातच समावेश करतात

या Little White.मश्रूमचे जीवशास्त्रीय नाव ट्रॉजिया (Trogia) आहे व ती मश्रूम्सच्या Marasmiaceae या प्रजातींपैकी एक आहे. ही मश्रूम, Jacob Gabriel Trog. या स्विस मश्रूमतज्ञाने शोधून काढलेली असल्याने तिला हे नाव देण्यात आलेले आहे. या मश्रूममधे तीन प्रकारची विषारी ऍमिनो ऍसिड्स असतात हे वनस्पतीशास्त्रज्ञांना ज्ञात आहे. परंतु या ऍमिनो ऍसिड्सचे प्रमाण या मश्रूममधे खूपच कमी असल्याने ती खाण्यात तसा धोका काहीच नसतो. मृत्युमुखी पडलेल्या काही व्यक्तींचे शव विच्छेदन केल्यावर या अभ्यासगटाच्या असे लक्षात आले की या व्यक्तींच्या शरीरात बेरियम या धातूचे प्रमाण सर्वसाधारण व्यक्तींच्या मानाने बरेच जास्त आढळले आहे. बेरियम धातूच्या अगदी कमी प्रमाणातल्या सेवनानेही हृदयाच्या ठोक्यांमधे अनियमता, श्वासोच्छवास करण्यास अडचण, रक्तदाब वाढणे, मेंदू, यकृत, मूत्रपिंड या अवयवांना सूज येणे व हृदयविकार या सारखी लक्षणे हा धातू सेवन केलेल्या व्यक्तींमधे दिसून येतात.
या सर्व अभ्यासानंतर हा गट या अनुमानाला आला की ही Little White मश्रूम, जमिनीमधे असलेले बेरियम धातूचे क्षार ओढून घेत असली पाहिजे व ज्या व्यक्ती या मश्रूमचा आहारात समावेश करतील त्यांना बेरियम धातूचा विषप्रयोग होत असला पाहिजे.
गावकर्‍यांनी या मश्रूमचा आपल्या आहारात समावेश करू नये म्हणून शिक्षणात्मक मोहिमा आता या भागात उघडण्यात आल्या आहेत व त्याचा उत्तम परिणाम या वर्षी दिसून येतो आहे कारण या वर्षी या विकाराला बळी पडलेल्यांच्या संख्येत एकदम घट झाली आहे.
माझ्या लहानपणी माझी आजी मला नेहमी सांगत असे की अनोळखी झाडांच्या पाने फुलांना हात सुद्धा लावू नये आणि कोणतेही फळ तोंडात तर कधीच टाकू नये. तिच्या या सांगण्यामागचे इंगित हे असे आहे तर!
19 जुलै 2010

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: