शुक्रवार, ऑगस्ट १३, २०१०

वुहान मधले कचर्‍याचे ढीग


पुण्याच्या महानगरपालिकेविषयी पुणेकरांच्या ज्या तक्रारी असतात त्यात महानगरपालिकेचा सफाई विभाग कचरा लवकर उचलत नाही. कचर्‍याचे ढीग शहरात साठून राहतात वगैरे तक्रारी सर्वात जास्त प्रमाणात असतात. एका अर्थाने ते बरोबरही आहे. रस्त्याच्या कडेला मोठमोठे कचर्‍याचे ढीग साठून राहिले आहेत. दुर्गंधी येते आहे वगैरे दृष्ये कोणत्या सुजाण नागरिकाला आवडतील?
चीनच्या होंगशान जिल्ह्यामधल्या वुहान या शहराच्या एका उपनगरामधे कचर्‍याचे जे ढीग मध्यंतरी साठले होते त्याची चित्रे मला आंतरजालावर बघायला मिळाली. या चित्रापुढे पुण्यातले कचर्‍याचे ढीग म्हणजे अगदीच फुसकट आहेत असेच वाटू लागले

 
Wang Haofeng Focus Times या वृत्तपत्राच्या वार्ताहराने या कचर्‍याच्या ढिगांना भेट दिल्यावर केलेले वर्णन त्याच्याच शब्दात ऐकण्यासारखे आहे. तो म्हणतो की " ज्यांना काही शेवटच नाही असे न संपणारे कचर्‍याचे ढीग गावात प्रवेश करताना नदीच्या काठावर साठलेले आहेत. अतिशय दुर्गंधी व कचर्‍यातील जळणार्‍या प्लॅस्टिकमुळे काळा धूर व राख ही वार्‍याबरोबर शहरात पसरते आहे. या शहरात राहणारे रहिवासी, स्त्रिया, मुले व विद्यार्थी य़ांना अतिशय त्रास होत असल्याने त्यांच्या डोळ्यातून पाणी येते आहे. सायकल व मोटर सायकल चालवणारे या रस्त्यावरून जाताना डोळे बंद करून जात आहेत. बाकी मागे बसलेले लोक किंवा पायी जाणारे लोक हे अंगावरच्या कपड्यांनी आपले नाक व तोंड झाकून घेत आहेत
 
रस्त्यावर येणार्‍या धुराच्या लोटांमधून जाताना लोक पळ काढून पलीकडे जात आहेत. हिरवे डोके असलेल्या माशा कचर्‍याच्या ढिगाभोवती घोंघावताना दिसत आहेत.”
 

या वार्ताहराच्या भेटीनंतर या कचर्‍यांच्या ढिगांना एवढी प्रसिद्धी मिळाली की वुहानमधले अधिकारी एकदम जागे झाले व त्यांनी JCB सारखी बांधकाम यंत्रे या ठिकाणी आणून कचरा उचलला व तेथे माती टाकली
 
आता किती दिवस ही स्वच्छता राहणार हा ही प्रश्नच आहे.
13 ऑगस्ट 2010

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

कचऱ्याचे ढीग साचण्याचे प्रमुख कारण म्हणजे उचललेल्या कचऱ्य़ाची विल्हेवाट लावण्यातील असमर्थता. पुणे काय,बुहान काय किवा मुंबई काय कचऱ्याच्या निर्मितीचा वेग कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या वेगापेक्षा जास्त आहे तोवर परिस्थिती बदलणे शक्य नाही. सिंगापूर स्वच्छ असण्याचे कारण कचऱ्याच्या विल्हेवाटीचा वेग तेथे निर्मितीच्या वेगापेक्षा अधिक आहे

अनामित म्हणाले...

चीनबद्दल इतकं आणि असं लिहीताय, एखाद्या चिनी गुप्तहेरानं भेट दिली नाही अजून एखादी?

Akshardhool म्हणाले...

आल्हाद
तुमच्या मनात चीनबद्दलचे काहीतरी अवास्तव चित्र आहे असे वाटते. अहो तो आपल्यासारखाच एक देश आहे. तिथले लोक परिस्थितीवर आपल्यासारखेच चरफडतात, वैतागतात. असल्या बातम्यांना त्यांच्या संकेत स्थळांवर, वर्तमानपत्रांतून प्रसिद्धी मिळते. चिनी लोकांच्या व्यथा व प्रश्न आपल्याला समजावेत म्हणून तर हा ब्लॉग मी लिहितो.