शुक्रवार, मे ०७, २०१०

निष्पाप छोट्या मुलांच्या वरचे हल्ले


मागच्या आठवड्यात, चीनमधल्या शॅनडॉन्ग (Shandong) प्रांतामधे, एका स्थानिक शेतकर्‍याने, दोन तीन वर्षे वय असलेली पाच मुले व त्यांची शिक्षिका, यांच्यावर काहीही कारण नसताना चाकूने एकदम हल्ला चढवला. इतर दोन मुलांना त्याच्या हल्ल्यापासून कसेबसे वाचवता आले. यानंतर या शेतकर्‍याने स्वत:ला पेटवून घेतले व आत्महत्या केली. हा हल्ला या महिन्यातला या प्रकारचा चौथा हल्ला होता. याच्या थोडे दिवस आधी, जिआन्ग्सू (Jiangsu) प्रांतामधे, एका शिशूशाळेमधल्या मुलांच्यावर अशाच एका पिसाट माणसाने चाकूने हल्ला चढवला होता . या हल्ल्यात 28 मुले व 3 शिक्षिका जखमी झाल्या. 5 मुले अत्यवस्थ असल्यामुळे त्यांना इस्पितळात ठेवण्यात आले आहे. जिआन्ग्सू मधल्या हल्ल्याच्या एकच दिवस आधी, गुआन्गडॉन्ग (Guangdong) प्रांतामधल्या. एका रजेवर असलेल्या शिक्षकाने, प्राथमिक शाळेत शिकत असलेली 16 मुले आणि त्यांचे शिक्षक यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले होते. हा रजेवर असलेला शिक्षक, मनोरुग़्ण असल्याने रजेवर होता. तर याच दिवशी फुजिआन ( Fujian) प्रांतामधल्या एका माणसाला मागच्या वर्षी प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या 8 मुलांवर हल्ला करून त्यांना ठार मारल्याबद्दल, यमसदनी पाठवण्यात आले


चीन मधली कम्युनिस्ट राजवट, त्या देशामधे कायदा व सुव्यवस्था कशी उत्तम आहे याबद्दल नेहमीच स्वत:चे स्तुती-पोवाडे गात असते. गेल्या काही दिवसातल्या या बालकांवरील हल्ल्यांमुळे, ती सुद्धा गोंधळून गेली आहे. अतिशय कमी वयाच्या या निष्पाप शिशूंच्यावर, हे हल्ले एकदम का होऊ लागले आहेत? व याचे कारण असावे हे शासनाला समजणे कठिण जाते आहे असे दिसते. अनेक लोक, राज्यकर्त्यांवर, या बाबतीतील प्रश्नांचा भडिमार करत आहेत. परंतु चिनी शासनाला या हल्ल्यांमधील वाढीमागचे काहीही कारण देता आलेले नाही. शिक्षण मंत्रालयाने यासाठी एक आपत्कालीन पॅनेल नेमले आहे. काही ठिकाणी स्थानिक पोलिसांनी मीरपूडीचे स्प्रे किंवा काही स्वसंरक्षणाची साधने, काही शिशू शाळातल्या शिक्षक वर्गाला दिली आहेत. पण सर्वसाधारणपणे पोलिसांना या बाबतीत काहीच ठोस सांगता येत नाही असे वाटते

शांघाय मधल्या फुदान विद्यापीठातील क्लिनिकल सायकॉलॉजीचे प्रोफेसर जि जिआनलिन यांच्या मते, या सर्व हल्ल्यांमागे एक समान सूत्र आहे. त्यांच्या मताप्रमाणे या सर्व हल्लेखोरांच्या मनात त्यांच्यावर झालेल्या कोणत्यातरी अन्यायामुळे. समाजाबद्दल एक अढी येऊन चीड निर्माण झालेली आहे. याचे एक प्रमुख कारण, चीनमधे सर्वत्र दिसणारा भयानक भ्रष्टाचार व असमानता हे आहे. या शिवाय चीन मधल्या सामाजिक परिस्थितीत इतक्या झपाट्याने बदल होत आहेत की अशा परिस्थितीत या गांजलेल्या लोकांना जो मानसिक आणि सामाजिक आधार मिळावयास पाहिजे तो मिळत नसल्याने समाजावर सूड म्हणून या व्यक्ती या निष्पाप व दुर्बल अशा शिशूंच्यावर हल्ले करण्यास प्रवृत्त होत आहेत. प्रोफेसर जि जिआनलिन याला 'समाजावरील सूड' असे नाव देतात.

या पूर्वी कर्मचार्‍यांच्या युनियन्स व स्त्रियांची मंडळे अशा प्रकारचा आधार, वैयक्तिक पातळीवर देत असत. आता ही गोष्ट शक्य होत नाही. मुख्यत्वे लहान गावांच्यात किंवा शहरांच्यात, असा प्रकारचा आधार, ती व्यक्ती अगदी पाळण्यात असल्यापासून ते तिच्या मृत्यूपर्यंत मिळत असे. परंतु चीनमधे होत असलेल्या सामाजिक बदलांच्यामुळे हा आधार तर आता मिळत नाहीच पण मोठ्या संख्येने अनेक चिनी गरिबीत ढकलले गेल्याने एकाकी पडत आहेत. गरीब व श्रीमंत यांच्यामधली दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. लोकांची जीवनाकडे बघण्याची वृत्ती सुद्धा आता बदलली आहे. यामुळे काही मनोरुग्ण या प्रकारच्या कृती, त्यांची समाजाबद्दलची चीड व संताप व्यक्त करण्यासाठी वापरत आहेत. या लोकांना मानसिक रुग्ण समजून त्यांच्यावर उपचार होणे गरजेचे आहे. दुर्दैवाने चिनी समाजात अशा प्रकारच्या मनोरुग्णांबद्दल, त्यांना टाळावे किंवा दुर्लक्ष करावे अशीच वृत्ती दिसून येते. यामुळे हे मनोरुग्ण अधिकच एकाकी पडतात व शेवटी या प्रकारची कृत्ये करण्यास तयार होतात. माध्यमांच्यातून अशा प्रकारच्या हल्ल्यांना जी अवाजवी प्रसिद्धी मिळते आहे त्यामुळे तशीच कृत्ये करण्यास दुसर्‍या मनोरुग्णांना प्रोत्साहन दिल्यासारखे होते आहे.
प्रोफेसर जि जिआनलिन या हल्ल्यांमागची मानसशास्त्रीय कारणे कितीही देवोत. या हल्ल्यात जखमी झालेल्या किंवा बळी गेलेल्या निरपराध व निष्पाप शिशूंच्या पालकांचे सांत्वन कोण आणि कसे करणार आहे?
7 मे 2010

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: