सोमवार, फेब्रुवारी २२, २०१०

भाड्याचा बॉय फ्रेन्ड

सिनेमे किंवा नाटकांच्यात एक चावून चोथा झालेला प्लॉट नेहमी वापरला जातो. या कथानकात असलेला एखादा म्हातारा किंवा म्हातारी यांची आपल्या नातवंडाचे दोनाचे चार हात झालेले बघण्याची इच्छा असते. हा म्हातारा मरायला तरी टेकलेला असतो किंवा त्याची मोठी प्रॉपर्टी त्याच्या नातवंडाचे लग्न झाल्यावरच त्याला मिळणार असते. या नातवंडाची बंधनात अडकण्याची अजिबात तयारी नसल्याने तो आपल्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा पैसे देऊनही कोणालातरी आपला भावी सहचर म्हणून पुढे करतो वगैरे वगैरे ........
आता चिनी म्हातारे काय? आणि भारतीय म्हातारे काय? सगळे शेवटी एशिया खंडातलेच. चिनी म्हातार्‍यांचीच नाही तर चिनी आई वडीलांची सुद्धा या सिनेमाच्या प्लॉटप्रमाणे आपल्या बाळ्या किंवा बाळीने कोणीतरी सहचर लवकर शोधून काढावा अशी इच्छा असतेच. बहुतेक हा बाळ्या किंवा बाळी दुसर्‍या कोणत्या तरी शहरात नोकरी करत असतात. त्यामुळे त्यांना पत्रे, -मेल किंवा फोन यावरून आई-वडील, आज्या यांची सदैव कटकट चालू असते.
चीनमधले जे पारंपारिक पंचांग किंवा कॅलेंडर आहे ते आपल्या हिंदु किंवा मुस्लिम कॅलेंडरसारखेच चांद्रवर्षीय आहे. या कॅलेंडरप्रमाणे नववर्षदिन हा जानेवारी फेब्रुवारी महिन्यात येतो. सर्व जगभरचे चिनी वंशाचे लोक हा नववर्षदिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा सण चिनी लोकांचा सबंध वर्षातला सर्वात मोठा सण असतो. या दिवशी सर्व चिनी घरात पारंपारिक चिनी पदार्थ बनवले जातात. या नववर्षदिनाच्या आधीच्या संध्याकाळी सर्व चिनी घरात एक फॅमिली री-युनियन डिनर असते. या जेवणाला त्या कुटुंबातले सर्व जण, ते कितीही लांब रहात असले तरी, धडपडत जातातच जातात. 130 कोटी संख्येच्या चिनी लोकांचा हा वार्षिक प्रवास, पृथ्वीतलावरचे सर्वात मोठे मानवी स्थलांतर मानले जाते. घरातला मुलगा व मुलगी जरी दुसर्‍या शहरात नोकरी करण्यासाठी रहात असले तरी ते या डिनरसाठी आई-वडीलांच्या घरी जातातच
सध्याच्या काळात ही अशी लांब रहाणारी मुले व मुली, आपली करियर घडवण्याच्या मागे लागलेली असतात. आयुष्यात स्थिरावल्यावरच लग्नाचा विचार करावा अशी त्यांची साहजिकच मनोधारणा असते. या मुलांना हे फॅमिली रि-युनियन डिनर म्हणजे एक मानसिक छळवाद आता वाटू लागला आहे. या मुलांनी रि-युनियन डिनरला निदान आपल्या बॉय फ्रेंड किंवा गर्ल फ्रेंडला तरी घेऊन यावे अशी सर्व आई-वडीलांची इच्छा असते आणि असे झाले नाही तर ते कुटुंब गावातल्या इतर लोकांच्या टीकेचा विषय बनत असल्याने हे आई-वडील मुलांच्या मागे सतत भुणभुण लावतात.
चीनमधल्या एक कुटुंब-एक मूल या धोरणामुळे आता बहुतेक कुटुंबातील पुढच्या पिढीत एकच तरूण मूल असते. त्याने लवकर लग्न करून आजी आजोबांना नातवंड दाखवावे अशी त्यांची जबर इच्छा असते. या अपेक्षेचा प्रचंड ताण आता या आयुष्यात स्थिरावू पाहणार्‍या तरूण तरूणींवर येऊ लागला आहे.
यावर मार्ग म्हणून काही लोकांनी असे बॉय किंवा गर्ल फ्रेंड भाड्याने मिळवून देण्याची सोय केली आहे. बिजिंगच्या एका मुलीने काही दिवसापूर्वी इंटरनेटच्या माध्यमातून एक जाहिरात दिली होती. या जाहिरातीत या मुलीने स्पष्टच म्हटले आहे की आपले वय आता 28 झाले आहे पण मला अजूनही कोणी बॉय फ्रेंड न मिळाल्याने मी जर नववर्षदिनाला एकटीच घरी गेले तर ते माझ्या आई-वडीलांना अतिशय अपमानास्पद वाटणार आहे त्यामुळे मला एक भाड्याचा बॉय फेंड हवा आहे
या बॉय फ्रेंडबद्दलच्या या मुलीच्या अपेक्षा आहेत. मुलगा सुशिक्षित, चांगल्या वर्तणुकीचा असावा उंची 5 फूट 7 इंच ते 5 फूट 11 इंच, तो चष्मा लावणारा असावा आणि बारकुडा नको. ही मुलगी अशा मुलाला 10 दिवस तिच्या आई-वडीलांच्या घरी रहाण्यासाठी तब्बल 735 अमेरिकन डॉलर्स देण्यास तयार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही शारिरिक संबंधाची गरज आणि अपेक्षा नाही.
मिस्टर यिंग या 24 वर्षाच्या तरूणाने आपण बॉय फ्रेंड म्हणून जाण्यास तयार असल्याची जाहिरात दिली होती. तो म्हणतो की माझी आई-वडील मी त्यांना न भेटल्याने दु:खी होतील हे खरे पण मला असे काम केल्याने चांगले पैसे मिळतील तेंव्हा मी असे काम करायचे ठरवले आहे. असा भाड्याचा मित्र जरी मिळाला तरी पुढचे दहा दिवस सुरळीत पार पडतील याची खात्री नसते. खरे म्हणजे या भाड्याच्या मित्राचा व त्या मुलाचा तसा काहीच संबंध नसल्याने बोलण्यात गोंधळ होऊ शकतो. आई-वडील साहजिकच या बॉय किंवा गर्ल फ्रेंडची जास्त माहिती काढण्यास उत्सुक असतात आणि इथेच खरी गडबड होते. त्यामुळे त्या घरचा मुलगा किंवा मुलगी यांना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. झाओ शुडॉंग हे बिजिंगमधल्या चायना ऍग्रिकल्चर विद्यापीठाच्या सोशिऑलॉजी विभागाचे डीन आहेत.ते या नवीन प्रकाराबद्दल म्हणतात की चीनमधे अजूनही लोकांच्या आयुष्यात पारंपारिक प्रथा महत्वाच्या आहेत. पण आजचा चिनी तरूण वर्ग अतिशय हुशार असल्याने या पारंपारिक प्रथांना सामोरे जाण्यासाठी तो भांडवलशाही समाजातल्या कल्पनांचा वापर करतो आहे इतकेच. ग्वॉन्गडॉन्ग प्रांतातला 23 वर्षाचा झाओ यॉन्ग गेली दोन वर्षे नववर्षदिनाच्या वेळी आपल्या घरीच गेला नाही. आपल्या जवळ भाड्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने आपण गेलो नाही असे तो म्हणतो. परंतु तो दोन वेळा भाड्याचा बॉय फ्रेंड म्हणून दोन मुलींच्या बरोबर गेला होता. त्याचा सल्ला आहे की फी च्या बाबतीत आग्रह धरू नका आणि मोकळ्या मनाने जा. शेवटी ग्राहक हाच राजा असतो नाही कां? 22 फेब्रुवारी 2010

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: