रविवार, फेब्रुवारी २८, २०१०

एड्स फोबियाचीनच्या दक्षिण भागात असलेल्या ग्वांगडॉंग या प्रांतातील Peoples No. 8 Hospital मधे काम करणारे डॉक्टर चाय वेपिंग हे एक वरिष्ठ संशोधक आहेत. एड्स किंवा एचआयव्ही या रोगाबद्दल ते संशोधन करतात. काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने या डॉक्टरांची अपॉइंटमेंट मागितली. पण त्याने हॉटेलच्या एका रिकाम्या खोलीतच आपण डॉक्टरांची भेट घेऊ असे आग्रहाने सांगितले. भेटीच्या वेळी या व्यक्तीने चेहर्‍यावर फेस मास्क लावला होता. डॉक्टरांनी याचे कारण विचारल्यावर आपल्याला एड्स हा रोग झाला आहे व तो आपली लाळ व घाम यांच्या द्वारा पसरत असल्यामुळे आपण ही काळजी घेत असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी त्याचे जुने अहवाल बघायला मागितले. या सर्व अहवालांनुसार या व्यक्तीला एड्स या रोगाचे कोणतेही लक्षण नव्हते. या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे एकदा वेश्यागमन केल्यामुळे त्याला हा रोग झाला आहे. या व्यक्तीने सात वेळा निरनिराळ्या इस्पितळांत एड्सच्या चाचण्या करून घेतल्या होत्या. प्रत्येक वेळी ही चाचणी निगेटिव्हच आली असली तरी त्या व्यक्तीला आपल्याला हा रोग झालाच आहे असे वाटत होते. आपण सर्व चाचण्या करून घेतल्या आहेत. डॉक्टरांच्या मते आपल्याला काहीही झालेले नाही पण आपण आजारीच आहोत या विचारावर ती व्यक्ती ठाम होती.

डॉक्टर चाय वेपिंग या व्यक्तीच्या परिस्थितीला एक मानसिक रोग मानतात व त्या रोगाला त्यांनी एड्स मनोगंड किंवा HIV फोबिया असे नाव दिले आहे. त्यांच्या मते जगातील सर्व देशांच्यातच असे मानसिक रुग्ण सापडतात. परंतु चीनमधल्या एकंदर परिस्थितीमुळे चीनमधे हे मानसिक रुग्ण बर्‍याच जास्त प्रमाणात आहेत. या मानसिक रुग्णांच्यामुळे, एड्सच्या विरुद्ध लढा देणार्‍या डॉक्टर्स व इतर कर्मचारी आणि एकूण वैद्यकीय प्रणालीवरच अनावश्यक ताण येतो आहे.


आपल्याला एड्स झाला आहे असे वाटणार्‍या इंटरनेट ग्राहकांनी आता चीनमधे आपले विशेष चॅट कक्ष स्थापन केले आहेत. एका अंदाजाप्रमाणे अशा कक्षांची संख्या पंधराच्या आसपास तरी आहे. एका अशाच चॅट कक्षातल्या एका सभासदाने आपले वर्णन करताना लिहिले आहे की " मला एड्स झाला आहे याबद्दल माझी खात्री आहे. दुसर्‍यांना संसर्ग होऊ नये म्हणून मी हा चॅट कक्ष जॉइन केला आहे. मी आवश्यक ती खबरदारी घेऊन एकदा वेश्यागमन केल्यावरही मला हा रोग झाला. यानंतर 24 तासातच मला ओकारी झाली. डोके मनस्वी दुखू लागले, चक्कर येऊ लागली, शरीरातले अवयव सुजत आहेत असे वाटू लागले व वेदना सुरू झाल्या. असे अनेक महिने चालले. मी अनेक इस्पितळात चाचण्या करून घेतल्या पण तेथे मला काहीच झालेले नाही असे निदान केले गेले." चीनमधल्या वैद्यकीय व्यवस्थेबद्दल अत्यंत असमाधानी असलेल्या या व्यक्तीने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनशी संपर्क साधून आपल्या आजाराबद्दल त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

शांघाय मधल्या Pasteur Institute ला मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून स्वत:ला एड्सने आजारी समजणार्‍या लोकांची पत्रे येण्यास सुरवात झाली. आतापर्यंत त्यांनी अशा 5 मानसिक रुग्णांना तपासून, त्यांना एड्स झाला नसल्याचे सांगितले. या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना एड्सची सर्व लक्षणे आहेत. त्यामुळे या संस्थेने या मानसिक रुग्णांचा एक अभ्यासच आता सुरू केला आहे.

China's Centre for Disease Control या संस्थेने तर अशा 60 मानसिक रुग्णांचा एक गट स्थापन केला आहे. या लोकांना एड्स झालेला नसतानाही एड्सची लक्षणे आहेत. निरनिराळ्या ठिकाणी डॉक्टरांच्याकडे आलेल्या या सर्व मानसिक रुग्णांमुळे, चीनमधल्या वैद्यकीय प्रणालीने हे आता मान्य केले आहे की चीन मधे आता असे शेकडो रुग्ण आहेत ज्यांना एड्स झालेला नाही पण त्यांच्या आजाराची लक्षणे अगदी एड्स प्रमाणेच आहेत.
या मानसिक म्हणा किंवा काल्पनिक म्हणा पण अस्तित्वात असलेल्या नवीन रोगाची सुरवात चीनमधल्या 2004 सालच्या सार्स या भयानक रोगाच्या साथीनंतर सुरू झाली. सार्सच्या साथीच्या वेळी चीनमधल्या वैद्यकीय प्रणालीने सर्व गोष्टी लपवून ठेवल्या व लोकांना माहिती पुरवली नाही. चीनमधे सार्समुळे 350 लोक तरी मृत्युमुखी पडले. या साथीनंतर चिनी लोकांचा तिथले डॉक्टर्स व वैद्यकीय प्रणाली यावरचा विश्वास उडलाच आहे. आपल्याला एड्सची सर्व लक्षणे आहेत असे असताना, डॉक्टर्स आपल्याला काही झालेले नाही असे सांगून आपल्याला मुद्दाम फसवत आहेत असेच या लोकांना वाटते व त्यामुळेच ते डॉक्टरांवर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत.

कारण काहीही असले तरी या विचित्र रोगाने पछाडलेले लोक एड्स झाला नसताही त्याच पद्धतीने आयुष्यातून उठत आहेत. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला संसर्ग होईल म्हणून बहुतेकांनी एकांतवास किंवा अज्ञातवास पत्करला आहे. आपण हळूहळू मृत्यूकडे वाटचाल करत आहोत असेच त्यांना वाटते आहे. चीनमधल्या अनेकांचा तिथल्या वैद्यकीय प्रणालीवर विश्वास राहिलेला नाही हे कटू सत्य मात्र या विचित्र रोगामुळे जगासमोर आले आहे हे मात्र खरे.
28 फेब्रुवारी 2010

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

i have visited first time to this blog..

khup chhan ahet posts..

HIV phobia ha kharach navin prakar ahe..

Shweta म्हणाले...

Hi,

I like your all posts.. I'm regular reader of this blog..

Thanks for nice writting.. Keep it up..